घरमनोरंजनअभिनयासोबतच दिग्दर्शन करायला मला आवडते - शुभा खोटे

अभिनयासोबतच दिग्दर्शन करायला मला आवडते – शुभा खोटे

Subscribe

मी शाळेत असताना मला खेळात प्रचंड रस होता. मी अनेक खेळांमध्ये सहभाग घ्यायचे. त्याकाळात अभिनयक्षेत्रात करियर करायचं असा मी कधी विचार देखील केला नव्हता.

प्राजक्ता चिटणीस

शुभा खोटे यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी बॉलिवूडमधील एक काळ गाजवला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. सध्या त्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत काम करत आहेत. शुभा खोटे यांना ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या सेटवर मी भेटायला गेले त्यावेळी त्यांचे चित्रीकरण सुरू होते. चित्रीकरण झाल्यावर त्या बाहेर आल्या आणि त्यांनी माझ्याकडे पाहून एक गोड स्माईल दिली. अनोळखी लोकांना देखील आपलंसं कशाप्रकारे करायचे ही एक कलाच त्यांच्यात आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्यांच्या मेकअप रूममध्ये जाऊन आम्ही गप्पा मारल्या. अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी तो काळ अक्षरशः डोळ्यांसमोर उभा केला.

- Advertisement -
  • ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत तुमची एंट्री झाल्यानंतर आता या मालिकेला कोणते नवे वळण मिळणार आहे?

माझी मालिकेतील भूमिका काय असणार याविषयी मी जास्त सांगू शकत नाही. पण मालिकेतील माझ्या एंट्री नंतर खूपच गोष्टी बदलणार आहेत. सध्या ठिपक्याची रांगोळीमधील हे कुटुंब संपूर्णपणे विखुरले गेले आहे. हेच कुटुंब एकत्र आणण्यासाठी मी या मालिकेत आले आहे.

  • मालिकेच्या चित्रीकरणाला तुम्ही सुरुवात केल्यापासून मालिकेच्या सेटवर प्रचंड धमाल मस्ती सुरू झाली आहे असे आम्ही ऐकले आहे हे खरे आहे का?

मला स्वतःला लोकांसोबत गप्पा मारायला, त्यांच्यासोबत मजा मस्ती करायला प्रचंड आवडतं. त्यामुळे मी जिथे जाते तिथे मी सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहते आणि एन्जॉय करून काम करायचं असं माझं म्हणणं आहे. यामुळे सेटवर देखील खूपच चांगले वातावरण निर्माण होते.

- Advertisement -

A Rare Interview With Legend Shubha Khote

  • मालिकेच्या पहिल्या दिवसाच्या चित्रीकरणाचा अनुभव कसा होता?

मला पाहून सगळ्यांनाच आश्चर्यचा धक्का बसतो असे सगळ्यात पहिले दृश्य होते ही माझी मालिकेतील एंट्री खूपच छान चित्रीत करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या दिवशीचे चित्रीकरण हे आऊटडोअरचे असले तरी मला अजिबात थकवा आला नव्हता. या मालिकेतील सगळेच कलाकार खूप चांगले अभिनय करतात. त्यामुळे चित्रीकरण करायला मजा आली आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मी ही मालिका नियमितपणे पाहत असल्याने या मालिकेचा मी भाग झाली आहे याचा मला आनंद होत आहे.

  • एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेनंतर तुम्ही अनेक वर्षांनी मराठी मालिकेत दिसत आहात. इतक्या दिवस तुम्ही मराठी मालिकेत काम केले नाही यामागचे कारण काय?

मी या दरम्यान अभिनयक्षेत्रात कार्यरत नव्हते असे नाहीये. मी माधुरी दीक्षितच्या बकेट लिस्ट या मराठी चित्रपटात काम केले. तसेच एका हिंदी मालिकेत, टॉयलेट एक प्रेम कथा या हिंदी चित्रपटात काम केले. खरे सांगू तर मी स्वतःहून कोणाकडे काम मागायला जात नाही. माझ्यासाठी एखादी भूमिका योग्य वाटत असेल तर निर्माते, दिग्दर्शक माझ्याशी संपर्क साधतात. ठिपक्याची रांगोळी या मालिकेतील ही आत्याबाईची भूमिका माझ्यासाठी अगदी योग्य आहे असे निर्माते, दिग्दर्शक यांना वाटल्यामुळेच मला या मालिकेसाठी विचारण्यात आले आणि मी ही मालिका नियमित पाहात असल्याने मी देखील या मालिकेत काम करण्यास लगेचच होकार दिला.

  • तुमच्या अभिनयाने मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत तुम्ही तुमची एक ओळख निर्माण केली आहे. पण तुम्हाला अभिनय क्षेत्रात नव्हे तर खेळात जास्त रस होता हे खरे आहे का?

मी शाळेत असताना मला खेळात प्रचंड रस होता. मी अनेक खेळांमध्ये सहभागी घ्यायचे. त्याकाळात अभिनयक्षेत्रात करियर करायचं असा मी कधी विचार देखील केला नव्हता. पण अभिनय हे माझ्या रक्तात आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. माझे वडील नंदू खोटे हे अभिनेते होते. त्यांच्याकडून मला अभिनयाचा वारसा मिळाला. त्यांच्यासोबत लहानपणी मी काम करायला सुरुवात केली होती. त्या नंतरच्या काळात माझा अभिनय आवडल्याने मला अनेक कामं मिळत गेली आणि मी अभिनयक्षेत्राचा भाग बनले. आजवर प्रेक्षकांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केले आहे.

  • तुम्हाला तुमच्या अभिनय कारकिर्दीत अनेकवेळा दुखापत झाली होती. एकदा तर तुमचा मोठा अपघात देखील झाला होता. या सगळ्या गोष्टींना तुम्ही कशाप्रकारे तोंड दिले?

माझ्या संपूर्ण कारकीर्दीत माझे सात वेळा मोठे अपघात झाले. एकदा माझ्या चेहर्‍याला प्रचंड मार लागला होता. माझा चेहरा विद्रुप होणार नाही ना… अशी मला भीती वाटायला लागली होती. पण देवाच्या कृपेने मी अगदी व्यवस्थित झाले. त्यानंतर माझ्या हाता, पायाला देखील मोठी दुखापत झाली होती. आजवर अनेक चित्रपटाचे चित्रीकरण करताना माझा अपघात झाला आहे. चित्रीकरण करताना मला दुखापत झाली की चित्रपट हिट होणार असे मी मस्करीत अनेकवेळा म्हणायचे.

  • एक काळ असा होता की मेहमूद, धुमाळ आणि तुम्ही हे त्रिकूट चित्रपटात असलेच पाहिजे असे निर्मात्यांचे म्हणणे असायचे. त्या काळाविषयी काय सांगल?

मी, धुमाळ आणि मेहमूद यांची जोडी इतक्या चित्रपटात असायची की, आम्हाला चित्रपटात एकत्र पाहायची लोकांना सवय झाली होती. आम्ही तिघांनी इतकी वर्षे एकमेकांसोबत काम केल्यानंतर आमच्यात खूप छान मैत्री झाली होती.

Veteran actress Shubha Khote robbed of several lakh rupees, domestic helper confesses the crime

– मेहमूद यांना तुम्ही भाई म्हणून हाक मारायचा आणि ते देखील तुम्हाला भाईच म्हणायचे. ही एकमेकांना भाई म्हणून हाक मारायची सुरुवात कधीपासून झाली?

मी आणि मेहमूद एकमेकांना भाई अशीच हाक मारायचो. पण या गोष्टीची सुरुवात कधीपासून झाली हे मला आता आठवत नाही. आमचे खऱ्या आयुष्यातील नाते देखील एखाद्या भावा-बहिणीप्रमाणेच होते. आम्हाला कोण भेटलं, आमच्या आयुष्यात काय सुरू आहे हे सगळं एकमेकांना सांगायचो.

– तुमच्या आयुष्यात ठरवून कोणत्याच गोष्टी होत नाहीत. तुमचे लग्न देखील ठरलेल्या दिवशी न होता काही दिवस आधी झाले. तुमच्या लग्नाची ही गोष्ट आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल…

(हसून) तुम्हाला माझ्या विषयी खूपच गोष्टी माहिती आहेत. खरे तर माझ्या लग्नाविषयी खूपच कमी जणांना माहीत आहे. माझ्या नवऱ्याचे हे दुसरे लग्न होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते. या कारणामुळे आमच्या या नात्याला माझ्या आईचा विरोध होता. पण माझ्या घरातील इतर मंडळींचा माझ्या लग्नाला पाठिंबा होता. आमची फॅमिली फिल्मी असल्याने लग्नाच्या दिवशी आई आम्हाला जर येऊन बोलली की, ये शादी नही हो सकती…. तर काय करायचं, या गोष्टीचे आम्हाला टेन्शन आले होते. त्यामुळे आम्ही ठरलेल्या दिवसाच्या काही दिवस आधीच लग्न उरकले. पण माझी मुलगी भावना हिच्या जन्मानंतर सगळ्या गोष्टी बदलल्या. माझ्या आईचा राग देखील निवळला.

  • भावना आणि तुमचे नाते हे आई- मुली सारखे नसून ते एखाद्या मैत्रिणी प्रमाणे आहे. तुम्ही अनेक कार्यक्रमात एकत्र हजेरी लावता. तुमच्या मुलीने मालिकेच्या सेटवर येऊन तुम्हाला भेट दिली का?

भावना आणि मी आम्ही दोघे जुहूला राहतो तर या मालिकेचा सेट हा ठाण्यात आहे. मी दररोज दोन तास प्रवास करून येथे येते. भावना मालिकेच्या सेटवर कधी येणार असे मला मालिकेतील सहकलाकार देखील विचारत आहेत. पण त्यावर तिच्यासाठी हे अंतर खूपच दूर असल्याने ती अजून तरी आलेली नाहीये असे मी त्यांना सांगते.

  • तुम्ही चित्रपटात काम करण्यासोबतच चित्रपटाची निर्मिती केली आहे, दिग्दर्शन केले आहे. या सगळ्या गोष्टींची एकत्र सांगड कशाप्रकारे घातली?

दिग्दर्शन करायला मला खूप आवडतं. माझा अपघात झाल्यानंतर मी काही काळ अभिनय करत नव्हते. त्या काळात मी दिग्दर्शनातील बारीक सारीक गोष्टी शिकून घेतल्या. मी नाटकांचे देखील दिग्दर्शन करते.

  • शुभा खोटे आणि विजू खोटे या भावंडांना एकत्र पाहण्याची लोकांना सवय झाली होती. विजू खोटे यांच्या निधनानतर त्यांची किती कमतरता भासते?

(भावूक होत) या विषयावर मला बोलायला नाही जमणार… आमचे आई वडील गेल्यावर आम्ही दोघेच एकमेकांचा आधार होतो. तो गेल्यावर त्याची आठवण येत नाही असा एक दिवस जात नाही.


हे ही वाचा –  मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाचा ऐश्वर्याचा फोटो व्हायरल; नेटकऱ्यांनी केले ट्रोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -