घरफिचर्समायमहानगर ब्लॉगभाजपची मनसे ट्रायल!

भाजपची मनसे ट्रायल!

Subscribe

भाजपचे शिवसेनेसोबत बिनसल्यानंतर राज्यातील सत्ता गेली, त्यामुळे आता पुन्हा सत्तेत यायचे झाले तर नवा जोडीदार कोण, असा प्रश्न भाजपच्या नेत्यांना पडलेला होता. त्यामुळे पुढील काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत हातमिळवणी करायची का, याविषयी चाचपणी सुरू होती. तसे भाजप उघडपणे हे मान्य करत नाही, पण अप्रत्यक्षपणे काही गोष्टी सुरू आहेत, त्या काही लपून राहत नाहीत. राजकारणाच्या पलीकडेही मैत्रीचे संबंध जपणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, असे टिपीकल उत्तर महाराष्ट्रातील बहुतेक राजकीय पक्षांचे नेते देत असतात. तशाच प्रकारे ते भाजपकडून दिले जाते. पण एकूणच परिस्थितीवरून राजकीय विश्लेषक अंदाज बांधत असतात, कारण उगाच कुणी मजा म्हणून वक्तव्ये करत नाही की, केवळ हवापाण्याच्या गप्पा मारण्यासाठी एक नेता दुसर्‍या नेत्याला जाहीरपणे मीडियाला सांगून भेटत नाही. कारण मीडियाच्या नजरेत न येतासुद्धा भेट घेता येऊ शकते.

पण ज्यावेळी अशा जाहीर भेटी घेतल्या जातात, त्यावेळी त्या भेट घेणार्‍यांना काही संकेत किंवा संदेश द्यायचे असतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली. त्याविषयी त्यांना विचारल्यानंतर ती सहजभेट होती. यामध्ये मनसेसोबत युती करण्याविषयी काहीही चर्चा झालेली नाही, असे त्यांनी सांगितले. त्यापूर्वी भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची परप्रांतीयांविषयीची भूमिका हा कळीचा मुद्दा होऊ शकतो. त्याविषयी त्यांची भूमिका काय आहे ते जाणून घ्यावे लागेल. त्यावर राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविषयीची माझी भूमिका स्पष्ट आहे, असे स्पष्ट केले आहे. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सीडी चंद्रकात पाटील यांना पाठवल्या आहेत, असे फडणवीस म्हणत आहेत, तर आपण अशा सीडी कुणाला पाठवल्या नाहीत, असे राज ठाकरे म्हणत आहेत. म्हणून सध्या भाजप आणि मनसे यांच्या संभाव्य युतीबाबत जे काही सुरू आहे, ते अशा वरवरच्या पातळीवर आहे. म्हणजे हा खेळ शक्यतांचा असेच याचे स्वरुप आहे.

- Advertisement -

२०१९ साली महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या हातातोंडाशी आलेली सत्ता गेली,त्यामुळे भाजपचा मोठा अपेक्षाभंग झाला. त्याला कारण शिवसेना होती, कारण शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी अट्टाहास कायम ठेवला, त्यासाठी त्यांनी काहीही करायचे ठरवले होते, तसे त्यांनी केले. त्यातूनच महाविकास आघाडीचा जन्म झाला. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळाले. पण दुसर्‍या बाजूला भापजची मात्र कोंडी झाली. अशा वेळी भाजपने आपल्या केंद्रात असलेल्या सत्तेचा वापर करून एककेनप्रकारेन शिवसेनेला या आघाडीतून फोडून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, अगदी राज्यपालही बदलले. सी. विद्यासागर राव यांना हटवून त्यांच्या जागी प्रत्यक्ष राजकीय अनुभव असलेले भगतसिंह कोश्यारी यांना आणण्यात आले. कोश्यारी यांनी वेळोवेळी आपली राजकीय कुशलता वापरून मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे कसे अडचणीत येतील, असे पत्ते टाकले, पण आजवर तरी त्याचा काहीही उपयोग झालेला नाही.

भाजपच्या समर्थनाने खासदार झालेले नारायण राणे यांनीही राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे जाऊन महाराष्ट्रातील परिस्थिती बिघडलेली असल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करून पाहिली, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. ठाकरेंशी संबंधित काही प्रकरणे उकरून काढण्यात आली, काहींचा ठाकरेंशी संबंध जोडण्यात आला. त्यांची केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली, काही प्रकरणांची चौकशी सुरू आहे. पण काही माणसे ही नशीब घेऊनच जन्माला आलेली असतात, तसेच उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत झालेले आहे. मुळात ठाकरे घराण्यातील व्यक्ती प्रत्यक्ष राजकारणात आजवर आलेली नव्हती. त्यांच्याकडे रिमोट कंत्रोटची संस्कृती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील शिवसेनेतून कुणी तरी नेता मुख्यमंत्रीपदासाठी पुढे आणला जाईल, तसेच उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीला मुख्यमंत्रीपदाची धावपळ झेपेल का, इतपर्यंत शंका व्यक्त करण्यात येत होत्या, पण या सगळ्या शक्यता आणि अडचणींवर मात करून आता जवळ जवळ दोन वर्षे उद्धव ठाकरे अतिशय चांगल्या पद्धतीने आणि संयमितपणे तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार चालवत आहेत.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आणि अगदी अल्पावधीत कोरोनासारख्या भयानक रोगाचे आगमन झाले. लॉकडाऊन लागला. त्यामुळे अर्थव्यवस्थेत मंदी आली. त्यात पुन्हा भाजपसारखा विरोधक हरतर्‍हेने ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला कोंडीत पकडण्यासाठी सर्व डाव आणि पेच वापरत होता. काहीही केले तरी आता दोन वर्षे होत आली तरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार काही हलत नाही, असे भाजपच्या नेत्यांना दिसू ्लागल्यानंतर आता काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला. त्यामुळेच आता लोहे को लोहा काटता है, या नियमानुसार एका ठाकरेंना खाली खेचण्यासाठी आता दुसर्‍या ठाकरेंचा वापर केला जाण्याची ही भाजपची नीती असावी, असे वाटू लागले आहे. कारण आता भाजपकडे अन्य पर्याय राहिलेला नाही.

राज ठाकरे यांच्याशी जवळीक साधण्यामागे दोन कारणे आहेत. मुळात राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला. राज ठाकरे यांचे बोलणे, दिसणे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे असल्यामुळे पुढे शिवसेनेतील लोक मनसेमध्ये येतील, आणि शिवसेना कमजोर होत जाईल, असे वाटत होते. त्यात तथ्यही आढळून आले. कारण सुरुवातीला मनसेने जेव्हा विधानसभा निवडणूक लढवली तेव्हा त्यांचे १३ आमदार निवडून आले होते. ही साधा गोष्ट नव्हती. पण त्यानंतर मात्र मनसेला उतरती कळा लागली. आता तर विधानसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांची डिपॉझिट्स वाचवणेही शक्य होत नाही. याची भाजपला कल्पना आहे. तरीही ते राज ठाकरे यांच्यासोबत पुढील काळात युतीचे संकेत देऊ पाहत आहेत. याचे एक मुख्य कारण म्हणजे शिवसेनेवर दबाव आणून तुम्ही आमच्यासोबत या असे सूचवणे आहे. कारण भाजपला माहीत आहे, शिवसेनेची पाळेमुळे महाराष्ट्रात खोलवर आणि दूरवर पसरली आहेत. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल शिवसैनिकांच्या मनात आस्था आहे. त्या तुलनेत मनसे हा नवा पक्ष आहे.

तसेच त्यांना निवडणुकीत यश मिळताना दिसत नाही. त्यामुळे मनेससोबत जवळीक करत असल्याचे दाखवून शिवसेनेवर दबाव आणणे किंवा उद्धव ठाकरे ऐकलेच नाही तर पुढील काळात त्यांच्याविरोधात मनसेला बळ देऊन मोठे करणे आणि राज्यातील सत्ता हस्तगत करण्यासाठी त्यांचा उपयोग करून घेणे या दोन शक्यता आहेत. कारण जसे शिवसेनेने काहीही करून मुख्यमंत्रीपद मिळवले तसे आता काहीही करून भाजपला राज्यातील सत्ता आणि मुख्यमंत्रीपद मिळवायचे आहे. त्यासाठी त्यांना राज्यात पक्षाची गती वाढवून सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी मनसेच्या इंजिनाची गरज वाटत आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांंच्याशी भेटीगाठी चालू असाव्यात, एकेकाळी शिवसेनासुद्धा प्रांतीयवादी म्हणून ओळखली जायची, पण तरीही राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपने त्यांच्याशी हिंदुत्वाच्या आधारावर युती केली, तोच फॉर्म्युला मनसेच्या बाबतीतही भाजपकडून वापरला जाऊ शकतो. भाजपकडून सध्या मनसे ट्रायल सुरू आहे, ती यशस्वी झाली तरच युतीची सुपारी फोडण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -