नवी दिल्ली : दिल्लीहून दोहाला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे पाकिस्तानातील कराची येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचे समजते. हा निर्णय विमानातील वैद्यकीय आणीबाणीमुळे घेण्यात आल्याची माहिती इंडिगो एअरलाइनने दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची तब्येत अचानक बिघडल्याने विमानाचे कराचीमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे.
इंडिगो एअरलाइन्सचे 9E1736 हे विमान दिल्लीहून कतारची राजधानी दोहाला जात होते. या प्रवासादरम्यान एका प्रवाशाने प्रकृती अस्वास्थ्याची तक्रार विमानातील अधिकाऱ्यांकडे केली. त्यानंतर विमानाच्या पायलटने जवळच्या कराची विमानतळाच्या हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क साधत आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. त्यानंतर कराची एअर ट्रॅफिक कंट्रोलने विमानाला लँड करण्याची परवानगी दिली. परंतु विमान कराचीत उतरण्यापूर्वीच प्रवाशाचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. आजारी पडलेल्या प्रवाशाचे नाव अब्दुल्ला (वय 60) असे असून तो नायजेरियाचा नागरिक आहे. इंडिगोने एक निवेदन जारी करून म्हटले की, प्रवाशांच्या निधनाने आम्हाला खूप दुःख झाले आहे असून आम्ही मृतांच्या कुटुंबीयांसाठी आणि नातेवाईकांसाठी प्रार्थना करत आहोत. तसेच विमानातील अधिकाऱ्यांच्या समन्वयाने इतर प्रवाशांना कराचीतून हलवण्याची तयारी सुरू असल्याचे इंडिगोने सांगितले आहे.
हेही वाचा – राहुल गांधींच्या वक्तव्यावरून संसदेत गदारोळ, राजनाथ सिंह आणि पीयूष गोयल आक्रमक
मागच्या वर्षीही विमानाचे पाकिस्तानमध्ये इमर्जन्सी लँडिंग
मागच्या वर्षीही इंडिगोच्या विमानाचे पाकिस्तानमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. तांत्रिक बिघाडामुळे विमान पाकिस्तानातील कराची येथे उतरवण्यात आले होते. इंडिगोचे विमान शारजाहून हैदराबादला जात असताना पायलटला काही हजार फूट उंचीवर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय आल्यामुळे हे विमान कराचीत उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर सर्व प्रवाशांना कराचीमध्ये उतरवून इंडिगो विमान कंपनीने प्रवाशांसाठी दुसरे विमान पाठवले होते आणि हे विमान सर्व प्रवाशांना हैदराबादला घेऊन गेले. इंडिगोच्या आधी स्पाइसजेटचे विमानही काही तांत्रिक बिघाडामुळे पाकिस्तानमध्ये उतरवण्यात आले होते. या विमानाचे इमर्जन्सी लँडिंगही पाकिस्तानातील कराची येथे करण्यात आले होते आणि या विमानात 150 प्रवासी असल्याचे समजते.
हेही वाचा – ‘तोशखान्या’तील मौल्यवान वस्तूंच्या लुटीत पाकिस्तानचे सर्वच नेते सहभागी!