घरफिचर्समायमहानगर ब्लॉगफडणवीसांचा चतुर कावा, महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा दावा !

फडणवीसांचा चतुर कावा, महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा दावा !

Subscribe

पुरेसं संख्याबळ नसतानाही राज्यसभेच्या तीनही जागा जिंकणार्‍या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता विधान परिषदेसाठी पाच उमेदवार मैदानात उतरवून सत्ताधारी महाविकास आघाडीचं टेन्शन वाढवलं आहे. एकीकडे, सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेनेला नामोहरम करण्याचं काम फडणवीस यांनी विविध माध्यमातून सुरू ठेवलं आहे. त्याचवेळी स्वपक्षात कुणीही प्रतिस्पर्धी दावेदार तयार होता कामा नये, याची दक्षताही फडणवीस घेताना दिसत आहेत. सत्ताधारी आणि भाजपमध्येच असलेल्या पक्षांतर्गत विरोधकांचं राजकीय अस्तित्व धोक्यात आणण्यातही फडणवीस कमालीचे यशस्वी ठरत असल्याचं चित्र आहे. यातून महाराष्ट्रात भाजपचं नेतृत्व एकमेव फडणवीसचं करू शकतात, असंच सध्याचं चित्र पहावयास मिळत आहे.

भाजप-शिवसेना सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या सात वर्षांच्या कालावधीत भाजपमधील विरोधक संपवण्याचं काम केलं आहे. खरं तर युती सत्तेवर आली त्यावेळी एकनाथ खडसे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विनोद तावडे आदी नेते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. पण, मुख्यमंत्रीपदाची लॉटरी देवेंद्र फडणवीस यांना लागली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. खडसे, मुंडे, तावडेंविरोधात लॉबिंग करत असताना फडणवीसांनी त्यांना अलगद बाजूला काढण्याचं काम केलं. त्यासाठी काही विरोधकांचा वापर करण्याचं काम त्यांनी केलं. एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांना मंत्रीपदाचे राजीनामे द्यावे लागले.

पंकजा मुंडे आणि चंद्रकांत पाटलांचं वर्चस्व वाढू नये, याची दक्षता घेण्यात आली. खडसेंनी बंड पुकारलं. पण, पक्षश्रेष्ठींनी त्यांचं काही एक ऐकलं नाही. अखेर खडसेंनाच पक्षातून स्वतःहून बाहेर पडावं लागलं. तावडे यांचंही तेच हाल झाले. पण, त्यांनी पक्ष सोडण्याऐवजी गप्प राहणं पसंत केलं. त्यामुळे पक्षाने त्यांची पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीत वर्णी लावून त्यांना महाराष्ट्रात स्थान नाही, असाच संदेश दिला आणि तावडे राज्यातील राजकारणातूनच बाहेर फेकले गेले. पक्षांतर्गत विरोधकांचे असे हाल होत असल्याचं लक्षात आलेल्या चंद्रकांत पाटलांनी फडणवीसांशी जुळवून घेत मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाला तिलांजली दिली.

- Advertisement -

असं असलं तरी पंकजा मुंडे मात्र झुकल्या नाहीत की त्यांनी माघारही घेतली नाही. उलट पंकजा मुंडे या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असाच प्रचार त्यांच्या गोटातून सुरू होता. गोपीनाथ गडावर शक्तीप्रदर्शन करत त्यांनी आपली महत्वाकांक्षा कायम असल्याचंच सातत्याने पक्षश्रेष्ठींना दाखवण्याचं काम केलं. त्यातूनच फडणवीस विरुध्द मुंडे संघर्षाची ठिणगी पडली. गोपीनाथ मुंडे यांनी चाळीस वर्षाच्या राजकीय संघर्षातून राज्यात सत्ताधारी पक्ष करण्यात मोठे योगदान दिले. त्यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांना राजकीय वारसा म्हणून भाजपच्या सत्तेत मंत्रिपदाची संधी मिळाली. खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना दुसर्‍यांदा संधी मिळाली. मात्र, प्रदेश स्तरावरील अंतर्गत संघर्षातून देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय वाद अनेकदा समोर आला.

परळी विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी विरोधकांना पक्षाच्याच नेत्यांनी रसद पुरवल्याचा आरोप करत पराभवाचं खापर देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडलं. तेव्हापासून दोघांमधील राजकीय वाद वाढत गेला. मुंडे कडव्या प्रतिस्पर्धी ठरत असल्याचं लक्षात आल्यावर पक्षांर्तग राजकारण सुरू झालं. दोन वर्षांपूर्वी विधान परिषदेवर पंकजा मुंडे यांच्याऐवजी पक्षाने मुंडे समर्थक रमेश कराड तर राज्यसभेवर डॉ. भागवत कराड यांना संधी दिली. इतकंच नाही तर भागवत कराड यांना थेट केंद्रीय मंत्री केलं. यामुळे पंकजा मुंडे यांना पक्षात डावललं जात असल्याचा आरोप करत मुंडे समर्थकांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याविरुध्द समाज माध्यमातून टीकेची झोड उठवली आहे.

- Advertisement -

गोपीनाथ गडावर झालेल्या सभेत पंकजा मुंडे यांनी, संधी मिळाली तर सोने करीन. आपण विधान परिषदेवर जावं. अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असं जाहीरपणे सांगत विधान परिषदेत जाण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, विधान परिषदेची उमेदवारी नाकारली गेल्याने पंकजा मुंडेंसह त्यांचा समर्थकांना धक्का बसला आहे. त्यामुळे समर्थकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. समर्थक प्रदेश नेतृत्वाविरुध्द आरोपांची राळ उडवत रस्त्यावर उतरल्याचं पहायला मिळालं. पाथर्डीत एका समर्थकाने माध्यमांसमोरच विषप्राशन केलं. औरंगाबादमध्ये कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जालन्यात आत्मक्लेष आंदोलन करण्यात आलं. बीडमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवून पंकजा मुंडे समर्थकांनी निषेधाच्या घोषणा देत आपला संताप व्यक्त केला.

गंगाखेड तालुक्यात ‘पंकजाताई नाही तर भाजपा नाही, कमळ चिन्ह हद्दपार करणार’, अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे. त्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये कमालीची नाराजी असल्याचे चित्र पाहावयास मिळत असून पक्षांतर्गत राजकीय वाद आता चव्हाट्यावर आला आहे. गोपीनाथ मुंडे यांनीही पक्षांतर्गत स्पर्धेत दोनवेळा सर्व पदांचा राजीनामा देण्याची घोषणा करून बंड केले होते. मात्र वेळीच आपली नाराजी परत घेऊन पक्ष नेतृत्वाबरोबर जुळवून घेतलं होतं. पण, पंकजा मुंडे मौन बाळगून असून कार्यकर्ते नेतृत्वाविरुध्द थेट रस्त्यावर उतरून रोष व्यक्त करत असल्याचं पहिल्यांदाच घडत आहे.

पंकजा मुंडेंचे समर्थक आक्रमक होऊन संताप व्यक्त करत असताना पक्षनेतृत्वाने त्याची फारशी दखल घेतलेली दिसत नाही. पंकजांना उमेदवारी मिळावी म्हणून फडणवीस आणि मी खूप प्रयत्न केले. मात्र, आमच्याकडे केंद्रातील वरिष्ठ जो निर्णय घेतील तो स्वीकारावा लागतो. तो एका विशिष्ट शिस्तीने घेतला जातो, असा खुलासा त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला होता. पंकजा मुंडे मध्य प्रदेशच्या सहप्रभारी असून भविष्यात त्यांना आणखी जबाबदारी देणे केंद्राच्या मनात असेल म्हणून त्यांना ही उमेदवारी मिळाली नाही, असंही ते सांगायला विसरले नव्हते. पंकजा मुंडेंबाबत मौन बाळगून असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. पुढील वर्षी मध्य प्रदेशच्या निवडणुका आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे त्यात व्यस्त असल्याने त्यांना वेळ देता येत नसल्याने उमेदवारी दिलेली नाही. पण, त्यांना योग्य स्थान दिलं जाईल, असं फडणवीसांनी उत्तर दिलं. पक्षनेतृत्वाकडे बोट दाखवून उमेदवारी न मिळण्यात आपला काहीही संबंध नाही, असं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला दिसतो.

मध्यंतरी पंकजा मुंडे यांनी मुंबईत देवेंद्र फडणवीसांना सल्ला देण्याचं काम केलं होतं. गोष्टी मनात ठेवू नये, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अंत्यत महत्वाचं विधान केलं होतं. फडणवीस हे अत्यंत संयमी नेते आहेत. पंरतु त्यांनी मनात कसल्याच गोष्टी ठेवू नयेत. काही बोलायचं असेल तर त्यांनी स्पष्ट बोलायला हवं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. फडणवीसांचे जर काही गैरसमज झाले असतील तर त्यांनी ते व्यक्त करायला हवेत. फडणवीसांनी अशा गोष्टी मनात ठेवू नयेत अन्यथा त्यांनाच त्रास होईल, असा सल्ला देत फडणवीसांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यावर फडणवीसांकडून कुठलीही प्रतिक्रिया अद्यापर्यंत आलेली नाही. त्यातून दोघांमधील अंतर्गत वाद अद्याप संपलेला नाही, हेच दिसून आलं आहे.

मुंडेंशी असा संघर्ष सुरू असतानाच मुंडे समर्थक महादेव जानकर आणि विनायक मेटे यांचंही भाजपमधील स्थान कमकुवत होत गेलं. जानकर यांनी धनगर समाजात फार मोठं काम केलं. शरद पवारविरोधातील त्यांचा संघर्ष महाराष्ट्र ओळखून आहे. त्यातून पवारांविरोधातील शस्त्र म्हणून भाजपनं जानकर यांचा जवळ करत थेट मंत्रीपदावर बसवलं. पण, पंकजा मुंडेंची सोबत जानकरांच्या राजकीय अस्तित्वाला घातक ठरली. भाजपने जानकरांना बाजूला सारत गोपीचंद पडळकर यांना जवळ केलं. सध्या पडळकर उठसुठ पवारांवर तोंडसुख घेत भाजपचं काम करत आहेत. त्यामुळे भाजपला आता जानकरांची गरज राहिलेली नाही. तीच गत विनायक मेटे यांची करण्यात आली.

राष्ट्रवादीची आमदारकी उपभोगल्यानंतर मेटेंनी भाजपशी संधान साधून आमदारकी पदरात पाडून घेतली होती. मागच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा गेम करण्याचं काम केलं होतं. त्याच मेटेंचा आता भाजपने गेम केला आहे. त्यामुळे मेटे आणि जानकर भाजपविरोधात गळा काढत आहेत. पण, भाजप त्यांना दाद द्यायला तयार नाही. शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या संघटनेतही फुटीची बिजे रोवण्याचं काम भाजपनं केलं. सोबत असतानाही शेट्टींचं राजकारण संपवण्यासाठी भाजपने त्यांचे खंदे समर्थक सदाभाऊ खोत यांना जवळ करून मंत्रीपद दिलं. मंत्रीपदावर बसल्यावर शेट्टी आणि खोत यांच्यात अपेक्षेनुसार संघर्ष सुरू झाला. दोघे कट्टर वैरी बनले आणि भाजपचं काम झालं. एका दगडात दोन पक्षी मारण्याचं कामही साध्य झालं.

विधान परिषदेचं गाजर दाखवून खोत यांना उमेदवारी अर्ज दाखल करावयास लावला. आणि शेवटच्या क्षणी खोत यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास लावण्याचं काम करत आता त्याच सदाभाऊ खोतांचं राजकारण संपवण्याचं काम भाजपमधूनच केलं जात आहे. मध्यंतरी भाजपमधील घुसमट खोत यांच्या एका वायरल झालेल्या व्हिडीओतून समोर आली होती. इतकी वर्षे राजकारणात असलेल्या महादेव जानकर, विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांना स्वतःचे विधानसभा मतदारसंघही तयार करता आलेले नाहीत. त्यामुळेच त्यांचा वापर करून महत्व संपल्यानंतर भाजपनं त्यांना बाजूला करण्याचं काम केलंय, ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी फडणवीसांनी गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आदींची कोअर टीम तयार केली आहे. यावरून फडणवीसांची खेळी लक्षात घेण्यासारखी आहे. इतर नेत्यांना महत्वाची जबाबदारी दिली तर भविष्यात डोईजड होण्याची शक्यता लक्षात घेऊन फडणवीसांचा हा प्रयत्न असण्याचीच दाट शक्यता आहे. एकंदरीत केंद्रीय नेतृत्वाला आपणच सक्षम असल्याचं दाखवून देत फडणवीसांनी राज्यातील पक्षांर्गत विरोधकांचं राजकीय अस्तित्व धोक्यात आणून स्वतःची जागा पक्की केली आहे. त्यामुळे भाजपला सरकार स्थापनेची संधी मिळाल्यास मी पुन्हा येईन, म्हणणार्‍या फडवणीसांना कुठलाच अडथळा असणार नाही.

फडणवीसांचा चतुर कावा, महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा दावा !
Shashi karpehttps://www.mymahanagar.com/author/shashi-karpe/
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -