घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

आंत अग्निज्योतीचा प्रकाशु । बाहेरी शुक्लपक्षु आणि दिवसु । आणि सामासांमाजीं मासु । उत्तरायण ॥
शरीराच्या आत जठराग्नीच्या ज्योतीचा प्रकाश आणि बाहेर उत्तरायणापैकी कोणत्याहि महिन्याचा शुद्ध पक्षाचा दिवस (रात्र नव्हे),
ऐशिया समयोगाची निरुती । लाहोनि जे देह ठेविती । ते ब्रह्मचि होती । ब्रह्मविद ॥
अशाप्रकारे सर्व चांगले योग असता जे ब्रह्माभ्यासी पुरुष आपला देह ठेवतात, ते ब्रह्मस्वरूपी मिळतात.
अवधारीं गा धनुर्धरा । येथवरी सामर्थ्य यया अवसरा । तेवींचि हा उजू मार्ग स्वपुरा । यावया पैं ॥
धनुर्धरा, ऐक. या वेळेच्या योगाचे (तत्कालाभिमानी देवताचे) असे विलक्षण सामर्थ्य आहे. म्हणून मोक्षप्राप्तीकरिता स्वस्वरूपी येण्यास हा सरळ मार्ग आहे.
एथ अग्नी हें पहिलें पायतरें । ज्योतिर्मय हें दुसरें । दिवस जाणें तिसरें । चौथें शुक्लपक्ष ॥
या मार्गात जठराग्नी ही पहिली पायरी होय; अग्नीचे सतेजपण ही दुसरी पायरी; दिवस ही तिसरी पायरी; शुक्लपक्ष ही चौथी पायरी;
आणि सामास उत्तरायण । तें वरचील गा सोपान । येणें सायुज्यसिद्धिसदन । पावती योगी ॥
आणि उत्तरायणातील सहा महिन्यांपैकी एक महिना ही जिन्याची वरची पायरी. अशा क्रमाने गेल्यावर योगी मोक्षसिद्धिरूप घराला पावतो.
हा उत्तम काळु जाणिजे । यातें अर्चिरा मार्गु म्हणिजे । आतां अकाळु तोही सहजें । सांगेन आईक ॥
हा उत्तर काल असे समज आणि यालाच अर्चिरा मार्ग असे शास्त्रात म्हणतात. आता मरण्यास योगीसाधकांना अयोग्यकाल कोणता, तो प्रसंगानुसार तुला सांगतो, ऐक.
तरि प्रयाणाचिया अवसरें । वातश्लेष्मां सुभरें । तेणें अंत:करणीं आंधारें । कोंदलें ठाके ॥
मरणसमयी कफवातादी दोषांच्या अति भराने अंत:करणात काळोख होऊन जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -