घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

हें असों शब्दब्रह्म जिये बाजे । शब्द मावळलेया निवांतु निजे । तो गीतार्थु मर्‍हाठिया बोलिजे । हा पाडु काई? ॥
हे असो, ज्यापुढे वेदांचे शब्द कुंठित झाल्यामुळे तेही ज्याच्या शय्येवर गाढ निद्रा घेतात, (ज्यापुढे वेदांची मती कुंठित झाल्यामुळे तेही स्तब्ध राहतात.) तो गीतार्थ मी मराठी भाषेत वर्णन करावा असा माझा अधिकार आहे का?
परि ऐसियाही मज धिंवसा । तो पुढतियाचि येकी आशा । जे धिटींवा करूनि भवादृशां । पढियंतया होआवें ॥
परंतु अशी स्थिती असताही मला पुढच्या आशेवर इच्छा उत्पन्न झाली, ती ही की, कसे तरी धिटाईने बोलून तुमच्यासारख्याची प्रीती संपादन करावी.
तरि आतां चंद्रापासोनि निववितें । जें अमृताहूनि जीववितें । तेणें अवधानें कीजो वाढतें । मनोरथां माझिया ॥
तर आता चंद्रापेक्षाही थंड करणार्‍या व अमृताहूनही जीवन देणार्‍या अशा अवधानाने माझ्या मनोरथाला पुष्टी द्या.
कां जैं दिठिवा तुमचा वरुषे । तैं सकळार्थ सिद्धिमती पिके । एर्‍हवीं कोंभेला उन्मेषु सुके । जरी उदास तुम्ही ॥
कारण, जर तुमची कृपादृष्टीरूप वृष्टी मजवर पूर्ण होईल, तर माझ्या बुद्धिरूप भूमीत सकलार्थरूप धान्य पिकेल. एर्‍हवी जर तुम्ही उदास असाल, तर अंकुर आलेले ज्ञान सुकून जाईल.
सहजें तरी अवधारा । वक्तृत्वा अवधानाचा होय चारा । तरी दोंदें पेलती अक्षरां । प्रमेयाचीं ॥
वक्तृत्वरूप पाखराला अवधानरूप वारा मिळाल्यावर त्याच्या प्रत्येक अक्षररूपी अवयवाला अर्थरूपी पुष्टी येईल.
अर्थ बोलाची वाट पाहे । तेथ अभिप्रावोचि अभिप्रायातें विये । भावाचा फुलौरा होत जाये । मतिवरी ॥
अर्थ हा शब्द बाहेर पडण्याची वाट पाहात असतो; शब्द बाहेर पडल्यावर त्यातून अर्थावर अर्थ निघतात आणि बुद्धिला नानाप्रकारचे अभिप्राय सुचू लागतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -