घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रइगतपुरीत ११० कोटींचा जमीन अपहार

इगतपुरीत ११० कोटींचा जमीन अपहार

Subscribe

इगतपुरी : तालुक्यातील तळेगाव शिवारातील मानस रिसॉर्ट परिसरात असलेल्या ३० एकर जागेचा विकास करण्यासाठी मुंबईतील सिल्व्हर स्टार लॅण्ड डेव्हलपर्स अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीला जबाबदारी देण्यात आली, मात्र संबंधित कंपनीच्या संचालकांनी जागा विकसित न करता या जमिनीचे बनावट दस्तावेज तयार करून गहाण खत करून मुंबईतील बँकेकडे ही जमीन गहाण ठेवून तब्बल ११० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी इगतपुरी पोलिसांत आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, मानस रिसोर्टचे मालक नितीन मनोहर करंबळेकर (वय ६२, रा. मानस रिसॉर्ट, तळेगाव शिवार, ता. इगतपुरी, जि. नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, कौशल मुकेश दोशी, मुकेश मगनलाल दोशी, अंकित महेश दोशी, स्वप्निल अनिल कुलकर्णी, दीपक देवजी गायकर, नीलेश हर्षदराय मोदी, दर्शन नितीनकुमार धामी, जतिन योगेश मेहता या संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करंबळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मालकीच्या मानस रिसॉर्टजवळ ३० एकर १९ गुंठे जागा असून ही जागा विकसित करण्यासाठी २०१५ मध्ये त्यांनी मुंबई, सांताक्रुझ येथील सिल्व्हर स्टार लॅण्ड डेव्हलपर्स अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीचे संचालक कौशल दोशी यांना अटी-शर्ती ठरवून सामंजस्य करार करून विकसित करण्यासाठी दिली.

- Advertisement -

दरम्यान, जुलै २०२२ मध्ये करंबळेकर यांनी जमीन विकसित न करण्याबाबत विचारणा केली असता संशयित दोशी यांनी वारंवार उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे शंका बळावल्याने करंबळेकर यांनी या संदर्भात चौकशी केली असता त्यांना फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले.

संशयितांनी या दरम्यान, मुंबईतील न्यू इंडिया को. ऑप. बँकेकडे त्यांच्या असलेल्या गहाण मालमत्ता मुक्त करून करंबळेकर यांची जमीन त्यांच्या संमतीशिवाय गहाण ठेवली. तसेच, संशयितांनी सामंजस्य करारातील अटी-शर्तींचा भंग करून करंबळेकर यांची ११० कोटी रुपयांत फसवणूक केली आहे. या प्रकरणी आता इगतपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -