घरमनोरंजन'गाव गाता गजाली' पुन्हा येणार!

‘गाव गाता गजाली’ पुन्हा येणार!

Subscribe

'गाव गाता गजाली'च्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या १३ सप्टेंबरपासून बुधवार ते शुक्रवार रात्री १० वाजता ही मालिका पुन्हा सुरू होणार आहे.

मालवणी भाषा, कोकण, कोकणातील संस्कृती, तिथली माणसं प्रेक्षकांसमोर आली ती ‘रात्रीस खेळ चाले’ आणि ‘गाव गाता गजाली’ या दोन मालिकांमुळे. या दोन्ही मालिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. ‘मॅड झालास का?’, ‘मी कधी कुणाक काय सांगतंय का?’, ‘व्हतलंय व्हतलंय सगळं व्हतलंय?’ ही वाक्य प्रेक्षकांच्या अगदी तोंडपाठ झाली ती गाव गाता गजाली या मालिकेमुळे. या मालिकेने मार्च महिन्यात प्रेक्षकांचा तात्पुरता निरोप घेतला. मात्र गाव गाता गजालीच्या चाहत्यांसाठी आता खूशखबर आहे. ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिका संपतानाच ‘लवकरच आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येऊ’, असे अश्वासन दिलं होतं. अखेर मालिकेच्या संपूर्ण टीमने हे अश्वासन पूर्ण केलं आहे. येत्या १३ सप्टेंबरपासून बुधवार ते शुक्रवार रात्री १० वाजता ही मालिका पुन्हा सुरू होणार आहे.

गजाली नक्की काय प्रकार आहे?

कोकणी माणूस मुळात बोलका. चार मंडळी जमवून गप्पा मारणं हा तर कोकणी माणसाचा आवडता उद्योग. सिंधुदुर्ग जिल्ह्यात याच गप्पांना गजाली असं म्हटलं जायचं. या गप्पांमध्ये गावातील भानगडी ते अगदी अंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत सगळे विषय असायचे.

- Advertisement -

या ठिकाणी होणार मालिकेचे चित्रीकरण

गाव गाता गजाली या मालिकेचे चित्रीकरण सावंतवाडी, कुडाळ भागात करण्यात आले होते. आता नवीन भागांचेही चित्रीकरण याच गावांमध्ये होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा निसर्गरम्य स्थळांचा अनुभव घेता येणार आहे.

हे कलाकार असणार मालिकेमध्ये

विनोदी अभिनेता दिगंबर नाईक, भरत सावले, किशोर रावराणे यांना प्रेक्षकांची विशेष पंसती मिळाली. मालिकेतील मास्तर, मास्तरची बायको, बैल ही पात्र खूप लोकप्रिय झाली. त्यांच्या मूळ नावांपेक्षा मालिकेतील नावांनीच या पात्रांना ओळखलं जाऊ लागलं. हीच पात्र तुमच्या पुन्हा एकदा भेटीला येणार आहे. मात्र या पात्रांशिवाय आणखी नवीन पात्र कोण असणार? हे अद्याप गुपीत आहे.

आम्ही ‘गाव गाता गजाली’च्या शेवटच्याच भागात सांगितलं होतं आम्ही परत येणार. त्याप्रमाणे आम्ही पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झालो आहोत. या मालिकेतून प्रेक्षकांनी प्रेम केलेली पात्र समोर येणार आहेत. मात्र अनेक गावातील लोकांनाही आम्ही संधी देणार आहोत. त्याचप्रमाणे यावेळी वेगवेगळे लेखक या मालिकेच्या भागांचे लेखन करतील.

प्रल्हाद कुरतडकर, लेखक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -