घरदेश-विदेशलोकसभेसाठी मोर्चेबांधणी : 'काँग्रेस फाइल्स' व्हिडीओ अभियानाद्वारे भाजपाचा निशाणा

लोकसभेसाठी मोर्चेबांधणी : ‘काँग्रेस फाइल्स’ व्हिडीओ अभियानाद्वारे भाजपाचा निशाणा

Subscribe

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने विविध पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने व्हिडीओ अभियान सुरू करून मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला लक्ष्य केले आहे. या व्हिडीओमध्ये काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

भाजपाच्या या व्हिडीओ अभियानाचे नाव ‘काँग्रेस फाइल्स’ ठेवले असून रविवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या मालिकेचा पहिला व्हिडीओ शेअर केला आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार टूजी, कोळसा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसह विविध घोटाळ्यांमध्ये सामील असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

- Advertisement -

काँग्रेसच्या माजी प्रमुख सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा समावेश असलेल्या तीन मिनिटांच्या व्हिडीओ क्लिपमध्ये यूपीएच्या कार्यकाळात झालेल्या 48,20,69,00,00,000 रुपयांच्या घोटाळ्यांची यादीच देण्यात आली आहे.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, विरोधी पक्षांवर ‘भ्रष्टाचारी वाचवा आंदोलन’ सुरू केल्याचा आरोप केल्यानंतर हा व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप करत 14 पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. केंद्रीय यंत्रणा जेव्हा कारवाई करतात, तेव्हा त्यांना लक्ष्य केले जाते. न्यायालयात त्यांच्याबाबतीत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही पक्षांनी ‘भ्रष्टाचारी बचाओ आंदोलन’ही सुरू केले आहे, असे मोदींनी म्हटले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून विरोधी पक्षाचे नेते केंद्रीय यंत्रणांवर पक्षपाती कारवाई करत असल्याचा आरोप करत आहेत. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) या एजन्सी फक्त केवळ भाजपाच्या राजकीय विरोधकांना लक्ष्य करत आहेत, असा आरोप काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे.


हेही वाचा – इंग्रजी भाषा बोललात तर भरावा लागणार दंड; ‘या’ देशातील सरकारने घेतला निर्णय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -