घरफिचर्सदुसर्‍या आणीबाणीचा वास का येतोय?

दुसर्‍या आणीबाणीचा वास का येतोय?

Subscribe

मुंबई मराठी पत्रकार संघाचा पत्रकार दिन नुकताच पार पडला. या दिवशी वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पत्रकारांना संघातर्फे विशेष पुरस्काराने गौरविण्यात येते. माझे आपलं महानगरमधील आजी आणि माजी तरुण सहकारी सौरभ शर्मा आणि अजयकुमार जाधव यांना या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. सौरभ आणि अजय यांनी वर्षभरात केलेल्या धावपळीचा धावता पट झरझर डोळ्यांसमोरून पुढे गेला. सौरभच्या शैक्षणिक क्षेत्रातील आणि अजयच्या नागरी समस्यांना वाचा फोडणार्‍या बातम्यांचा मी साक्षीदार ठरलो. याचा मोठा आनंद होता. मनापासून सुखावलो. 2009 मध्ये मलाही मुंबई मराठी पत्रकार संघाचाच शोध पत्रकारिता पुरस्कार मिळाला होता. समाजमनावर प्रभाव पडणार्‍या बातम्यांची दखल घेतली गेली की फिल्डवर धावणार्‍या पत्रकाराच्या आत्मविश्वासात कमालीचा फरक पडतो, हे मी अनुभवाने सांगू शकतो. यावेळी मी संघाचा उपाध्यक्ष म्हणून आयोजकांच्या भूमिकेत होतो. सप्तर्षी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना सौरभ आणि अजयच्या डोळ्यातील चमक काळजाच्या एका कोपर्‍यात समाधानाचा ओलावा देत होती. मन मात्र त्या दिवशी अस्वस्थ होते. ’ मला दुसर्‍या आणीबाणीचा वास येतोय’, हे सप्तर्षी सरांचे वाक्य डोक्याचा भुगा करणारे होते.

सप्तर्षी म्हणजे या देशाचा चालबोलता इतिहास. 50 वर्षांपेक्षा अधिक काळ स्वतः ला झोकून देऊन सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आरोग्य आणि संघटनात्मक काम करणारे 78 वर्षांचे तरुण! त्यांची लेखणी आणि वाणीही तितकीच धारदार… आपल्या मतांवर 1960 सालीही ठाम राहणारी आणि आता पाच दशकांनंतरही त्यात बदल नाही. सव्वा तासांच्या संवादात त्यांनी इंदिरा गांधींची आणीबाणी उभी केली आणि नरेंद्र मोदी यांच्या काळातील अघोषित आणीबाणीचा पटही नीट समजावून सांगितला. सरांमध्ये मला कायम एक गुरुजी दिसले आहेत. राष्ट्र सेवा दल असो की युक्रांद (युवक क्रांती दल) समोरच्या युवकांना भारावून टाकणारा त्यांचा संवाद कायम लक्षात राहिलेला आहे. भूतकाळाची पाने उलगडत वर्तमानकाळाचे केलेले पोस्टमार्टम आणि भविष्याचा दिलेला इशारा सरांच्या संवादातून व्यक्त होतो तेव्हा या लोकशाही देशाचा एक नागरिक म्हणून स्वतःला तपासून घेता येते. सर स्वतःही डॉक्टर असल्याने त्यांना पेशंटच्या नाडीचा तसाही अचूक अंदाज आहे. देशाच्या नाडीचे ठोके किती वेगाने वाजतायत, हे तेच अधिकार वाणीने सांगू शकतात आणि त्यांनी सध्याच्या अस्वस्थ वर्तमानाचा एक्सरे काढत ते दाखवून दिले…

- Advertisement -

आणीबाणीच्या काळात सरांनी इतरांच्या तुलनेत तसा मोठा काळ तुरुंगवास भोगला. इंदिरा गांधींचे सरकार त्यांना खूप घाबरत होते, याचा हा पुरावा आहे. जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचा नारा देत आणीबाणीची राजवट उलथवून लावत देशाला पहिल्यांदा काँग्रेससमुक्त केले. त्याआधी त्यांनी प्रथम या देशाच्या लोकांशी संवाद साधला. थेट सर्वसामान्यांच्या मनाला हात घातला होता. सप्तर्षी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हेच काम केले. महाराष्ट्रातल्या कानाकोपर्‍यातील लोकांना इंदिरा गांधींची हुकुमशाही राजवट काय आहे आणि तुम्हाला संविधानाने दिलेल्या अधिकारांवर कसा घाला घातला जात आहे. हे निगुतीने समजावून सांगितले. ‘गरीबी हटाव’ म्हटले म्हणून गरीब दारिद्राच्या खाईतून बाहेर येत नाही. त्याला प्रत्यक्ष हात द्यावा लागतो, हे लोकांना पटवून दिले. सप्तर्षी आणि त्यांच्या देशभरातील असंख्य ’साथीं’च्या या स्वतःला झुगारून देत लोकांशी केलेल्या संवादामुळेच 1977 मध्ये काँग्रेसला धडा शिकवत भारतीय जनतेने जनता पक्षाच्या हातात जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची सूत्रे दिली होती… आताही तशीच वेळ आली आहे.

धर्म, मंदिर आणि गाईंच्या नावाखाली देशाला मनुवादाकडे नेले जात असेल तर हे ठरवून चाललेले कट कारस्थान आहे. नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बागेतून या सार्‍या कटाची सूत्रे हलत आहेत. हे जनतेला सांगायला हवे. नाव विकासाचे, पण प्रत्यक्ष काम माणसामाणसांमध्ये भेदभाव करण्याचा या सरकारचा डाव आता लोकांना नीट समजवायला हवा, असे सप्तर्षी पोटतिडकीने सांगतात, तेव्हा गेल्या साडेचार वर्षातील भुलभुलैय्या डोळ्यासमोरून झरझर सरकत असतो… लोकांना हे सारे पटवून देणारा संवाद वाढला पाहिजे. सुजाण नागरिकांनी पुढे आले पाहिजे. पत्रकारांनी जागल्याची भूमिका घ्यायला हवी! तरच बदल शक्य आहे. भाजप नको म्हणून मी काँग्रेसला मतदान करा, असे म्हणणार नाही. पण, पुन्हा मोदी सरकार नको, भाजप नको. तुम्हाला या घटकेला न्याय देऊ शकेल असा पर्याय द्या.

- Advertisement -

न्यायव्यवस्था, तपासयंत्रणा, रिझर्व्ह बँक, संविधान, देव धर्म, अन्न पाणी आणि शिक्षण या तुमच्या आमच्या जीवन मरणाच्या गोष्टींची उलतापालथ होत असेल तर या देशात मोठी गडबड सुरू आहे… देश हुकूमशाहीकडे चालला आहे, याचे भान सप्तर्षी देतात तेव्हा दुसर्‍या आणीबाणीचा वास का येतोय, हे त्यांचे म्हणणे नीट पटत जाते.

पंतप्रधान मोदींच्या बाबतीत सप्तर्षी यांचे निरीक्षण खूप महत्वाचे आहे. गुजरातला ते आधी नकोसे होते. पण, लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांना तेथे रुजवले. गंमत बघा ज्या माणसाने त्यांना मोठे करण्याचा राजमार्ग मिळवून दिला, त्या अडवाणी यांच्याकडे मोदी ढुंकूनही बघत नाहीत आणि आपल्या पक्षातील मोठा असो की लहान त्याला किंमत द्यायची नाही. हा प्रकार म्हणजे पक्षापेक्षा आपण मोठे आहोत, हा हुकूमशाहीकडे जाणारा प्रवास आहे. हिटलरनेही आपली दहशत पसरवताना नंतर आपल्या नाझी पक्षालाही महत्व दिले नाही. तेच नंतर मुसोलिनीने केले. गुजरातमध्ये आपले नेतृत्व प्रस्थापित करण्याच्या मोदींच्या काळात तेथे मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. युक्रांदच्या कार्यकर्त्यांनी हा सारा भयानक प्रकार आपल्या डोळ्यांनी पहिला आहे. आणि दंगलीनंतर मोदींच्या नावाने नवरात्रोत्सव झाले. त्यांच्या नावाने आरत्या केल्या गेल्या. सर्वात कळस म्हणजे ‘ओम नमो नमाय…’ असे समोरच्याला डोळे वटारून सतत सांगितले जायचे आणि एकदा माणसाला देवत्व बहाल केले की तो माणूस तुमच्या आमच्यासारखा हाडामासांचा राहत नाही.

मोदींचे हे हिटलरशाहीचे दिवस असेच राहतील, असे होणार नाही, असा विश्वास सप्तर्षी व्यक्त करतात. जगात शाश्वत आणि नश्वर असे दोन प्रकार आहेत. नश्वरता ही प्रासंगिक आहे. या नश्वरतेचे मोदी हे सर्वोच्च बिंदू असून ती संपणार आहे. मावळतीकडे प्रवास सुरू झाला आहे. हा प्रवास कदाचित त्यांना कळला असावा म्हणून त्यांना आता आपल्या मित्रपक्षांची आठवण होत असावी. मात्र 2014 मध्ये लोकसभेत 271 जागांवर बहुमत मिळवून या देशाची लोकशाही व्यवस्था मोडून काढण्याची हुकूमशाही करणार्‍या भाजपची आता 180 जागांपर्यंत मजल जाणे शक्य नाही. म्हणूनच आता लोकांनी 2019 ला नवा पर्याय द्यायला हवा.

सप्तर्षी काय सांगतात याचे ताजे उदाहरण तपासून घ्यायचे झाले तर यवतमाळला शुक्रवारपासून सुरू होणार्‍या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या उद्घाटकावरून उठलेल्या वादळाकडे पाहिले पाहिजे. लेखिका नयनतारा सहगल यांना आधी बोलावले आणि नंतर त्यांना निमंत्रण नाकारण्यात आले. का तर या लेखिका व्यासपीठावरून सध्या सुरू असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीविरोधात रान उठवून राडा करतील, ही भीती होती आणि ही भीती कोणाला वाटते? सत्ताधार्‍यांना की त्यांच्या पैशांवर संमेलन भरवणार्‍या आयोजकांना. या विरोधात आवाज उठवून सुजाण साहित्यिक आणि लेखकांनी बहिष्कारचे शस्त्र उगारल्यानंतर मधू मंगेश कर्णिक यांच्यासारखी कायम सरकारी छत्रछायेखाली वावरणारी मंडळी ‘या रे या’ म्हणून लेखकांना संमेलनसाठी बोलावणार? हा ढोंगीपणा उघड्यावर आणला पाहिजे. सप्तर्षी सांगतात त्याप्रमाणे प्रत्येक सुजाण नागरिकाने दुसर्‍याशी संवाद साधत ‘मला आणीबाणीचा वास येतोय ’हे सांगितले पाहिजे. पत्रकारांबरोबर समाजावर प्रभाव पाडू शकणार्‍या प्रत्येक व्यक्तीवर आता लोकांना खरी बाजू सांगायची वेळ आलेली आहे. आणि तसे आपण सर्व व्यक्त झालो नाही तर लोकशाहीची शोकांतिका झालेली असेल…

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -