सत्तेचं ठीक आहे, पण पक्षाचं काय?

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी उध्दव ठाकरे असतांना 6 जिल्ह्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीत शिवसेना चौथ्या स्थानावर घसरली आहे. भाजपने स्टार प्रचारक निवडणुकीत न उतरवताही पहिला नंबर पटकावला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची कामगिरी समसमान आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी ठाकरेंना पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी लक्ष द्यावं लागणार आहे. अन्यथा शिवसेनेला मोठी किंमत चुकवावी लागेल.

आज घटस्थापना झालेली आहे. नऊ दिवसांनी दसरा आहे. त्यादिवशी शिवसेनेचा दसरा मेळावा असतो. या मेळाव्याच्या बाबतीत कोविडमुळे अद्याप शिवसेनेने ठोस निर्णय घेतलेला नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर असतानाचा हा दुसरा दसरा मेळावा आहे. पन्नास दिवसांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाला दोन वर्षं पूर्ण होणार आहेत. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे तीन पक्ष आहेत त्यामुळे या पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक करु नये, असे सर्वसाधारण संकेत आहेत. मात्र या सरकारवर किंवा सरकारच्या कर्त्याकरवित्या शरद पवारांवर सगळ्यात जोरदार हल्ला चढवला तो अनंत गीतेंनी. त्यानंतर रामदास कदम यांनी किरीट सोमय्या यांना अनिल परब यांच्या विरोधातली दिलेली माहिती ऑडिओ क्लिपद्वारे जगजाहीर झाली. त्यामुळे शिवसेनेतील खदखद सगळ्यांच्याच लक्षात आली. यातून सेना अद्यापही नीटशी सावरलेली नाही.

बुधवारी सहा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणार्‍या 143 जागांसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये आलेला कल पाहता सत्तेत असूनही शिवसेनेचं बरंच काही राहून गेलं असं म्हणण्यात इतपत आकडे आपल्यासमोर आलेले आहेत, याचं कारण पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर युवासेनाप्रमुख बसलेले आदित्य ठाकरे हे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री झालेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे जेव्हा प्रशासकीय काम पाहत आहेत त्यावेळेला जयंत पाटील हे पायाला भिंगरी लावून राज्याच्या वेगवेगळ्या भागात कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याबरोबर संवाद यात्रा करतायत. काँग्रेसमध्ये मात्र नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर माध्यमांमध्ये तरी निदान पक्ष दिसू लागलेला आहे. नानांना सत्तेच्या ताटावर कधीकधी लाथ मारायची आहे का, असा प्रश्न पडण्याइतपत त्यांच्या पक्षांमध्ये चाललेल्या गोष्टी सत्ताविरोधी भासू लागतात.

महाविकास आघाडी सरकारमध्ये जे काही मंत्री आहेत त्यापैकी दोन वर्षात छाप पडणारी कामगिरी करणार्‍या मंत्र्यांचा जर विचार केला तर पहिल्या पाचमध्ये येण्याचा यशस्वी प्रयत्न आदित्य ठाकरे यांनी केला आहे. सहाजिकच आडनाव ठाकरे असल्यामुळे आणि मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असल्यामुळे सतत काहीतरी नवं करत शिकण्याची ऊर्मी असल्यामुळे आदित्य यांनी छाप पाडली आहे. त्यांचे वडील उद्धव यांनी विरोधक काही म्हणत असले तरी कोविड परिस्थिती कौतुकास्पदरित्या हाताळली आहे, असं तज्ज्ञांचं आणि जाणकारांचं मत आहे. पण या पिता-पुत्रांच्या सरकारमधल्या कामगिरीचा शिवसैनिकांना जरी अभिमान वाटत असला तरी पक्षीय पातळीवर मात्र शिवसेनेचे दोन वर्षात बरेच नुकसान झालेय. हे अनंत गीते, रामदास कदम यांची दुसरी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकेल.

शिवसेना हा व्यक्तिकेंद्रित असा एक खांबी तंबू असलेला पक्ष आहे. त्यामुळे या पक्षाच्या मागे आणि पुढे फक्त ठाकरे आणि ठाकरेच असतात. त्यामुळे शिवसैनिकांनादेखील याच आडनावाकडून किंवा ‘मातोश्री’ कडूनच आदेश ऐकण्याची सवय झाली आहे. असल्यामुळे जरी पक्षाच्या पातळीवर बांधणी करणे राहून गेलं असलं तरी उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्रीपदावर असल्यामुळे आणि आदित्य ठाकरे मंत्रिमंडळात गेल्यामुळे संघटनेत तळाच्या कार्यकर्त्याला आणि त्याच्यावरच्या विभाग प्रमुखापर्यंतच्या पातळीवर काहीसा सुस्तपणा आणि ढिलेपणा आलेला आहे. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पदावरुन काम करताना दर महिन्याला कटाक्षाने मुंबईतले विभागप्रमुख किंवा तीन महिन्यातून एकदा तरी वेगवेगळ्या जिल्हाप्रमुख यांच्या बैठका आणि भेटीगाठी होत होत्या. पण मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर आणि त्यातही कोविडने निर्बंध आणल्यावर सर्वोच्च नेता आणि पदाधिकारी यांच्यामध्ये एक खूप मोठी दरी पडल्याचं दिसत आहे.

त्यातही मुंबईतील जे काही अकरा विभाग प्रमुख आहेत त्यांचं समन्वयाचं काम ज्या अनिल परब यांच्याकडे देण्यात आलं त्यांच्याकडे वेगवेगळ्या जबाबदार्‍यांमुळे कामाचा ढीग जमा झालेला आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजशिष्टाचार, त्यांच्या अवतीभवतीचं सुरक्षेचं कडं यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागातून येणार्‍या पदाधिकार्‍यांना ठाकरेंपर्यंत पोहोचणं कठीण होतंय. अशा परिस्थितीत दुसर्‍या फळीच्या नेत्यांनी काही गोष्टी समजून काम करण्याची गरज होती, मात्र उत्तर महाराष्ट्रातले गुलाबराव पाटील, मराठवाड्यातले चंद्रकांत खैरे, ठाणे-पालघरमध्ये एकनाथ शिंदे अशा मोजक्या नेत्यांचा अपवाद वगळता इतरत्र पक्ष बांधणी करताना फारसं कोणीच दिसत नाहीये. अपवाद संजय राऊत यांचा असला तरी त्यांनीही स्वतःभोवती एक कोंडाळं जमवलं आहे. हे जर ते टाळू शकले तर सध्या वेळ देणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल.

दुसर्‍या बाजूला तर आपण राष्ट्रवादीचा विचार केला तर मंत्रालयात बसलेले अजित पवार हे मुख्यमंत्र्यांबरोबर खांद्याला खांदा लावून दोन पावलं पुढेच टाकण्याचा प्रयत्न करत असताना तिकडे पक्षीय पातळीवर जयंत पाटील, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे अशी मंडळी पक्ष बांधण्याचं काम करत आहेत. अत्यंत आक्रमकपणे सरकारचा फायदा पक्षाला कसा होईल आणि पक्ष कसा फोफावेल हे ही मंडळी पाहत आहेत. याचं एक सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे पक्षात सबकुछ पवार असले तरी त्यांनीच बनवलेली सर्वसंमतीची चौकट हा भाग दुर्लक्षित करून चालणार नाही. ठाकरे पिता-पुत्र सरकारमध्ये अडकल्यामुळे शिवसेना भवन हे काहीसं सुनं झाल्याचं दिसून येतंय. एरवी तिथे बसणारे पक्षाचे सचिव अनिल देसाई हे शिवसेनेतील हुशार नेत्यांपैकी एक समजले जातात. तिन्ही भाषांवर प्रभुत्व असलेला हा नेता गेले काही काळ विलक्षण अडगळीत पडलेला आहे अर्थात त्याला या नेत्याकडून झालेल्या दिल्ली दरबारातल्या काही चुका कारणीभूत ठरलेल्या आहेत.

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या माध्यमातून अनिल देसाईंकडून झालेल्या चुकांचा पाढा जेव्हा उद्धव ठाकरे यांना वस्तुनिष्ठ परिस्थितीनुसार दिल्लीतल्या नेत्यांनी लक्षात आणून दिला, त्यानंतर अनिल देसाई अडगळीत गेले. ठाकरे मुख्यमंत्रीपदावर बसले आणि त्यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांनादेखील लांब करण्यात आलेला आहे, गेल्या अनेक निवडणुका त्यातले उमेदवार त्यांची योग्य निवड त्यांचे एबी फॉर्म, विरोधकांबरोबरचे संबंध या सगळ्या गोष्टींची इत्यंभूत माहिती असणारे शिवसेनेकडे दोन नेते म्हणजे अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर असल्यामुळे त्यांना भेटून जय महाराष्ट्र करणं हेदेखील आता शिवसेनेतल्या अनेकांनी सोयीस्कररीत्या करणं पसंत केलं आहे, अशा परिस्थितीत पक्षीय पातळीवर होणारे कार्यक्रम याला खूप मोठी झळ पोहोचलेली आहे, त्यातही युवा सेना आणि शिवसेना यांच्यामध्ये असलेला अलिखित दुरावा हा देखील एका ऊर्जावान संघटनेसाठी अडचणीचा मुद्दा ठरलेला आहे. अगदी मुंबई महानगरपालिकेचा जरी विचार केला तरी तिथे असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांकडून पक्षाने केलेल्या कामाच ठसा उमटवण्यात अपयश आलेलं आहे.

शिवसेनेत सत्तेच्या वेगवेगळ्या पदांवर बसून पोट भरलेले आणि दुसरी पिढी सोन्याच्या ताटावर बसली असली तरी मातोश्रीच्या नावाने बोटे मोडणारे रामदास कदम यांच्यासारखे नेते एका बाजूला आहेत तर फक्त मातोश्री हा ध्यास घेऊन निवडणुकांमधून घाम गाळणारे शिवसैनिक दुसर्‍या बाजूला आहेत. दोन वर्षात काम करणारा मंत्री असा ठसा उमटवलेल्या आदित्य ठाकरे यांनी आता खर्‍याखुर्‍या अर्थाने आणि आपल्या चष्म्याच्या काचा स्वच्छ करून पक्षाकडे पाहण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षाची सूत्र आदित्य यांच्याकडे जाणार आहेत. त्यांची काम करण्याची शैली ही आपले आजोबा आणि वडील यांच्यापेक्षा पूर्ण भिन्न आहे. प्रत्येकाची स्वतःची एक शैली असते तशी आदित्य यांचीही आहे. याच त्यांच्या वेगळ्या शैलीने त्यांनी पक्ष संघटनेकडे बघण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कालच्या सहा जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांच्या निकालांनी हे अधोरेखित केलेलं आहे. या निवडणुकांमध्ये शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असूनही शिवसेना चौथ्या क्रमाकांचा पक्ष ठरला आहे.

शिवसेना हा पक्ष ऊर्जा आणि उत्साहाने जरी भरलेला असला तरी या पक्षांमध्ये छोट्या चुकीला मोठी शिक्षा नेहमीच दिली गेलेली आहे. अर्थात यामध्ये काही अपवाद हे आपल्याला करण्यात आल्याचं लक्षात येतंय. अनिल देसाई काय किंवा सुनील शिंदे यांनी आपापल्या परीने पक्षासाठी योगदान दिलेलं आहे. त्यांच्याकडून झालेल्या चुकांना माफ करा असं सांगण्याचा माझा अधिकार नाही हे जरी खरं असलं तरी स्वर्गीय शिवसेनाप्रमुख काय किंवा उद्धव ठाकरे काय किंवा शरद पवार काय यांना एक कार्यकर्ता व पदाधिकारी उभा करण्यासाठी अनेक वर्षं मेहनत घ्यावी लागते. त्या कार्यकर्त्याला किंवा पदाधिकार्‍याला वाळीत टाकणं किंवा प्रवाहाबाहेर ढकलून देणे हे जरी सोपं असलं तरी ते दोघांसाठी तितकंच क्लेशदायक असतं. त्यामुळेच आदित्य ठाकरे यांनी अशा अनेक कार्यकर्त्यांना, पदाधिकार्‍यांना एकत्र करण्याची हीच वेळ आहे. मंत्रालयातल्या दालनाबरोबरच शिवसेना भवनात पक्षीय कामकाजासाठी आदित्य यांनी वेळ द्यायला हवा. कारण पक्ष मजबूत होता म्हणून उध्दव ठाकरे यांनी भाजपसारख्या केंद्रात सत्तेवर असलेल्या पक्षाला अंगावर घेतलं. भविष्यात आदित्य ठाकरेंना हे करायचं असेल तर त्यांनी या घटस्थापनेपासूनच संकल्प सोडायला हवा. सेनाभवनात विराजमान असलेल्या भवानीमातेचा तोच खरा जागर असेल.