घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

म्हणौनिया पार्था । हेतू सांडोनि सर्वथा । तुज क्षात्रवृत्ति झुंजतां । पाप नाहीं ॥
म्हणून अर्जुना निष्काम होऊन क्षत्रियधर्माने युद्ध कर, म्हणजे पातकाचा लेशही तुला लागणार नाही.
सुखीं संतोषा न यावें । दु:खीं विषादा न भजावें । आणि लाभालाभ न धरावे । मनामाजीं ॥
सुख प्राप्त झाले म्हणून आनंद मानू नये, दुःख प्राप्त झाले म्हणून खेद मानू नये आणि मनात लाभालाभ धरू नये.
एथ विजयपण होईल । कीं सर्वथा देह जाईल । हें आधींचि कांहीं पुढील । चिंतावेंना ॥
या रणांगणावर आपल्यास विजय मिळेल किंवा आपण मरू, या पुढील गोष्टींचा अगोदरच विचार करीत बसू नये.
आपणयां उचिता । स्वधर्में राहाटतां । जें पावे तें निवांता । साहोनि जावें ॥
योग्य अशा स्वधर्माने वागत असताना जे बरे वाईट प्राप्त होईल, ते निमुटपणे सहन करावे.
ऐसियां मनें होआवें । तरी दोषु न घडे स्वभावें । म्हणौनि आतां झुंजावें । निभ्रांत तुवां ॥
अशा रीतीने मनाचा निश्चय केला म्हणजे सहज दोष घडत नाहीत. म्हणून तू निश्चयाने युद्धास आरंभ कर.
हे सांख्यस्थिति मुकुळित । सांगितली तुज येथ । आतां बुद्धियोगु निश्चित । अवधारीं पां ॥
इथपर्यंत तुला हा ज्ञानयोग संक्षिप्तपणे सांगितला; आता बुद्धियोग सांगतो, ऐक.
जया बुद्धियुक्ता । जाहलिया पार्था । कर्मबंधु सर्वथा । बाधूं न पवे ॥
अर्जुना, पुरुष बुद्धियोगाला प्राप्त झाला असता त्याला कर्मबंधाची मुळीच बाधा होत नाही.
जैसें वज्रकवच लेइजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे । परी जैतेंसीं उरिजे अचुंबित ॥
ज्याप्रमाणे अंगात वज्रकवच घातले म्हणजे शस्त्रांची वृष्टी सहन करून विजय खात्रीने मिळतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -