घरमनोरंजनCharlie Chaplin : ...म्हणून चार्ली चॅप्लिन सर्वांचा लाडका बनला !

Charlie Chaplin : …म्हणून चार्ली चॅप्लिन सर्वांचा लाडका बनला !

Subscribe

birth anniversary of charlie chaplin : शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले, हे मंगेश पाडगावकरांचं गीत आहे. चार्ली चॅप्लिनकडे प्रेक्षकांशी शब्दांवाचून संवाद साधण्याची अशीच अलौकिक कला अवगत होती.

अविनाश चंदने – 

चार्ली चॅप्लिन आज असता तर जगभरात त्याचा 135 वा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा केला असता. 16 एप्रिल हा चार्लीचा जन्मदिन. मात्र, नियतीला ते मान्य नव्हते. म्हणूनच 25 डिसेंबर 1977 रोजी त्याला परमेश्वराने स्वत:कडे बोलावून घेतले. 46 वर्षांपूर्वी चार्ली चॅप्लिन आपल्यातून निघून गेला होता. अवघ्या जगाला पोट दुखेपर्यंत हसवणाऱ्या चार्ली चॅप्लिनला आजही कुणी विसरलेला नाही. गंमत पाहा चार्लीचा काळ मूकपटांचा होता. त्यामुळे केवळ अभिनयातून त्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले होते, आनंद दिला होता. आजही चार्ली चॅप्लिनचे नाव घेतले तरी नकळत चेहरा आनंदाने फुलतो. चित्रपट बोलू लागल्यानंतर भाषा हा चित्रपटाचा आत्मा झाला. हे लक्षात घेतले तर संवादाशिवाय केवळ देहबोली आणि चेहऱ्यावरील हावभावानं प्रेक्षकांना हसवणे आणि हसवता हसवता कारुण्याची झलक दाखवण्याची जबरदस्त किमया त्याकाळी चार्ली चॅप्लिनने केली होती.

हेही वाचा… Mrinal Kulkarni : मृणाल कुलकर्णींनी सांगितलं फिटनेस सिक्रेट

- Advertisement -

चार्लीचा जन्म 16 एप्रिल 1889 रोजी लंडनमध्ये झाला. अभिनय त्याच्या अंगात उपजतच होता. कारण त्याचे आईवडील रंगभूमीवरील होते. पण चार्ली 12 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी त्याच्या आईवडिलांचा घटस्फोटदेखील झाला होता. व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे अवघ्या 37व्या वर्षी त्याचे वडील गेले. त्यामुळे आईवर सर्व जबाबदारी आली होती. म्हणतात ना संकटे आली की एकापाठोपाठ येतात. तसेच झाले, चार्लीच्या आईचा आवाज गेला. रंगभूमीवरील कलाकाराचा आवाज गेला तर उरले काय? त्यामुळे चार्लीच्या आईला रंगभूमीवरून जिवंतपणीच एक्झिट घ्यावी लागली आणि पोटासाठी कष्टाची कामे करण्याची वेळ तिच्यावर आली. त्या परिस्थितीतही चार्लीला अभिनयाचे वेड लागले आणि ते कधीही सुटले नाही. म्हणूनच जगाला एक मोठा कलाकार पाहता आला.

चार्लीचे बालपण खूप कष्टात गेले. तरीही त्याने रंगभूमीवर लहानमोठी कामे करणे सुरूच ठेवले. हळूहळू रंगभूमीवर त्याला ओळख मिळू लागली होती. पुढे त्याला मूकपटाचे आकर्षण वाटू लागले. अभिनयाचे भूत चार्लीच्या डोक्यात इतके भिनले होते की तो मूकपटांमध्येही लोकप्रिय झाला. 1910 मध्ये तो पहिल्यांदा अमेरिकेला गेला. त्यानंतर त्यांचे अमेरिकेला जाणे-येणे वाढू लागले. त्यानंतर तो अमेरिकेचा नागरिक बनला. म्हणजे लंडन ही चार्लीची जन्मभूमी तर अमेरिका ही त्यांची कर्मभूमी ठरली. 1914 ते 1967 ही 53 वर्षे चार्ली चॅप्लिन मूकपटाचा बेताज बादशहा होता. त्याचे सर्व चित्रपट गाजले, चर्चिले गेले. या सर्वांमध्ये चर्चा झाली ती चार्लीच्या हॅटची, चार्लीच्या केनच्या काठीची, चार्लीच्या कपड्यांची आणि हो चार्लीच्या हिटलरछाप मिशीचीही!

- Advertisement -

हेही वाचा… Kili Paul Video: किली पॉलचे महामानवाला अभिवादन!

चार्ली चॅप्लिन पडद्यावर कायम निरागस दिसायचा. त्याच्या चेहऱ्यावर कायम करूण भाव असायचे. प्रेक्षकांना खळखळून हसवताना कधी तो प्रेक्षकांच्या डोळ्याच्या कडा ओल्या करायचा, कळतही नव्हते. चार्लीला हे सहज जमायचे. त्याच्या निरागस अभिनयातून जे प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचे त्याला संवादाची कधी गरजच भासली नाही. इतका तो अस्सल कलावंत होता.

पाचव्या वर्षी रंगभूमीवर

चार्लीने रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले तेव्हा तो पाच वर्षांचा होता. झाले असे की, त्याची आई रंगभूमीवर असताना अचानक गाणे विसरली. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चलबिचल सुरू झाली, त्यांचा आरडाओरड सुरू झाला. हे पाहून विंगेत बसलेल्या चार्लीला राहावले नाही. तो पटकन स्टेजवर आला आणि आईच्या हातातील माईक घेऊन आईने सुरू केलेले गाणे तो गाऊ लागला. एवढ्या छोट्या मुलाचे रंगभूमीवरील हे धाडस पाहून प्रेक्षकांची टाळ्यांच्या कडकडाटासह त्याचे कौतुक केले. चार्लीचे हेच धाडस त्याचे रंगभूमीवरील पहिले पाऊले ठरले.

चार्लीचा पहिला चित्रपट

मेकिंग अ लिव्हिंग… हा चार्ली चॅप्लिनचा पहिला चित्रपट. त्यानंतर त्याने प्रेक्षकांना आपलेसे केले ते कायमचेच! पुढे तो लेखक, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता म्हणून प्रेक्षकांसमोर आला. त्याचा सहज अभिनय, नैसर्गिक देहबोलीतून निर्माण झालेला अस्सल विनोद आणि भावनाप्रधान होण्याचे त्याचे कसब हे सारे काही कल्पनेबाहेरचे होते. त्यातूनच चार्ली जगभरातील सामान्य माणसांचा कधी हिरो बनला हे कळलेच नाही.

हेही वाचा… या मराठी अभिनेत्री आहेत बिझनेस वुमन

चार्ली मूकपटांचा बादशहा होता हे सिद्ध करायला द किड, सर्कस, द ग्रेट डिक्टेटर, पोलीस असे काही चित्रपटदेखील पुरेसे आहेत. लाईमलाईट, 20 मिनिटस् ऑफ लव्ह, द गोल्ड रॅश, मॉडर्न टाइम्स, अ वूमन, इन द पार्क, अ बिझी डे, हिज फेव्हरेट पास्ट टाइम्स हे आणि असे असे त्याचे अनेक सिनेमे जगभर गाजले. द किड, पोलीस, सीटीलाईट्स, द ग्रेट डिक्टेटर आणि द सर्कस या सिनेमांनी चार्लीला तुफान लोकप्रियता आणि तेवढाच पैसाही मिळवून दिला.

चार्लीमध्ये प्रेक्षकांनी कायम स्वत:ला पाहिले. म्हणूनच रस्त्यावरच्या मुलाला आधार देणारा ‘द किड’मधला चार्ली लोकांना भावला आणि ‘द ग्रेट डिक्टेटर’मधील त्याची हिटलरसारखी भूमिकाही तेवढीच गाजली. चार्लीच्या या लोकप्रियतेला आजही कुणी आव्हान देऊ शकलेले नाही, यातच चार्लीचे यश सामावलेले आहे. चार्लीच्या यशात पूरक ठरली ती त्याची स्टाईल स्टेटमेंट!

हॅट, स्टीक, गबाळी पॅन्ट आणि मिशी

चार्लीची कपड्यांची स्टाईल जगभरात लोकप्रिय आहे. डोक्यावर हॅट, हातात केनची काठी, अंगावर चढवलेला कळकट मळकट ब्लेझर आणि घातली म्हणण्यापेक्षा कमरेत खोचलेली ढगळपगळ पॅन्ट म्हणजे चार्ली चॅप्लिन. हॅट आणि केन स्टीकशिवाय चार्ली चॅप्लिनची कल्पनाच करता येत नाही. डाव्या हाताने केनची काठी फिरवून उजव्या हाताने हॅट काढत आदबीने वाकणे हे फक्त आणि फक्त चार्लीनेच करावे. चार्ली इतक्या सहजतेने हे करायचा की, तीच पुढे हीच त्याची ओळख बनली. या ओळखीला एक महत्त्वाची गोष्ट चिकटली ती म्हणजे मिशी.

हिटलरछाप मिशीने चार्लीच्या स्टाईल स्टेटमेंटला चार चांद लावले. जी मिशी जर्मनीच्या हिटलरच्या चेहऱ्यावर जेवढी कठोर दिसायची तीच मिशी दिसणारी मिशी चार्लीच्या चेहऱ्यावर तेवढीच प्रेमळ आणि निरागस वाटायची. चार्लीच्या निरागतेमध्ये या मिशीचा उल्लेख टाळता येणार नाही.

ऑस्कर, उत्तरार्ध आणि शवचोरी

चार्लीला ऑस्कर एकदाच मिळाले तेही शेवटच्या कालखंडात. अॅकॅडमी अवॉर्डने चार्लीला जीवनगौरव पुरस्काराने गौरवले होते. तर मायभूमी म्हणजे ब्रिटिश सरकारने चार्लीचा ‘सर’ किताब देऊन सन्मान केला होता. चार्लीचे तीन घटस्फोट झाले आणि चौथे लग्न शेवटपर्यंत टिकले. ब्रिटनमधून अमेरिकेचा नागरिक झालेला चार्ली अखेरच्या टप्प्यात स्वित्झर्लंडमध्ये स्थिरावला होता.

तो नाताळचा दिवस होता. जगभरात प्रभू येशूच्या जन्माचा आनंदीआनंद साजरा होत असताना चार्लीनं मात्र प्रभू येशूच्या घरी गमन केले होते. 25 डिसेंबर 1977 रोजी वयाच्या 88 व्या वर्षी त्याने झोपेतच अखेरचा श्वास घेतला.

त्यानंतर एक वेगळीच घटना घडली होती. चार्लीच्या मृत्युनंतर दोन महिन्यांनंतर त्याचे पार्थिव शवपेटीसह गायब झाले होते. चार्लीच्या पत्नीला चोरांनी फोन केल्यानंतर ही बाब उघड झाली. त्यावेळी चोरांनी चार्लीच्या पत्नीकडे मोठ्या रकमेची मागणी केली. अखेर स्वित्झर्लंड पोलिसांनी टेलिफोन बूथवर सापळे रचून दोन्ही चोरांना अटक केली. चार्लीच्या शवचोरीची फारशी चर्चा झाली नाही, हे विशेष.

असा हा चार्ली चॅप्लिन आजही सर्वांना आपलासा वाटतो, यातच त्याच्या अभिनयाचं यश सामावलेलं आहे. म्हणूनच जगात विनोदी अभिनेत्यांचा आणि सर्वोत्तम अभिनेत्यांचा इतिहास लिहिला जाईल त्यात चार्ली चॅप्लिन पहिल्या क्रमांकावर असेल, एवढे नक्की!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -