मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास सुरुवात, तात्काळ माहिती साद करण्याचे गृहमंत्र्यांचे निर्देश

hm dilip walse patil directs start withdrawing charges against Maratha reservation protesters
मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास सुरुवात, तात्काळ माहिती साद करण्याचे गृहमंत्र्यांचे निर्देश

मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान काही मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या परिस्थितीचा आढावा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतला आहे. तसेच मराठा समाजासंबंधित आणि कोपर्डी प्रकरणात प्रलंबित असलेली कारवाई वेगाने करण्यात यावे असे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. या आढावा बैठकीत राज्यातील महत्त्वाच्या प्रकरणांची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी घेतला असून वेगाने काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मराठा आरक्षण प्रकरणी आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही शासनामार्फत सुरु आहे. संबंधित जिल्ह्याचे पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांनी आढावा घेऊन या संदर्भातील माहिती तात्काळ सादर करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत. मंत्रालयात गृहमंत्री यांच्या दालनात मराठा आरक्षणप्रकरणी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अपर मुख्य सचिव यांच्यासह अधिकारी आणि मराठा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या आढावा बैठकीमध्ये गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याच्या कार्यवाहीचा आढावा घेतला. कोपर्डीसह अन्य प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेवून आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मराठा संघटनांचे प्रतिनिधी आणि शासन यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी नेमलेल्या अधिकारी यांनी या सर्व प्रतिनिधींसोबत योग्य तो समन्वय ठेवावा यासाठी निर्देश दिले. तसेच प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रशासकीय कार्यवाही प्राधान्याने करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. एसईबीसी आरक्षणातील मराठा उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्त्यांचा विषय तसेच आरक्षणाची सद्यस्थिती या विषयावर यावेळी चर्चा झाली आहे.


हेही वाचा : नालेसफाई कामात आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली, पालिकेची कंत्राटदाराला नोटीस