घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रधोकादायक किल्लेपर्यटनाचा बळी; साल्हेर किल्ल्यावरून पडून एक ठार

धोकादायक किल्लेपर्यटनाचा बळी; साल्हेर किल्ल्यावरून पडून एक ठार

Subscribe

मुल्हेर, जायखेडा पोलिसांचे मदतकार्य; वारंवार सूचना करूनही हौशी पर्यटकांची संख्या कमी होईना

नाशिक : बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्यावर शुक्रवारी (दि. १५) दुपारच्या सुमारास हौशी पर्यटकाच्या ग्रुपमधील दोघेजण पाय घसरून दरीत पडल्याची घटना घडली. यात एकाचा मृत्यू झाला असून, दुसर्‍याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या गंभीर जखमीला मुल्हेर आणि जायखेडा पोलिसांसह स्थानिकांनी मदतकार्य करून उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले आहे. दोघेही मालेगावचे रहिवासी आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर गेल्या आठवड्यापासून वाढला असून, प्रशासनाकडून खबरदारी म्हणून पर्यटन स्थळी बंदी करण्यात येत आहे. तसेच अत्यंत धोकादायक बनलेल्या पर्यटन स्थळांवर खबरदारीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, या सूचनांकडे डोळेझाक करून हौशी पर्यटकांकडून धोकादायक स्थितीत निसर्गपर्यटन केले जात आहे. बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्यावर गेलेल्या अशाच मालेगाव येथील १२ जणांच्या ग्रुपमधील दोघांचा पावसामुळे पाय घसरून अपघात झाल्याची घटना घडली. दरीत पडलेल्या या दोघा तरुणांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. चढाईसाठी अत्यंत अवघड असलेल्या साल्हेर वाडीकडील उघड्या दरवाजाकडून या तरुणांनी वाट धरली. मात्र, या वाटेवरील धोकादायक पायर्‍यांवरून मार्गक्रमण करताना भावेश शेखर अहिरे (वय २१) या तरुणाचा पाय घसरला आणि तो दरीत कोसळून ठार झाला.

- Advertisement -

त्याच्यासह मनिष सुनील मुठेकर (वय २१) हादेखील याच ठिकाणाहून खाली कोसळला असून तो जखमी आहे. त्यांच्या सहकार्‍यांनी तातडीने या घटनेची माहिती मालेगावी कळवली. त्यानुसार घटनास्थळी मुल्हेर आणि जायखेडा पोलिसांनी धाव घेतली. मालेगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी हेदेखील या मुलांना वाचविण्यासाठी मालेगावहून साल्हेर किल्ल्याजवळ दाखल झाले होते. जखमीला पाठीवर बसवून त्यांनी अवघड वाटांवरून त्याला खाली आणले. अन्य तरुणांनाही सुखरूप वाचवण्यात आले. मृत तरुणाचा मृतदेह मगरबारी गणपती परिसरात आढळून आला. साल्हेरचे सरपंच मधुकर भोये यांनी जायखेडा पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार जायखेडा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी व पोलीस नाईक रवी भामरे पुढील तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -