घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकाझीपुरा : विविध समाजांच्या सलोख्याचे साक्षीदार

काझीपुरा : विविध समाजांच्या सलोख्याचे साक्षीदार

Subscribe

ऐतिहासिक कालखंडाचा विचार करता यादव काळात हिंदू-आदिलशाही व मोगल कालखंडात मुस्लीम, पेशवेकाळात हिंदू व इंग्रजांच्या काळात सर्वधर्म-समभावाची नागरी वस्ती नाशिकमध्ये स्थिरावली. नाशिकचा दक्षिण भाग मुस्लीम नाशिक म्हणून ओळखला जात असे. वाकडी बारव चौकातून सरळ गेले की, काझीपुरा, बागवानपुरा हे रस्ते एकत्र येतात. (जयाजी कमोद व संत नामदेव पथ, आदर्श रस्ता व बुरड आळी रस्ता) जुन्या नाशिकमध्ये प्रवेश करताना मुस्लीम काळी भव्य दरवाजा होता. काझीपुरा वेस या नावाने वेशीचा उल्लेख होत असे. बागवानपुरा आणि राजवाडा रस्ते जिथे एकत्र येतात, त्याठिकाणी भगूर दरवाजा वेस होती. ती कालौघात नाहीशी झाली. परंतु नाव मात्र कायम आहे. भगूर दरवाजा अस्तित्त्वाचा पुरावा देण्याइतपत आजही उभा आहे.

चौकमंडई येथून नाशिक-पुणे, नाशिक-मुंबई, नाशिक-देवळाली-भगूर या मार्गावर मोटार गाड्या उपलब्ध होत्या. भगूरकडे जाणारा रस्ता म्हणून भगूर दरवाजा नाव होते. काझीवस्ती, काझीपुरा व बागवान मणीयार समाजाची वस्ती बागवान भागात होती. बागवान या विभागातील मुस्लीम मंडळी मोहरमच्या दिवशी ताबुताची मिरवणूक काढतात. काझीपुरा पोलीस चौकी आजही आहे. या परिसरात एक छोटे मारूती मंदिर आहे. ताबुताच्या वेळी मंदिरातील हा मारूती पडदा टाकून झाकावा, असा फतवा मुस्लीम मंडळींनी काढला होता. या प्रकारास तीव्र विरोध झाल्याने हा फतवा नाकारला गेला आणि या कारणास्तव तणाव निर्माण होऊन दंगल झाली. त्याचे पडसाद सर्व गावभर दंगली होण्यात झाले. त्या काळात या भागात मुस्लीमसंख्या जास्त होती. इतर समाजाची मंडळी दंगलकाळात आजूबाजूच्या वस्तीवर आश्रयाला गेली. तथापि, मारूती मंदिराशेजारील वाड्यात वास्तव्य करणारे गोकुळशेठ राय व त्यांचा परिवार निर्धाराने तेथेच थांबला. गोकुळशेठ राय हे दोन्ही समाजात आदरणीय होते. हा सर्व परिवार दंगलीत संपला, अशा अफवा गावभर पसरल्या होत्या. शांतता प्रस्थापित झाल्यानंतर आतून मारूती मंदिराच्या केलेल्या विध्वंसाची घटना भविष्यात पुन्हा उसळेल, या जाणीवेने दोन्ही गटात समझोता झाला. कलाल मंडळी सांगतील तशा रचनेचे मारुती मंदिर उभारून द्यावे, असा पर्याय सुचविण्यात आला. तसा समजूतदारपणा मुस्लीम मंडळींनी दाखवला. मंदिर नव्याने बांधून दिले. एकप्रकारे दंड स्वीकारला. यास्तव या मारूती मंदिरास दंडे हनुमान नावाने ओळखले जाऊ लागले. या चौकात रंगपंचमीसाठी साधारण १४ बाय १४ व आठ फूट खोल असलेली राहाड होती व दोन पायर्‍या होत्या. वेशीप्रमाणेच रस्त्याखाली राहाडीचे अस्तित्व नष्ट झाले.

- Advertisement -

मुस्लीम सैन्यात काही मुलतानी मुस्लीम मंडळी होती. त्यांच्या नमाजासाठी असलेली मशीद काझीपुर्‍यामागे असून, हा भाग मुलतानपुरा म्हणून ओळखला जातो. या भागात १९२० पासून सामाजिक कार्यात निःस्वार्थ व सचोटीने काम करणारे यासीन मास्तर नावाचे कार्यकर्ते महमद यासीन चांदसाहेब १९५२ च्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले. जकात उत्पन्नात एक लाखाची भर घालणारे कार्यक्षम सभापती म्हणून त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांचा दुधाचा व्यवसाय असल्याने त्यांनी अलिशान सभागृहासारखा म्हशीचा गोठा बांधला होता. जनावरांचे शेण व मूत्र तत्काळ स्वच्छ करण्यासाठी त्या काळाची चांगली यंत्रणा त्यांनीच तयार केली.

हे लिहिण्याचे कारण म्हणजे गावातील नागरिकांच्या झुंडीच्या झुंडी हा तबेला पाहण्यासाठी जात असत. या तबेल्याच्या मागे शहरातील तमाम नामदेव शिंपी मंडळीचे विठ्ठल रखुमाई व संत नामदेवांचे मंदिर आहे. कथा, कीर्तन, प्रवचनाचे कार्यक्रम अखंडित होत असतात. काझीपुरा रस्त्याला संत नामदेव पथ नाव देण्यात आले. ख्यातकीर्त ठाकूर सराफांची सोन्या-चांदीची पेढी दोन शतकांहून अधिक काळ आजही या भागात सेवारत आहे. काझीपुरा वेशीकडून समोरचा रस्ता पूर्वीचा बागवानपुरा या विभागात माळी समाजातील सेवाभावी वृत्तीचे निरलस, नि:स्वार्थ नेतृत्व म्हणजे जयाजी चिमाजी कमोद. शेती व्यवसायाबरोबरच प्रसिद्ध हाडवैद्य असा त्यांचा लौकिक होता. त्यांचा सुदर्शन लेप प्रसिद्ध होता. जयाजी कमोद १५ वर्षे नगरपालिकेच नगरसेवक म्हणून निवडून येत होते. त्यांच्या कार्याचा गौरव बाबाराव सावरकर यांनी केला होता.
चौकमंडईमधील वाकडी बारवेवरील सुंदर कारंजा व नाशिकच्या पंपिंग स्टेशनची उभारणी ही त्यांची कामे संस्मरणीय झाली. जुन्या नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ संगमरवरी शिलान्यासावर त्यांच्या नावाची दखल घेण्यात आली. अशा या असामान्य कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वामुळे बागवानपुरा रस्त्यास जयाजी कमोद मार्ग नाव देऊन जुन्या नाशिककरांपुढे त्यांची स्मृती कायम ठेवली.

- Advertisement -

नाशिकचे प्रसिद्ध धन्वंतरी, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा वारसा त्यांचे नातू डॉ. कैलास कमोद व प्रमोद कमोद आजही समर्थपणे सांभाळीत आहेत. भगूर दरवाजा विभागातील कोंबडीवाला बिल्डिंगमध्ये प्राथमिक शाळा प्रसिद्ध होती. भगूर दरवाजाचे सन्मुख असलेला भाग म्हणजे राजवाडा. जुन्या नाशिकच्या गावाबाहेर हद्द संपताना दलित मंडळींची वसाहत असलेल्या भागाचा उल्लेख राजवाडा या नावाने केला जात असे.

(संदर्भ : सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे लिखित चौकांचा इतिहास पुस्तकातील लेख)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -