पुन्हा एअर इंडियाच्या विमानात बिघाड; उड्डाण केल्यावर 50 मिनिटांतच लँडिंग

मागील अनेक दिवसांपासून विमानात घडणाऱ्या घटनांमुळे एअर इंडिया कंपनीला अडचणींचा सामना करावा लागत आहे. विमानातील शौचालयात धुम्रपान करणे, वृद्ध महिलेवर लघुशंका करणे, जेवणात दगड सापडणे या घटना ताज्या असतानाच आता एका विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

मागील अनेक दिवसांपासून विमानात घडणाऱ्या घटनांमुळे एअर इंडिया कंपनीला अडचणींचा सामना करावा लागत आहे. विमानातील शौचालयात धुम्रपान करणे, वृद्ध महिलेवर लघुशंका करणे, जेवणात दगड सापडणे या घटना ताज्या असतानाच आता एका विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. वारंवार एअर इंडियाच्या विमानात घडणाऱ्या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Air India Express plane Trivandrum to Muscat landed within 50 minutes after take off)

मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या त्रिवेंद्रम इथून मस्कतला निघालेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग झाले आहे. या विमानातून 105 प्रवाशी प्रवास करत होते. या विमानाने सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास त्रिवेंद्रम विमानतळावरुन मस्कतसाठी उड्डाण केले होते. पण उड्डाणानंतर पायलटला विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. विमानातील FMS अर्थात फ्लाईट मॅनेजमेंट सिस्टिममध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यानंतर या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय विमानातील पायलटने घेतला. त्यानुसार, 9.17 वाजता हे विमान पुन्हा त्रिवेंद्रम विमानतळावर उतरवण्यात आले.

विमानात तांत्रिक बिघाड झाला असला तरी त्याचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. त्यामुळे या विमानातून प्रवास करणारे सर्व 105 प्रवाशी सुरक्षित आहेत. त्यानंतर या प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली. दुपारी 2 वाजेपर्यंत या दुसऱ्या विमानाचे उड्डाण होणार असल्याचे विमान कंपनीने सांगितले.

दरम्यान, विमानात लघुशंका केल्याप्रकरणी विमान प्राधिकरणाने (डीजीसीए) एअर इंडियाला ३० लाखांचा दंड ठोठावला आहे. त्या विमानाच्या पायलटचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच विमानात सेवा पुरवणाऱ्या कंपनीलाही तीन लाखांचा दंड प्राधिकरणाने सुनावला आहे.


हेही वाचा – विमानातील लघुशंका प्रकरणात डीजीसीएकडून कारवाईचा बडगा; एअर इंडियाला ३० लाखांचा दंड