घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

म्हणौनि हे पार्था । दुर्बुद्धि देख सर्वथा । तयां वेदवादरतां । मनीं वसे ॥
म्हणून, पार्था, वेदातील अर्थावादात मग्न झालेल्या लोकांच्या मनात सर्वप्रकारे दुर्बुद्धीच वास करते, हे लक्षात असू दे.
तिहीं गुणीं आवृत । हे वेद जाणैं निभ्रांत । म्हणौनि उपनिषदादि समस्त । सात्त्विक ते ॥
तू निश्चयाने असे समज की, वेद हे तीन गुणांनी (सत्व, रज, तम यांनी) भरलेले आहेत; म्हणून सर्व उपनिषदाची सत्त्वगुणामध्ये गणना केली जाते.
येर रजतमात्मक । जेथ निरूपिजे कर्मादिक । जे केवळ स्वर्गसूचक । धनुर्धरा ॥
धनुर्धरा, बाकी ज्यामध्ये कर्म, उपासना इत्यादिकाचे निरूपण केलेले आहे, ते सर्व रज व तम या गुणांनी युक्त असून केवळ स्वर्गसूचक आहेत.
म्हणौनि तूं जाण । हे सुख-दु:खांसीच कारण । एथ झणें अंत:करण । रिंगों देसी ॥
म्हणून तू असे पक्के समज की, हे सुख-दु:खानाच कारण आहेत; व याकरिता तू आपले मन कदाचित तेथे शिरू देशील! तर तसे करू नको.
तूं गुणत्रयातें अव्हेरीं । मी माझें हें न करीं । एक आत्मसुख अंतरीं । विसंब झणीं ॥
तू या त्रिगुणांना टाकून दे, व अहंममता सोडून अंतःकरणात आत्मसुखाचा विसर पडू देऊ नकोस !
जरी वेदें बहुत बोलिलें । विविध भेद सूचिले । तर्‍ही आपण हित आपुलें । तेंचि घेपें ॥
जरी वेदात पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहेत व अनेक मार्ग सुचविले आहेत, तरी त्यातील आपले हित ज्यात असेल तेच घ्यावे.
जैसा प्रगटलिया गभस्ती । अशेषही मार्ग दिसती । तरी तेतुलेहि काय चालिजती । सांगैं मज ॥
ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यावर अनेक रस्ते दृष्टीस पडतात, परंतु त्या सर्वच रस्त्यांनी का मनुष्य चालतो, सांग बरे?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -