घरफिचर्सकर्तबगार राजस्त्री महाराणी ताराबाई

कर्तबगार राजस्त्री महाराणी ताराबाई

Subscribe

राजाराम महाराजांच्या निधनानंतर आपल्या कर्तबगारीने मराठा साम्राज्याचा सांभाळ केलेल्या महाराणी ताराबाई यांचा ६ नोव्हेंबर रोजी स्मृतिदिन. महाराणी ताराबाई ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसर्‍या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या होत्या.

राजाराम महाराजांच्या निधनानंतर आपल्या कर्तबगारीने मराठा साम्राज्याचा सांभाळ केलेल्या महाराणी ताराबाई यांचा ६ नोव्हेंबर रोजी स्मृतिदिन. महाराणी ताराबाई ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसर्‍या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या होत्या. छत्रपती ताराराणी भोसले यांचा जन्म १६७५ साली झाला. ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी १६८३-८४ च्या सुमारास झाले. ९ जून १६९६ रोजी ताराबाईंना शिवाजी हा पुत्र झाला. मार्च १७०३ रोजी छत्रपती राजाराम यांचा सिंहगड किल्ल्यावर मृत्यू झाल्यानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती आल्यावर समोर उभ्या असलेल्या अनेक कठीण प्रसंगांनी खचून न जाता मोगली फौजांना मागे सारण्यासाठी ताराराणीने आक्रमक भूमिका घेतली. मराठेशाहीतील मुत्सद्यांना काळाचे गांभीर्य समजावून देऊन शेवटपर्यंत या सगळ्यांबरोबर एकजुटीने राहून तिने शत्रूला थोपवून धरले. लष्कराचा आत्मविश्वास वाढवला. मोगलांना कर्दनकाळ वाटावेत असे कर्तृत्ववान सरदार त्यांच्यासमोर उभे केले. दिल्लीच्या राजसत्तेवर स्वतःचा असा धाक निर्माण केला. सन १७०५ मध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून माळवा प्रांतात शिरल्या आणि मोगल फौजांना त्यांनी खडे चारले. त्या जिंकलेल्या प्रांतांमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करून स्वराज्याची तिजोरी आर्थिकदृष्ठ्या बळकट केली.
करवीर राज्याची, कोल्हापूरच्या राजगादीची तिने स्थापना केली. ताराबाई मराठ्यांच्या इतिहासातील ही एक कर्तबगार राजस्त्री होती. शिवाजी आणि संभाजी यांच्यामागे तिने कणखरपणे राज्याची धुरा सांभाळली. संताजी, धनाजी यांना बरोबर घेऊन मोगलांना सळो की पळो करून सोडणारी ही रणरागिणी म्हणजे महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान स्त्रियांमधील एक मानाचे पान आहे. घोडेस्वारीमध्ये निपुण असलेल्या ताराबाई जात्याच अत्यंत बुद्धिमान, तडफदार होत्या. त्यांना युद्धकौशल्य आणि राजकारणातल्या उलाढालींचे तंत्र अवगत होते. इ.स. १७०० ते १७०७ या काळात शिवाजी महाराजांच्या या सुनेच्या तडफदार धोरणामुळे आणि मुत्सद्देगिरीमुळे औरंगजेबाला मराठ्यांशी झुंज देत ७ वर्षे दक्षिणेत मुक्काम करावा लागला आणि अखेरीस अपयश घेऊन येथेच देह ठेवावा लागला. या काळात ताराबाई आणि दुसरा शिवाजी (कोल्हापूर) यांचा मुक्काम अधिक तर पन्हाळ्यावरच असे.
वास्तविक सन १७०० साली छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे उत्तराधिकार छत्रपती शाहू महाराजांकडे जायला हवे होते, पण शाहूराजे त्यावेळी वयाने खूपच लहान होते आणि नंतरच्या काळात मोगलांच्या कैदेत होते. महाराणी ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजी ह्याला गादीवर बसवले आणि रामचंद्रपंत अमात्य यांच्या सल्ल्याने मराठा राज्याचा कारभार पाहण्यास सुरुवात केली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर संभाजी राजांचे पुत्र शाहू यांची मोगलांनी सुटका करताना महाराष्ट्रात दुहीचे बीज पेरले. शाहू हेच मराठा राज्याचे उत्तराधिकारी असल्याचे अनेक सरदार, सेनानी यांना वाटू लागले. दोन्ही बाजूंनी छत्रपतीपदाच्या वारसा हक्कावरून संघर्ष सुरू झाला. या काळात ताराबाईंच्या पक्षातले खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ, धनाजी जाधव यांसारखे सेनानी आणि मुत्सद्दी शाहूंच्या पक्षात गेले. शाहूराजांनी महाराणी ताराबाई आणि त्यांचा पुत्र शिवाजी दुसरा ह्यांच्याविरुद्ध युद्ध पुकारले. १७०७ साली खेड येथे झालेल्या ह्या युद्धात बाळाजी विश्वनाथ ह्या पेशव्याच्या कुशल नेतृत्वाखाली शाहूराजांची सरशी झाली आणि महाराणी ताराबाईंनी सातार्‍याहून माघार घेऊन, कोल्हापूर येथे वेगळी गादी स्थापन केली. सन १७१४ साली राजमहालात झालेल्या घडामोडींनंतर शिवाजीला पदच्युत करून राजे संभाजी ह्या राजारामाच्या दुसर्‍या मुलाला छत्रपती म्हणून नेमले. सरतेशेवटी वारणेला झालेल्या दिलजमाईनुसार शाहूराजांनी कोल्हापूरच्या गादीला संमती दिली. मराठी राज्याच्या अडचणीच्या काळात कोणी कर्तबगार पुरुष घरात नसताना आणि औरंगजेबसारखा बलाढ्य शत्रू आपल्याच राज्यात आलेला असताना एका स्त्रीने राज्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. मराठा साम्राज्याचे खंबीरपणे रक्षण करणार्‍या या रणरागिणीचे वयाच्या ८६ व्या वर्षी सिंहगडावर निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -