घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशहरात रंगला रावण दहन सोहळा; डिजिटल रावणाचे विशेष आकर्षण

शहरात रंगला रावण दहन सोहळा; डिजिटल रावणाचे विशेष आकर्षण

Subscribe

पंचवटी : दहा तोंडांचा तब्बल ६० फुटी भलामोठा रावण, दहनाचा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित प्रचंड गर्दी आणि त्यानंतर आतषबाजी.. अशा वातावरणात बुधवारी (दि.५) शहरभराच्या विविध भागांत रावण दहनाचा सोहळा रंगला होता. पंचवटीत गोदाकाठी चतुःसंप्रदाय आखाड्याच्या श्री व्यंकटेश बालाजी मंदिर आयोजित रावणाचा पुतळा सर्वांचेच आकर्षण ठरला.

आखाड्याचे तत्कालीन महंत दीनबंधुदास महाराज यांनी १९६७ ला रामकुंड परिसरात प्रथम रावणदहन सुरू केले. त्यानंतर ही परंपरा महंत कृष्णचरणदास महाराज यांनी पुढे सुरू ठेवली. गेली दोन वर्षे कोरोनामुळे निर्बंध असल्याने ही परंपरा खंडीत झाली होती. यंदा मोठ्या उत्साहात रावणदहनाची तयारी करण्यात आली होती. मूर्तीकार सुनील मोदवाणी हे रावणाचा दहातोंडाचा साठ फूटी उंचीचा प्रतिकात्मक पुतळा तयार केला.

- Advertisement -

बालाजी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. त्यात श्री भगवान व्यंकटेश बालाजी, भगवती श्रीदेवी व भूदेवी यांची मिरवणूक काढण्यात आली. बालाजीचा विवाह सोहळा साजरा करण्यात आला. ग्रंथराज श्रीमद् दासबोध सामुदायिक पारायण करण्यात आहे. विजयादशमीला रावणदहनाच्या अगोदर पंचवटी परिसरात वानरसेनेसह राम, लक्ष्मण, हनुमान, रावण, बिभिषण यांची वेशभूषा करून परंपरेनुसार मिरवणूक काढण्यात आली होती. यात प्रभू श्रीरामाची वेशभूषा आदित्य शिंदे, लक्ष्मण – यश कोठावदे, रावण छोटू आढळकर, हनुमान- विवेकानंद घोडके यांनी पात्र सादर केले होते. मिरवणुकीनंतर रामकुंड परिसरात फटाक्यांची आकर्षक आतषबाजी करण्यात आली होती. मान्यवरांच्या उपस्थितीत रावणदहन केले जाणार असल्याचे महंत कृष्णचरणदास महाराज, सागर कापसे, कृष्णकांत नेरकर, रवी आवारकर, शाम गंदे, नंदकुमार बैरागी, सोनु ब्रिजवासी व बालाजी भक्त मंडळाने सांगितले.

गंगापूर रोडला डिजिटल रावणाचे दहन

गंगापूररोडवरील श्री तुळजाभवानी मंदिर शारदीय नवरात्र उत्सवांतर्गत विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता ६० फूट उंच रावणाचे दहन करण्यात आले. या रावणाचे वैशिष्ठ्य म्हणजे रात्रीच्या वेळी रावणाचे डोळे, मुखवटा आणि हात चमकावेत यासाठी डिजिटल लाईटिंग लावण्यात आली होती. ढोल-ताशाच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी आणि श्रीरामाचा जयघोष करत रावण दहनाचा कार्यक्रम रंगला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे उपस्थित होते. यावेळी शस्त्रपूजनही करण्यात आले. आमदार सीमा हिरे, महेश हिरे व नगरसेवक योगेश हिरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी तुळजाभवानी मंदिर परिसरातीचे मैदान गर्दीने तुडूंब भरले होते. लांबलांबपर्यंत वाहने पार्क करण्यात आली होती.

- Advertisement -
सोहळ्याला उदंड प्रतिसाद

दोन वर्षांनंतर रावण दहनाचा सोहळा होत असल्याने गोदाकाठी, तसेच गंगापूर रोडवरील रावण दहन सोहळ्याला नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती. पंचवटीतील कार्यक्रमासाठी पंंचवटी पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मालेगाव स्टँडसह इंद्रकुंड येथून रामकुंड परिसरात येणार्‍या रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -