सोनिया गांधी, राहुल गांधी, नवाब मलिक, सत्येंद्र जैन ते संजय राऊत.. ईडीच्या फेऱ्यात विरोधी पक्षाचे बडे नेते

बंडखोर आमदारांना सातत्याने लक्ष्य करणारे शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांना ईडीने समन बजावला आहे.

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकारण तापलं आहे. शिंदे गट विरु्दध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गट असे चित्र राज्यात असून प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून रोज आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. याचदरम्यान, बंडखोर आमदारांना सातत्याने लक्ष्य करणारे शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांना ईडीने समन बजावला आहे. राऊत यांना २८ जून रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून ईडीकडून विरोधी पक्षातील बड्या नेत्यांची चौकशी सुरू आहे. यात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींपासून दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांचाही समावेश आहे. यादरम्यान, भाजपविरोधात बोलणाऱ्या नेत्यांनाच ईडी समन का बजावते असा प्रश्न देशभरात चर्चिला जात आहे. कारण आतापर्यंत ज्यांना ईडीने समन बजावले आहे ते सर्व नेते विरोधी पक्षातील आहेत.

सोनिया गांधी- सोनिया गांधी यांना नॅशनल हेरॉल्डप्रकरणी ईडीने समन बजावले आहे. त्यानुसार सोनिया यांना २३ जून रोजी ईडी समोर हजर व्हायचे होते. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना आता जुलैमध्ये ईडीसमोर हजर होण्यास सांगण्यात आले आहे.

राहुल गांधी- नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनाही ईडीने समन बजावले होते. त्यानंतर राहुला पाचवेळा ईडीसमोर हजर होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांची ११ तास चौकशी केली. पण यादरम्यान राहुल तपासाला सहकार्य करत नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

नवाब मलिक-मनी लॉन्ड्रींगप्रकरणी सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचीही ईडीकडून अनेक तास चौकशी करण्यात आली होती. त्यांना फेब्रुवारी महिन्यातच ईडीने अटक केली आहे. दहशतवादी संघटनांसाठी आर्थिक रसद जमवल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. ईडीच्या आरोपानुसार मलिक यांचे अंडररवलर्ड डॉन दाऊदशी संबंध असून हवाल्याच्या माध्यमातून ते देशविघातक कारवायांमध्ये सामील असल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. याचपार्श्वभूमीवर ईडीने मलिक यांची संपत्तीवर टाच आणली आहे.

सत्येंद्र जैन- दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना मनी लॉंड्रीगप्रकरणी ३० मे रोजी ईडीने अटक केली . जैन यांच्यावर दिल्लीत अनेक शेल कंपन्या सुरू केल्या आणि विकत घेतल्या.

संजय राऊत- ईडीने आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मनी लॉंड्रींग प्रकरणी समन पाठवले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना आक्रमक झालेली असतानाच ईडीने राऊत यांना समन पाठवणे म्हणजे आगीत तेल ओतल्यासारखेच असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनीही हे सगळे घाबरवण्यासाठी सुरू असल्याचे म्हटले असून आपण घाबरणारे नाही असे म्हटले आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील मंत्री अनिल परब, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक , एमएमआरडीएचे आयुक्त आरए राजीव यांच्यासह अनेक बडे नेते ईडीच्या घेऱ्यात सापडले आहेत. मात्र सरकार यास सामान्य कारवाई असल्याचे सांगत आहे. भाजप विरोधी पक्षांविरोधात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे म्हटले आहे.