घरताज्या घडामोडी...आता जावयांनी आमचा हट्ट पुरवावा, अजित पवारांच्या भाषणात हशा आणि टाळ्या

…आता जावयांनी आमचा हट्ट पुरवावा, अजित पवारांच्या भाषणात हशा आणि टाळ्या

Subscribe

आजवर आम्ही जावयाचा हट्ट पुरवत आलो आहोत. आता जावयांनी आमचा हट्ट पुरवून आम्हाला योग्य ती संधी द्यावी, अशी मागणी करतो, असं अजित पवार म्हणाले.

राहुल नार्वेकर हे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. आजवर आम्ही जावयाचा हट्ट पुरवत आलो आहोत. आता जावयांनी आमचा हट्ट पुरवून आम्हाला योग्य ती संधी द्यावी. एकीकडे जावई अध्यक्ष आणि दुसरीकडे सासरे सभापती ही दुर्मिळ बाब आहे. यानिमित्ताने नार्वेकर कुटुंबिय आणि निंबाळकर कुटुंबिय यांचे अभिनंदन व्यक्त करतो,” असं म्हणत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्या शैलीत विधानसभेत तुफान फटकेबाजी केली. (Ajit Pawar congratulate to assembly speaker Rahul Narvekar)

हेही वाचा – राज्यात सेना-भाजप युतीचं सरकार, एकनाथ शिंदेंकडून घोषणा; भाजपचेही मानले आभार

- Advertisement -

राहुल नार्वेकर यांच्या निवडीबाबात अभिनंदन करताना अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदाला गौरवशाली परंपरा आहे. आतापर्यंतच्या सर्वच अध्यक्षांनी या पदाला न्याय दिल्याचे आपण पाहिले आहे. नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेचे अतिशय चांगले काम होईल. सर्व सदस्यांना न्याय मिळेल आणि महाराष्ट्राच्या विकासाची चाकं गतीमान होतील, अशी आमची आणि जनतेची अपेक्षा आहे.

ते पुढे म्हणाले की, सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांचे नाव जोडले गेले आहे. हा खूप मोठा सन्मान आणि गौरव आहे. तितकीच मोठी जबाबदारी देखील आहे. महाराष्ट्र अध्यक्षपदाच्या नावावर नजर टाकली तर अनेक दिग्गजांनी हे पद भुषविले आहे. माजी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील, हरिभाऊ बागडे, नाना पटोले आज विधानसभेत आहेत. मधल्या काळात नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना सव्वा वर्ष प्रभारी अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आदिवासी समाजाचा सुपुत्र झिरवळ यांनी देखील चांगल्या प्रकारे या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आज सभागृहात हजर असलेल्या सर्वच माजी अध्यक्ष आणि नरहरी झिरवळ साहेबांचे अभिनंदन व्यक्त करुन त्यांना धन्यवाद देतो.

- Advertisement -

हेही वाचा – राहुल नार्वेकर नवे विधानसभा अध्यक्ष; शिंदे सरकारचा पहिला विजय

नार्वेकरांच्या रुपाने अभ्यासू नेतृत्व सभागृहाला मिळाले

राजकीय जीवनात चढउतार असतात, हे सर्वांनीच पाहिले आहे. एकंदरीत या सभागृहाचे कामकाज निष्पक्षपणे चालले पाहिजे. सभागृहातील सदस्यांना न्याय देत, अभ्यासपूर्ण चर्चांना वाव दिला पाहिजे. राज्याचा विकासाचा गाडा खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचा प्रयत्न सर्वच अध्यक्षांनी केलेला आहे. नार्वेकर यांच्याकडून हीच अपेक्षा आहे. नार्वेकर यांच्या रुपाने अभ्यासू नेतृत्व सभागृहाला मिळाले आहे. माझ्या माहितीप्रमाणे नार्वेकर यांनी विधानपरिषदेचे सभागृह सहा वर्षांसाठी पाहिले आहे. या टर्ममध्ये तुम्ही विधानसभेत आला आहात. त्यामुळे दोन्ही सभागृहाचा तुम्हाला जवळून अभ्यास आहे. आपले आणि माझे अनेक वर्षांपासून संबंध आहेत, असं पवार म्हणाले.

इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तीनही भाषांवर आपले प्रभुत्व आहे. सयंमी अशाप्रकारचे आपले नेतृत्व आहे. नार्वेकर पूर्वी शिवसेनेत होते. त्यावेळेस मला कानावर आले होते की, ते आदित्य ठाकरे यांचे जवळचे सहकारी होते. आदित्य ठाकरेंना तुम्ही कायद्याचे ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. नंतर आम्हाला मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार हवा होता. त्यामुळे आम्ही तुम्हाला उमेदवारीसाठी प्रस्ताव दिला आणि तुम्ही देखील हा प्रस्ताव स्वीकारला. मात्र दुर्दैवाने मोदी लाट असल्यामुळे अनेक मोठ मोठे उमेदवार पराभूत झाले. त्यात आमचे उमेदवार नार्वेकर यांचाही पराभव झाला. लोकसभेत पराभव झाल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेवर संधी दिली. त्यांनी शिवसेनेचे प्रवक्ते, राष्ट्रवादीचेही प्रवक्ते म्हणून चांगले काम केले. यापुढे अध्यक्ष म्हणून आपण चांगले काम कराल, याबाबत मला शंका नाही, असंही पवार पुढे म्हणाले.


नेतृत्वाला जवळ केलं

राहुल नार्वेकर कुठल्याही पक्षात गेले तरी ते नेतृत्वाच्या अधिक जवळ जातात. भाजपमधील जुन्या जाणत्या नेत्यांना जमले नाही, ते राहुल नार्वेकर यांनी तीन वर्षात करुन दाखवले, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. नार्वेकर यांना संसदीय कायद्याची उत्तम जाण आहे. तसेच ते कायद्याचे अभ्यासक असल्यामुळे दिलीप वळसे पाटील यांच्यानंतर खऱ्या अर्थाने कायद्याची जाण असलेले अध्यक्ष आपल्याला मिळाले आहेत. विधानसभा अध्यक्ष म्हणून कायद्याचे पालन करत असताना दोन्ही बाजुंच्या सदस्याना संधी दिली पाहीजे, अशी अपेक्षा सर्व सदस्यांच्यावतीने व्यक्त करतो, असं म्हणत पवारांनी नार्वेकरांचं कौतुक केलं.

केसरकरांना लगावला टोला

केसरकर सध्या चांगले प्रवक्ते झाले आहेत. आम्ही शिकवल्याचा काहीतरी फायदा झाला. आम्ही शिकवलेलं वाया गेलं नाही. ते चांगले प्रवक्तेच बनले, अशा शब्दांत अजित पवारांनी केसरकरांवर मिश्किल टिप्पणी केली. त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -