घरCORONA UPDATEपुन्हा व्हीआयपींसाठी लॉकडाऊनचे नियम धाब्यावर! भाजप आमदाराच्या मुलाला परवानगी!

पुन्हा व्हीआयपींसाठी लॉकडाऊनचे नियम धाब्यावर! भाजप आमदाराच्या मुलाला परवानगी!

Subscribe

देशात लॉकडाऊनचा दुसरा टप्पा ३ मेपर्यंत जाहीर केल्यानंतर देशभरात वाढत्या कोरोनाच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेतली जाऊ लागली आहे. ज्या भागांमध्ये रेड झोन किंवा कंटेनमेंट झोन आहे, तिथे नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या वाधवानप्रमाणेच आता बिहारमधल्या देखील भाजपच्या एका बड्या राजकीय नेत्याच्या मुलासाठी लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवून प्रवासाची विशेष परवानगी दिल्याची बाब उघड झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊनचे नियम व्हीआयपींसाठी नसून फक्त सामान्यांसाठीच आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. भास्कर डॉट कॉमने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

नक्की काय झालं?

बिहारमधले भाजपचे आमदार अनिल सिंह यांचा मुलगा राजस्थानच्या कोटा भागामध्ये होता. लॉकडाऊन जाहीर होण्याच्या आधीपासून तो कोटामध्येच होता. त्यामुळे त्याला परत आणण्यासाठी अनिल सिंह बरेच प्रयत्न करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि जिल्हा न्यायदंडाधिकारी नवादा सदर यांच्या सहीचं विशेष परवानगी पत्र त्यांच्या हाती लागलं. या पत्राच्या जोरावर अनिल सिंह त्यांच्या मुलाला थेट कोटा, राजस्थानहून बिहारमध्ये घेऊन आले. या मुद्द्यावर आता मोठी टीका होऊ लागली असून दिल्लीचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर प्रामुख्याने टीका केली जात आहे.

- Advertisement -

जदयुचे माजी उपाध्यक्ष आणि २०१४मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी इलेक्शन कॅम्पेन तयार करणारे प्रशांत किशोर यांनी या मुद्द्यावरून नितीश कुमारांना लक्ष्य केलं आहे. कोटामधून बिहारमध्ये येण्यासाठी जेव्हा तिथे अडकलेल्या मुलांनी मागणी केली, तेव्हा नितीश कुमार यांनी ती फेटाळून लावली होती. जेव्हा उत्तर प्रदेश सरकारने राजस्थानमध्ये अडकलेल्या तिथल्या मुलांना परत आणण्यासाठी विशेष बस पाठवल्या, तेव्हाही नितीश कुमार यांनी त्यावर टीका केली होती. बसेसचा परवाना रद्द करण्याची मागणी केली होती. अशानं लॉकडाऊनचा काय अर्थ राहील? असा सवाल देखील केला होता. मग आता त्यांच्याच सरकारने भाजपच्या एका आमदाराला कोटाहून त्यांच्या मुलाला बिहारमध्ये आणण्याची विशेष परवानगी दिली आहे. नितीशजी, आता तुमची मर्यादा काय म्हणते? असा सवाल प्रशांत किशोर यांनी विचारला आहे. त्यांनी ट्वीट करून संबंधित विशेष परवानगी पत्र देखील जाहीर केलं आहे.


हेही वाचा – घोटाळेबाज वाधवान कुटुंबीय प्रधान सचिवांच्या पत्राने महाबळेश्वरला, चौकशी सुरू!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -