घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रलिफ्ट मागून गाडीत बसल्यावर प्रसादातून द्यायचे गुंगीचे औषध, निर्मनुष्य ठिकाण येताच करायचे...

लिफ्ट मागून गाडीत बसल्यावर प्रसादातून द्यायचे गुंगीचे औषध, निर्मनुष्य ठिकाण येताच करायचे लूटमार

Subscribe

नाशिक : महामार्गावर एकटा चालक दिसताच प्रवासाच्या बहाण्याने कारमध्ये बसून गुंगीचे औषधे देवून कारसह दागिने, रोकड लंपास करणार्‍या टोळीला नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकने सापळा रचून अटक केली. या टोळीने संभाजीनगर, पालघर, नाशिकसह इतर ठिकाणी चालकांना गुंगीचे औषध देवून कार घेवून पळ काढल्याची कबुली दिली. पोलिसांनी या टोळीकडून तीन कारसह लुटीचे दागिने, मोबाईल जप्त केले आहे. पोलिसांनी महिलेसह चौघांना मंगळवारी (दि.२४) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

काजल उगरेज (रा. रामवाडी, नाशिक), निलेश राजगिरे (रा. ओझर, ता. निफाड), किरण वाघचौरे (रा. जेलरोड, नाशिक), मनोज पाटील (रा. ओझर, ता. निफाड), दिनेश विजय कबाडे (रा. जत्रा हॉटेलच्या मागे, आडगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना तांत्रिक माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपी निलेश राजगीरे याचा ठावठिकाणा समजला. पोलिसांनी त्याला सापळा रचून त्याला सोमवारी (दि.२२) अटक केली. पोलीस चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने लुटमारीच्या गुन्ह्यात महिलेसह मुख्य आरोपी दिनेश कबाडे व आणखी दोन साथीदार असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी महिलेसह दोघांना अटक केली.

- Advertisement -

पोलिसांनी सापळा रचून सोमवारी (दि.२२) मुख्य आरोपी दिनेश कबाडे यास जेलरोड भागातून स्विप्ट (एम एच १९-बीयु ६५८५)सह ताब्यात घेतले. त्यावेळी पोलिसांना त्याच्याकडे गुंगीकारक औषधे मिळून आली. दिनेश कबाडे याने काजल उगरेजसोबत रविवारी (दि.२१) रात्री एका अनोळखी पुरुषास पुन्हा गुंगीकारक औषध देवून त्याला लुटले. त्यानंतर त्याची त्याची कार पळविल्याचे सांगितले. पोलिसांनी वेगाने तपास करत काजल उगरेज हिला मंगळवारी (दि.२३) सकाळी ताब्यात घेतले. तिच्याकडेसुद्धा पोलिसांना गुंगीकारक औषधे मिळून आली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, रवींद्र बागूल, पोलीस हवालदार प्रविण वाघमारे, नाझीम पठाण, धनंजय शिंदे, विशाल देवरे, विशाल काटे, महेश साळुंके, आप्पासाहेब पानवळ, मुख्तार शेख, सुरेश माळोदे, योगीराज गायकवाड, मनोज डोंगरे, रावजी मगर, चालक किरण शिरसाट, समाधान पवार यांनी केली.

अशी आहे मोडस ऑपरेंडी

संशयित आरोपी काजल उगरेज आणि तिचे साथीदार कारमध्ये एकटाच चालक असल्याचे हेरायचे. त्यासाठी ते महामार्गावर सावज हेरण्याचे काम करायचे. काजलने एका कारचालकास सायंकाळी 6.30 वाजेदरम्यान हात दाखवून कार थांबवण्यास सांगितले. चालक थांबत त्याला कोठे जाणार आहात, अशी विचाराले. चालकाने धुळे सांगितले ती मालेगावाला जायचे आहे, असे ती सांगायची. त्यानंतर ती आणि तिचे चार साथीदार कारमध्ये बसायचे. रात्रीच्यावेळी महामार्गालगतच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबायचे. चालकाची नजर चुकवून आरोपी पाण्याच्या बॉटलमध्ये गुंगीचे १० गोळ्यांचे एकच औषध टाकायचे. त्यानंतर पुढील प्रवासाला निघायचे. चालकाला रस्त्यालगत गाडी थांबावयला सांगायचे. तितक्यात चालक बेशुद्ध व्हायचा. त्यानंतर आरोपी चालकाकडील सोने व कार घेवून पळून जायचे.

- Advertisement -

देवीचा प्रसाद म्हणून पेढ्यातून दिले गुंगीचे औषध

१२ मे रोजी रात्री 8.३० वाजेदरम्यान काजल हिने बापू किसन सूर्यवंशी (रा. सावतानगर, सिडको, नाशिक) यांना कॉल करून सूरत येथे जायचे आहे, असे सांगितले. त्यानुसार सूर्यवंशी हे महिलेने सांगितल्याप्रमाणे हॉटेल सायबाजवळील अमृततुल्य दुकानासमोर दिंडोरी रोड, नाशिक येथे गेले. त्यावेळी कारमध्ये काजल बसली. वणी येथे तिच्या अनोळखी मित्र कारमध्ये बसले. त्यांनी सूर्यवंशी यांना देवीचा प्रसाद म्हणून गुंगीचे औषध टाकलेला पेढा दिला. तो पेढा खाल्याने सूर्यवंशी बेशुद्ध झाले. त्यानंतर महिलेसह चौघांनी सूर्यवंशी यांची कार व त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व पाकीट असा एकूण १ लाख ९१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून सर्व जण पळून गेलेे. याप्रकरणी बापू सूर्यवंशी यांनी म्हसरूळ पोलीस तक्रार दाखल केली. त्यानुसार म्हसरूळ पोलीस व गुन्हे शाखा युनिट एकने समांतर तपास सुरु केला.

महिला आहे लुटमार करणाऱ्या टोळीची प्रमुख

संशयित आरोपी काजल उगरेज ही रामवाडी, पंचवटी येथे राहते. ती विवाहित असून, तिला तीन मुले आहेत. तिचा पती तुरुंगात आहे. तिने लुटमारी मुख्य आरोपी दिनेश कबाडे यांच्या मदतीने टोळी तयार केली.

महत्वाच्या बाबी 

  • टोळीने म्हसरूळ, आडगाव, कासा पोलीस ठाणे (जि.पालघर), वाकुंज पोलीस ठाणे (जि. संभाजीनगर) येथे कारचालकांना गुंगीचे औषध देवून कारसह दागिने, मोबाईल, घड्याळ, रोख रक्कम लंपास केली.
  • मुख्य आरोपी दिनेश विजय कबाडेवर कनबा पोलीस ठाणे, अहमदाबाद, गुजरात येथे खून, लुटमारीसह गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
  • किरण एकनाथ वाघचौरे याच्यावर सिटी पोलीस ठाणे, श्रीरामपूर येथे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
    चोरी केलेली वाहने आरोपी मिळेल त्या किंमती विक्री करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
  • पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून तक्रारदार सूर्यवंशी यांची सियाज कार (एमएच ०४-एच एफ ७३९१) व लुटलेले २९ ग्रॅम सोने जप्त केले. शिवाय, स्विप्ट कार (एम एच१९-बीयु ६५८५), ब्रिझा कार (बनावट क्र. एम एच १५-जी आर ५६३२) जप्त केल्या आहेत.
  • लुटारू टोळीने आडगावमध्ये फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने एका पुरुषाला गुंगीचे औषधे दिले. त्याच्याकडील १३ ग्रॅम सोने, घडयाळ व मोबाईल लंपास केला होता. तो सर्व चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -