घरताज्या घडामोडीमुसळधार पावसात दरड कोसळणे, घरे व झाडांची पडझड सुरूच

मुसळधार पावसात दरड कोसळणे, घरे व झाडांची पडझड सुरूच

Subscribe

मुंबईत गेल्या रविवारपासून मुसळधार पावसाची बरसात सुरू आहे. मात्र बुधवारी दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला. या मुसळधार पावसामुळे मुंबई शहर व उपनगरात ९ ठिकाणी घरांची तर २८ ठिकाणी झाडे/ फांद्या यांची पडझड झाली आहे. या घटनांत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र चुनाभट्टी येथे सकाळी तीन – चार घरांवर दरड कोसळून ३ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

मुंबईत जून महिना अपेक्षित पाऊस न पडल्याने जवळजवळ काहीसा कोरडा गेला. मात्र जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुसळधार पावसाने आपला जोर दाखवत जून महिन्यातील कसर भरून काढण्याचा सपाटा लावला आहे. गेल्या रविवारपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. बुधवारी सकाळी मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर दुपारनंतर काहीसा कमी झाला. बुधवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या कालावधीत शहर भागात ३४ मिमी, पूर्व उपनगरात – ४५ मिमी तर पश्चिम उपनगरात – २१ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच, आगामी २४ तासांत मुंबईतील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

- Advertisement -

चुनाभट्टी येथे घरांवर दरड कोसळून ३ जण जखमी

बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास चुनाभट्टी येथील टेकडीलगतच्या तीन ते चार घरांवर दरड कोसळली. या घटनेत एका महिलेसह तीन व्यक्ती जखमी झाल्या असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुभम सोनावणे (१५), प्रकाश सोनावणे (४०) आणि सुरेखा विरकर (२८/ महिला) अशी जखमींची नावे आहेत.

- Advertisement -

९ ठिकाणी घरांची पडझड

मुंबईत मुसळधार पाऊस पडत असताना शहर भागात २ ठिकाणी, पूर्व उपनगरात – २ ठिकाणी तर पश्चिम उपनगरात – ५ ठिकाणी अशा ९ ठिकाणी घरांच्या पडझडीच्या घटना घडल्या आहेत. सदर घटनांपैकी केवळ चुनाभट्टी येथील घटनेत तीनजण जखमी झाले आहेत.

२८ ठिकाणी झाडे/ फांद्यांची पडझड

मुंबईत मुसळधार पावसात शहर भागात – ८ ठिकाणी , पश्चिम उपनगरात १३ ठिकाणी व पूर्व उपनगरात ७ ठिकाणी अशा २८ ठिकाणी झाडे/ फांद्या यांची पडझड झाली आहे. सुदैवाने या घटनांत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

बेस्टच्या २८ बसगाड्यांची वाहतूक वळवली

मुंबईत मुसळधार पावसामुळे सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे हिंदमाता, किंग्ज सर्कल, सायन, शेल कॉलनी चेंबूर, अँटॉप हिल,मानखुर्द आदी ७ ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने बेस्ट परिवहन विभागाने आपल्या २८ बसगाड्यांची वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवली. त्यामुळे बेस्टच्या प्रवाशांना त्याचा त्रास झाला.

तलावांत चांगला पाऊस

मुंबईत रविवारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी तुळशी व विहार या दोन्ही तलावांत चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे तलावातील पाणी साठ्यात काही प्रमाणात वाढ झाल्याचे समजते.


हेही वाचा : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळांचा नेतेपदाचा राजीनामा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -