घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

आइकें शरीर तरी एक । परी वयसाभेद अनेक। हें प्रत्यक्षचि देख । प्रमाण तूं ॥
आणखी असे पाहा की, शरीर तर एकच असते, पण वयपरत्वे त्यातदेखील भेद दृष्टीस पडतात, हे प्रत्यक्षच प्रमाण आहे.
एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यीं तें भ्रंशे । परी देहचि हा न नाशे । एकेकासवें ॥
त्याच शरीरात बालपण दिसते; पुढे तेच बालपण तारुण्यात नाश पावते, परंतु त्या प्रत्येकाबरोबर शरीरच काही नाहीसे होत नाही.
तैसीं चैतन्याच्या ठायीं । इयें शरीरांतरें होती जाती पाहीं । ऐसें जाणे तया नाहीं । व्यामोहदु:ख ॥
त्याचप्रमाणे, असे पाहा की, आत्म्याच्या ठिकाणी अनंत शरीरे उत्पन्न होतात व नाश पावतात असे जाणणारास मोहामुळे होणारे दुःख अनुभवावे लागत नाही.
एथ नेणावया हेंचि कारण । जे इंद्रियां आधीनपण । तिहीं आकळिजे अंत:करण । म्हणऊनि भ्रमे ॥
इंद्रियांच्या आहारी जाणे हेच हे तत्त्व न कळण्याचे कारण आहे. इंद्रिये मनाला विषयोन्मुख करितात, त्यामुळे ते संभ्रमीत होते.
इंद्रिये विषय सेविती । तेथ हर्ष शोक उपजती । ते अंतर आप्लविती । संगें येणें ॥
इंद्रिये विषय सेवन करितात त्यामुळे सुख-दुःखे निर्माण होतात; त्या आसक्तीमुळे ते विषय मनाला भ्रम पाडतात.
जयां विषयांच्या ठायीं । एकनिष्ठता कहीं नाहीं । तेथ दु:ख आणि कांहीं । सुखही दिसे ॥
ज्या शब्दादिक विषयांच्या ठिकाणी एक स्थिती कधीच नसते, तेथे वेळेनुसार सुख किंवा दुःख दोन्हीही भासतात.
देखैं शब्दाची व्याप्ति । निंदा आणि स्तुति । तेथ द्वेषाद्वेष उपजती । श्रवणद्वारें ॥
आता शब्दविषयाची व्याप्ती पहा की, जर कानांनी स्तुती ऐकिली तर समाधान होते आणि निंदा ऐकिली तर द्वेष उत्पन्न होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -