घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रएसीबीची जोरदार कामगिरी; तीन महिन्यांत ४४ छापे; ६९ जणांना अटक

एसीबीची जोरदार कामगिरी; तीन महिन्यांत ४४ छापे; ६९ जणांना अटक

Subscribe

नाशिक : लाच स्वीकारणे हा गुन्हा आहे, असे फलक शासकीय कार्यालयात दिसत असले तरी उत्तर महाराष्ष्ट्रात लाचखोरी थांबलेली नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग(एसीबी)च्या नाशिक, अहमदनगर धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यातील पथकांनी १ जानेवारी ते ३० मार्च २०२३ या कालावधीत टाकलेल्या तब्बल ४४ ठिकाणी छाप्यात ६९ जण लाच घेताना सापळ्यात अडकले. या ६९ जणांनी तीन कोटी रुपयांहून अधिक लाच घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक १७ छापे नाशिक जिल्ह्यात आहेत. पहिल्यांदाच शेतजमिनीच्या हिस्सा नमुना बारा या कागदावरील चूक दुरुस्त करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील अतिरिक्त उपसंचालक महेशकुमार शिंदेंसह कनिष्ठ लिपिक अमोल महाजन यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे.

नाशिक विभागात लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बहुतांश घटनांत सरकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचाराची कीड मोठ्या प्रमाणात पसरल्याचे चित्र आहे. हे सातत्याने लाचखोरीच्या घटनांनी अधोरेखित होत आहे. शर्मिष्ठ वालावलकर यांनी तीन महिन्यांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक विभागाचा पदभार स्विकारला. ८९ दिवसांत ४४ छापे टाकून लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या. या कामात टीमवर्क आहे. सर्वांना स्पेशल ब्रँचमध्ये असल्याची जाणीव करून दिली. जेव्हा केंव्हा गरज पडेल तेव्हा सर्व अधिकारी कारवाईसाठी उपस्थित राहतात. कारवायांमुळे तक्रारदारांचा विश्वास बसला आहे. त्यामुळे य विभागाकडे तक्रारींचा ओघ वाढला आहे. अनेक छापे शनिवारी व रविवारीसुद्धा करण्यात आले आहेत. ४४ छाप्यांमध्ये सर्वाधिक ९ छापे महसूल विभागातील असून, त्याखालोखाल पोलीस विभागातील आहे. लाचखोरीमध्ये वर्ग १ व वर्ग २ मधील अधिकारी वर्ग ३ व खासगी व्यक्तींमार्फत लाच स्विकारत असल्याचे समोर आले. यामध्ये वर्ग ३ मधील ३६ जणांना व १३ खासगी व्यक्तींना अटक केली आहे.

- Advertisement -
कार्यालयाबाहेर भेट

 तक्रारदार तक्रार दाखल करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात येत नसल्याने त्यांची ते सांगतील त्या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी भेट घेत माहिती घेतली जाते. प्रथम तक्रारदाराची कामी केली जातात. त्यानंतर अधिकारी संबंधित अधिकार्‍यासह कर्मचार्‍यावर कारवाई करतात.

लाच स्विकारणे हा गुन्हा आहे. कायदेशीर कामांसाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. तक्रारदारांनी 1064 क्रमांकावर किंवा नाशिक कार्यालयात संपर्क साधून तक्रार करावी, तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाईल. : शर्मिष्ठा वालावलकर, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक

विभागनिहाय कारवाई 
  • महसूल विभाग : ९
  • पोलीस : ७
  • जिल्हा परिषद : ५
  • पंचायत समिती : १
  • भूमी अभिलेख : ४
  • कृषी विभाग : ३
  • महानगरपालिका : १
  • महावितरण : १
  • आरोग्य विभाग : १
  • सहकार विभाग : ३
  • आरटीओ : १
  • विधी व न्याय विभाग : १
  • शिक्षण : १
  • राज्य उत्पादन शुल्क : १
  • ग्रामविकास : १
  • खाजगी व्यक्ति : १
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -