घरदेश-विदेशLok Sabha 2024 : मोदींना गुळाची चव नाही, तशी...; ठाकरे गटाची बोचरी...

Lok Sabha 2024 : मोदींना गुळाची चव नाही, तशी…; ठाकरे गटाची बोचरी टीका

Subscribe

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी चारेक दिवसांपूर्वी महाराष्ट्रात होते. तेथे ते म्हणाले, “काँग्रेस हे कारल्यासारखे कडू आहे. त्यास साखरेच्या पाकात घोळा नाहीतर तुपात तळा, ते कडूच राहणार.’’ मोदी यांना गुळाची चव नाही, तशी कारल्याची चव नसावी. कारले हे आयुर्वेदात गुणकारी म्हणून मानले जाते आणि या ‘कडू कारल्या’मुळेच ब्रिटिशांना भारत सोडून जावे लागले. आता कारल्याचा कडू रस मोदी यांनाही प्यावा लागत असल्याने ते ‘कडू’ शब्दांचा वापर करून प्रचाराचा स्तर खाली आणत आहेत, अशी बोचरी टीका ठाकरे गटाने केली आहे. (Lok Sabha Elections 2024: Thackeray group criticizes Modi’s food and drink comments)

मोदी आता म्हणतात, इंडिया आघाडीचे लोक मुघल विचारांचे आहेत. हे लोक श्रावणात मटण वगैरे खातात. पंतप्रधान पदावरील व्यक्ती प्रचारात मटण, कारले वगैरे विषय आणत आहे. याचा अर्थ गेल्या दहा वर्षांत मोदी यांच्याकडून काहीच भरीव कार्य घडलेले नाही, असा घणाघात ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – BJP vs Thackeray group : नारदमुनींची कथा सांगत ठाकरे गट म्हणतो, शेवटी संस्कार महत्त्वाचे…

एका बाजूला राहुल गांधी हे बेरोजगारांना कामे देण्याची घोषणा करतात. इंडिया आघाडीचे सरकार आल्यास 30 लाख पदे भरू, असे सांगतात. सर्व पदवीधर आणि पदविकाधारकांना शिकाऊ उमेदवारीचा अधिकार दिला जाईल, असे वचन देतात. त्याच वेळी मोदी हे विरोधकांच्या खाण्यापिण्यावर घसरतात. भाजपाने भ्रष्टाचाराचा पैसा आणि सार्वजनिक संपत्तीचा घास गिळलेला चालतो, पण विरोधकांनी कारले खावे की मटण खावे यावर पंतप्रधान महाशय त्यांच्या प्रचार सभांतून बोलत आहेत, असे सामना दैनिकातील अग्रलेखात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने म्हटले आहे.

- Advertisement -

मोदी यांच्या संस्कारी पक्षाचा एक कारनामा समोर आला आहे. एन्काऊंटर करण्यासाठी पोलीस ज्याचा शोध घेत होते तो कुख्यात गँगस्टर सोनू कनोजियाने भाजपामध्ये वाजत-गाजत प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेश भारतीय जनता पक्षाने सोनू कनोजियासाठी पायघड्या घातल्या आहेत. त्याच्यावर दरोडे, खून, अपहरण, खंडणी, खुनाचा प्रयत्न, जमीन बळकावणे असे शंभरावर गुन्हे दाखल आहेत आणि योगी सरकारने त्याच्या एन्काऊंटरचे आदेश दिले होते. आता हे सोनू महाशय भाजपमध्ये सामील झाले, याकडे ठाकरे गटाने लक्ष वेधले आहे.

सोनू महाशय यांनी शंभर अपराध केले, पण ते शुद्ध शाकाहारी असल्याचे प्रमाणपत्र सापडल्याने त्यांचे सर्व गुन्हे माफ करून त्यांना भाजपामध्ये प्रवेश दिला काय? हवे ते गुन्हे करून भाजपमध्ये या. फक्त तेवढे मटण खाऊ नका, असे मोदीभक्तांचे म्हणणे आहे, असा टोला या अग्रलेखात लगावण्यात आला आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : भाजपा नेत्याची जीभ घसरली, काँग्रेसच्या महिला मंत्र्याला दिला अजब सल्ला

इंडिया आघाडीवाले मटण खातात असे संस्कारी मोदी सांगतात, पण त्यांच्या संस्कारी भाजपने ‘बीफ’ म्हणजे गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून शेकडो कोटींचा निधी घेतला, हासुद्धा एकप्रकारे श्रावणातला मांसाहारच आहे. भ्रष्टाचार, अन्याय व लुटमार, हिंसाचार हा सदैव मांसाहारच असल्याचे शास्त्र सांगते व मोदी आणि त्यांचा पक्ष असा मांसाहार गेल्या दहा वर्षांत सतत करत आले, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.

संस्कारी भाजपामध्ये एक कंगना नावाचे पात्र आहे. आपण गोमांस खात असल्याची कबुली तिने अनेकदा दिली आणि कंगना आता भाजपाची लोकसभा उमेदवार म्हणून हिमाचल प्रदेशात निवडणूक लढत आहे. गोवा तसेच ईशान्येकडील काही राज्यांत भाजपाची सत्ता आहे. त्या राज्यांत अधिकृतपणे गोमांस विक्री होते. गायी कापल्या जातात आणि तेथे श्रावणात मटण विक्री किंवा खाण्यावर बंदी नाही, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

भारतीय संविधानाने नागरिकांच्या खाण्यापिण्यावर कोणतेही निर्बंध लावलेले नाहीत. पण ‘बीफ’ प्रकरणात भाजपाच्या हिंसक टोळभैरवांनी अनेक निरपराध मुसलमानांचे ‘झुंड बळी’ म्हणजे ‘मॉब लिंचिंग’ केले तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी साधी हळहळ व्यक्त केली नाही, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : चंदा दो धंदा लो खेळाचे सूत्रधार मिंधेसरकारचे बाळराजे, राऊतांची पंतप्रधानांकडे तक्रार


Edited by – Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -