Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश संकल्प विजयाचा पण..., भाजपाचा वर्षभराचा मार्ग मात्र खडतर

संकल्प विजयाचा पण…, भाजपाचा वर्षभराचा मार्ग मात्र खडतर

Subscribe

मुंबई : भाजपाने (BJP) 2024च्या निवडणुकीसाठी सर्वच राज्यात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातच भाजपाने 48पैकी 45 जागा जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. यावर्षी देशातील 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यापैकी चार राज्यांत निवडणुका झाल्या असून उर्वरित पाच राज्यांत नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये होणे अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंतचा कल पाहता, भाजपाने विजयाचा संकल्प केला असला तरी, हा मार्ग खडतर असल्याचेच दिसत आहे.

गेल्यावर्षी उत्तर प्रदेश – उत्तराखंडपासून गुजरातपर्यंतच्या विधानसभा निवडणुकांनंतर केलेल्या सर्वेक्षणात मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे भाजपचा विजय सुकर झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. यापार्श्वभूमीवर वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी 2023मध्ये भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी वर्षभरातील भाजपाचा संकल्प मांडला. हे वर्ष भाजपासाठी खूप महत्त्वाचे आहे. यावर्षी 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून भाजपाला त्या जिंकायच्या आहेत, असे जे. पी. नड्डा यांनी त्यावेळी सांगितले होते.

- Advertisement -

त्यापाठोपाठ फेब्रुवारी-मार्चमध्ये त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये निवडणुका झाल्या. या तिन्ही राज्यांत भाजपा आघाडी करून सत्तेवर आली आहे. त्यातही त्रिपुरात भाजपाला 32 जाागा मिळाल्या असल्या तरी, चार जागांची घट झाली आहे. तिथे सत्तास्थापनेसाठी 31 जागांची गरज आहे. तर, शनिवारी झालेल्या कर्नाटकात भाजपाचा दारुण पराभव झाला. त्यामुळे तिथे भाजपा सरकार जाऊन काँग्रेसची एकहाती सत्ता आली. 2018च्या निवडणुकीत भाजपाला 104 जागा मिळाल्या होत्या. पण यावेळी भाजपाला 65 जागा मिळाल्या. म्हणजेच, 39 जागांची घट झाली.

आता या वर्षाच्या उत्तरार्धात छत्तीसगढ, मध्य प्रदेश, मिझोराम, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. तिथे काँग्रेसची सत्ता आहे. निर्विवाद बहुमत मिळवत काँग्रेस सत्तेवर आली होती. त्यामुळे छत्तीसगढ ताब्यात घेण्यासाठी भाजपाला कंबर कसावी लागणार आहे. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा काँग्रेसने चांगले यश मिळवले होते. परंतु भाजपाने फोडाफोडीचे राजकारण करत, काँग्रेसचे सरकार उलथवून आपले सरकार स्थापन केले. मिझोराममध्ये भाजपाने अद्याप पाय रोवलेले नाहीत. तिथे मिझो नॅशनल फ्रंट या प्रादेशिक पक्षाचा दबदबा आहे. राजस्थानमध्ये सध्या तरी काँग्रेस आणि भाजपामध्ये जोरदार चुरस दिसते. त्यामुळे काँग्रेसवर मात देण्याच्या दृष्टीने भाजपाला व्यूहरचना करावी लागणार आहे.

- Advertisement -

तथापि, बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समितीची सत्ता असलेले तेलंगणा राज्य तूर्तास तरी भाजपाच्या अवाक्याबाहेर आहे. कारण भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा केसीआर म्हणजेच के चंद्रशेखर राव यांनी तर भाजपाविरोधात विरोधकांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याशी ते संपर्क साधून आहेत. मात्र काँग्रेसशी जुळवून घेण्यास ते फारसे उत्सुक नाहीत. पण कर्नाटक विजयानंतर काँग्रेसचे महत्त्व वाढले असून काँग्रेसला विरोध करणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचाही सूर बदलला आहे. त्यानुसार केसीआर यांच्याही भूमिकेत बदल होऊ शकतो.

एकूणच, 2024ची लोकसभा निवडणूक जिंकून सलग तीनवेळा केंद्रातील सत्ता राखली तरी, कर्नाटकातील पराभवामुळे भाजपाला दक्षिणेत पाय रोवण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागेल.

- Advertisment -