घरमनोरंजनलोककलेचा सारथी हरपला

लोककलेचा सारथी हरपला

Subscribe

गुरु पार्वतीकुमार यांच्या तालमीत जे नृत्य दिग्दर्शक घडले त्यात रमेश पुरव हे एक होते. शास्त्रीय आणि लोकनृत्य या दोन्ही कलाप्रकारांचे मार्गदर्शन पुरव यांना लाभले होते. परंतु पुरव यांनी यातल्या लोककलेला आपलेसे केले. निळा कोल्हा, पंचतंत्र, हयवदन, सुजलाम सुफलाम भारत, दुर्गा झाली गौरी आदी लोकप्रिय कलाकृतींचे दिग्दर्शन पुरव यांनी केले होते. त्यांचा लोककलेतला नर्तक, नृत्य दिग्दर्शक असा प्रवास लक्षात घेतला तर त्यांनी या कलेसाठी अविरतपणे काम करण्याचे ठरवले होते. त्यामुळे त्यांच्या तालमीत तयार झालेल्या अनेक शिष्या नृत्याच्या प्रांतात काम करीत आहेत. शास्त्रीय नृत्यांबरोबर लोककलेचीही जपणूक ही शिष्यमंडळी करत आहेत. अशा पुरव सरांचे वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांच्या कला प्रवासाचा घेतलेला मागोवा.

नृत्य नाटक म्हटलं की साधारण पाच दशकांपूर्वी अमराठी नृत्य दिग्दर्शकांचे वर्चस्व अधिक पहायला मिळत होते. पौराणिक, ऐतिहासिक इतकेच काय तर राष्ट्रीय नेत्यांवर नृत्यनाट्य दिग्दर्शित करण्याची जबाबदारी या अमराठी नृत्य दिग्दर्शकांकडे सोपवली जात होती. आचार्य पार्वतीकुमार यांनी खर्‍या अर्थाने मराठीत नृत्य नाटकाला संजीवनी दिली. जगभरातील प्रेक्षकांनी दखल घ्यावी असा प्रयत्न पार्वतीकुमार यांनी आपल्या सादरीकरणात केला. शास्त्रीय नृत्याचा सुरेख वापर त्यांनी आपल्या नृत्य नाटकात केला. उतरत्या वयात त्यांचे निरीक्षण, संकल्पना रंगमंचावर अविष्कारित करण्याची जबाबदारी त्यांच्या सान्निध्यात जे अनेक कलाकार आले त्यांच्यावर होती. त्यात रमेश पुरव हे नर्तक, नृत्य दिग्दर्शक त्यांच्याबरोबर अखेरपर्यंत होते. दुर्गा झाली गौरी ही अजरामर कलाकृती पार्वतीकुमार यांच्या संकल्पनेतून, दिग्दर्शनातून पुढे आली. त्यात पुरव हे अधिक सक्रिय होते. पुढे त्यांनी स्वतंत्रपणे कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन केले, शिवाय भारतभर लोकनृत्याच्या कार्यशाळा घेऊन लोककलेचा प्रचार आणि संवर्धन कसे होईल हे त्यांनी पाहिले होते. आज नृत्याच्या क्षेत्रात आणि कलेच्या प्रांतात नावाजलेले जे कलाकार आहेत, त्यांना पुरव सरांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. सुकन्या कुलकर्णी, किशोरी शहाणे, शिल्पा नवलकर, प्रमोद पवार, डॉ. संध्या पुरेचा, मेघा परब, देवेंद्र शेलार अशा कितीतरी कलाकारांची नावे सांगता येतील ज्यांनी पुरव सरांना आपल्या गुरुस्थानी स्थान दिलेले आहे.

लोककला म्हणजे मोकळा अविष्कार. त्या त्या समाजाच्या परंपरेचे, संस्कृतीचे प्रतिबिंब त्यात दडलेले असते. प्रत्येक लोककलेमध्ये उत्साह असला तरी त्यात श्रद्धाही तेवढीच असते. वेशभूषा, रंगभूषा या सार्‍या गोष्टी त्यात असल्या तरी त्यातसुद्धा शास्त्रशुद्ध असे शिक्षण असते हे पुरव सरांनी खर्‍या अर्थाने बिंबवले आणि त्यादृष्टीने शिष्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. आज लोकनृत्याचा जगभर गाजावाजा होतो, त्यात पुरव सरांचे मोठे योगदान आहे हे विसरता येणार नाही. विजया मेहता यांनी ‘हयवदन’ या नाटकाचे दिग्दर्शन करायला घेतले, तेव्हा त्यात थोडाफार लोककलेचा संदर्भ होता. जर्मनीतल्या महोत्सवात हे नाटक सादर केले जाणार होते. लोककलेचा चुकीचा संदर्भ या नाटकाच्या निमित्ताने लोकांपर्यंत जाऊ नये यासाठी मेहता यांनी पुरव सरांची निवड केली होती. इतकेच काय तर पुढे जर्मनमधल्या कलावंतांना लोककलेचे शिक्षण द्यायचे ठरले, त्यासाठीसुद्धा पुरव सरांना तिथे पाठवले होते. पद्मश्री क्रांती शहा यांनी स्थापन केलेल्या युवक बिरादरीचा तीस वर्षांपूर्वीचा सुरुवातीचा काळ होता. सांस्कृतिक कार्यक्रम करायचे आणि त्यातून मिळणार्‍या निधीतून सामाजिक कार्य करायचे अशा हेतूने भारत परिक्रमा आणि महाराष्ट्र दर्शन या दोन कार्यक्रमांची निर्मिती केली होती. भारतभर या कार्यक्रमाचे प्रयोग होत आहेत म्हटल्यानंतर ते शास्त्रशुद्ध पद्धतीने सादर व्हायला पाहिजेत या एका हेतूने या कार्यक्रमाच्या नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी पुरव सरांवर सोपवली होती.

- Advertisement -

घोळदार लेंगा, लांब सैलसर सदरा, डोळ्यांवर काळ्या काड्यांचा चष्मा असा काहीसा पुरव सरांचा पेहराव होता. शिस्तीचे कडक होते, त्यामुळे व्यक्तिमत्त्वही ताठ आणि सरळ होते. वागण्यात, बोलण्यात सतत लोककलेचा ध्यास दिसत होता. नाना चौकात वास्तव्य करत असताना सेंट कोलंबो शाळेत शिक्षक आणि नंतर पूर्णवेळ लोककलेसाठी कार्य असा त्यांचा जीवन प्रवास होता. वयाप्रमाणे शरीरयष्टीची साथ मिळणे कठीण झाले. परिणामी त्यांचा सांभाळ करायला कोणी नसल्याने त्यांना विरार येथल्या वृद्धाश्रमाचा आसरा घ्यावा लागला. आज स्वत:हून पुरेशा कामाचा आढावा देत अनेक कलाकार पुरस्काराच्या यादीत आपली कशी वर्णी लागेल हे पहात असतात. पण पुरव सरांना चार-पाच दशकांचे तेही लोककलेसाठी योगदान दिल्यानंतर कोणत्याही संस्थेने पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला नव्हता. देवेंद्र शेलार या शिष्याने मात्र संघर्ष सेवाभावी संस्थेच्यावतीने पुरव सरांच्या मार्गदर्शनात सुजलाम सुफलाम भारत हा कार्यक्रम करण्याचे ठरवले, त्यावेळी संस्थेने पुढाकार घेऊन पुरव सरांचा यथोचित गौरव केला होता. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने वेगवेगळ्या गोष्टींसाठी अनेक पुरस्कार दिले जातात. अशा पुरस्कारांपासून पुरव सर हे लांब राहिलेले होते. उशिरा का होईना संघर्ष संस्थेने आपला सन्मान केला याचा त्यांना प्रचंड आनंद झाला होता.

दुर्गा झाली गौरी
‘दुर्गा झाली गौरी’ ही अविष्कारची निर्मिती होती. सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे, अरुण काकडे यांचा या निर्मितीमध्ये मोठा वाटा होता. आचार्य पार्वतीकुमारांनी संकल्पना मांडली. माधव साखरदांडे यांनी त्याचे लिखाण केले. या नृत्य नाटकाला रंगमंचावर अविष्कारित करण्यासाठी रमेश पुरव यांचे सहकार्य लाभले. जगभरातील नृत्य नाटकांचा मागोवा घेतला तर भारतातल्या तेही मराठी दुर्गा झाली गौरीने प्रचंड यश मिळवलेले आहे. साठ-सत्तर कलाकारांचा सहभाग असलेल्या या ‘दुर्गा झाली गौरी’चे प्रयोग पाचशेच्या आसपास झाले होते. या नृत्य नाटकाच्या कॅसेटची विक्रीही नोंद घ्यावी अशी झाली होती. कॅनडातील संस्थांनीसुद्धा ‘दुर्गा झाली गौरी’चे प्रयोग केले होते. या यशाचे जे चार-पाच साक्षीदार होते, त्यापैकी रमेश पुरव हे एक होते. तेही आपल्यातून निघून गेलेले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -