घरफिचर्समायमहानगर ब्लॉगहुश्श.. सुटलो बुवा...आर्यन

हुश्श.. सुटलो बुवा…आर्यन

Subscribe

गेले सव्वीस दिवस देशभरातील तमाम मीडियाने अत्यंत प्रतिष्ठेची करून ठेवलेली शाहरुख खान पुत्र आर्यन खान याच्या हाय प्रोफाईल ड्रग्स प्रकरणात शाहरुख खान बरोबरच या प्रकरणाशी गुंतलेल्या सार्‍यांनीच आर्यन खानला गुरुवारी जामीन मिळाल्याने काहीसा सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. यात आर्यन खान शाहरुख खान यांना तर न्यायालयाने दिलेल्या जामिनामुळे निश्चितच मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र त्याच बरोबर गेले तब्बल तीन आठवडे देशासमोर आर्यन खानशिवाय अन्य कोणताही महत्वाचा प्रश्न नसल्याप्रमाणे 24 तास रहाटगाडे चालवणार्‍या न्यूज चॅनलच्या त्यात कंटाळवाण्या मीडिया ट्रायलमधून सर्वसामान्य प्रेक्षकांची तीन आठवड्यानंतर सुटका झाल्याचा आनंद सामान्य जनतेला अधिक आहे.

कारण गेले दोन अडीच वर्षे हात धुवून मागे लागलेल्या कोरोना संसर्गाचा प्रभाव आता कुठे थोडा ओसरू लागला आहे, त्यात पुन्हा तिसर्‍या लाटेच्या भीतीची टांगती तलवार लोकांच्या डोक्यावर आहे, कारण गेल्या वर्षीही दिवाळीच्या काळात लोकांना वाटले होते की, आता कोरोना गेला. लोकांनी कोरोनाचे नियम पाळणे सोडून दिले होेते, पण कोरोना असा काही भयानक प्रकारे उलटला की, सगळा महाराष्ट्र ऑक्सिजनवर गेला. कोरोनाच्या चाकाखाली सर्वसामान्य माणूस भरडून निघाला आहे. त्याची जमापुंजी संपली आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमती सतत वाढत आहेत. त्यामुळे महागाई वाढत आहे. सामान्य माणूस कसा तरी सावरण्याचा प्रयत्न करत आहे. शाहरुख खान आणि त्याच्यासारख्या गडगंज संपत्ती असलेल्यांना आणि त्यांच्या मुलांना सामान्य माणसाला कसे दिवस काढावे लागतात याची कल्पना येणार नाही. त्यांचे अमली उपद्व्याप विनाकारण सामान्य माणसांच्या डोक्यावर मारले जात होते.

- Advertisement -

सध्या सर्वच राजकीय पक्षांचा एककलमी अजेंडा म्हणजे प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे शोधून काढायची. त्याबाबत सीबीआयकडे तक्रारी करायच्या आणि नंतर संबंधित राजकीय नेता हा भ्रष्टाचारात मुक्त झाला आहे अशा ठाम समजुतीने मीडियाच्या आणि प्रसारमाध्यमांमधून त्याची यथेच्छ बदनामी करून स्वतःच्या आत्म्याची शांती करून घ्यायची अशी पद्धतच गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय राजकारणात मोठ्या प्रमाणावर रूजत चालली आहे. असे भ्रष्टाचाराचा आरोप करून अथवा वैयक्तिक चरित्र आनंद करून अल्पावधीत लोकप्रिय होता येते आणि घराघरातील टीव्हीवरच्या पडद्यांवर तसेच प्रत्येकाच्या हातात असलेल्या मोबाईलच्या स्क्रीनवर फुकटात रडता येत असल्यामुळे अशा सवंग लोकप्रियतेच्या आहारी गेलेल्या व्यक्तींची आणि राजकीय नेत्यांची ही संख्या गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढत आहे. येथे प्रश्न भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई लढू नये असा नाही, तर प्रत्येक गोष्टीकडे संशयास्पद आणि पूर्वग्रहदूषित नजरेने बघणे हेदेखील सुसंस्कृत आणि सुशिक्षित समाजात संशयकल्लोळाचे विष कालवण्याचे काम आहे.

सरकारी यंत्रणा म्हटली की, भ्रष्टाचाराने ओतप्रोत भरलेलीच असणार, बॉलीवूडचे सेलिब्रिटीज म्हटले की ते ड्रगशी संबंधितच असणार, मीडिया म्हटला की तो पेडच असणार अशा थांब मात्र विकृत गैरसमजुतीमधून सर्वसामान्यांच्या डोक्यांचा अशा घटनांमुळे अक्षरशा भुगा झाला आहे. प्रसार माध्यमांमधून अशा घटना गेल्या काही वर्षात सातत्याने सर्वसामान्य प्रेक्षकांवर अक्षरश: लादण्यात येत असल्यामुळे सामान्य माणूसही हळूहळू या गोबेल्स प्रचाराचा एक भाग होऊन बसतो. अशीच अवस्था काही वर्षांपूर्वी छापील प्रसारमाध्यमांची होती. छापील प्रसार माध्यमांची एक हाती हुकूमत वृत्तवाहिन्यांचा जन्म होण्यापूर्वी व त्यांची वाढ होण्यापूर्वी होती. मात्र हळूहळू वृत्तवाहिन्यांनी दैनंदिन चालू घडामोडींबरोबरच वृत्त विश्लेषण घडामोडींचे सविस्तर विश्लेषण सुरू केले आणि मग विश्लेषण करण्याची छापील प्रसारमाध्यमांची मक्तेदारीदेखील वर्चस्ववादी राहिली नाही. अर्थात यामुळे वृत्तवाहिन्या बेफाम होत गेल्या आणि सेलिब्रिटीज नेत्यांचा कल हा छापील माध्यमांकडून हळूहळू वृत्तवाहिन्यांकडे सरकू लागला.

- Advertisement -

मात्र आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात कोणत्याही क्षेत्रात एका विशिष्ट पद्धतीची यापुढे कधीच पूर्णतः मक्तेदारी राहू शकणार नाही. आणि असे प्रमुख कारण आहे तंत्रज्ञानात सातत्याने होत असणारे महत्त्वाचे आणि आमुलाग्र बदल. प्रसार माध्यमांमध्ये छापील आणि वृत्तवाहिन्या यांच्यातील जीवघेण्या स्पर्धेतदेखील ही प्रसार माध्यमे टिकून राहिली याचे प्रमुख कारण म्हणजे वाचकांची असलेली विश्वासाहर्ता आणि त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेच्या हिताची असलेली बांधिलकी ही याच्या मुळाशी होती. आता वृत्तवाहिन्यांना सोशल मीडियाने प्रचंड मोठे आव्हान उभे केले आहे. एखादी घटना अथवा घडामोड ही वृत्तवाहिनीवर झळकण्याआधीच कोट्यावधी लोकांच्या हातात असलेल्या स्मार्ट फोनवर क्षणार्धात व्हायरल होत असते. त्यामुळे शहरांपासून ते अगदी गावोगावी यूट्यूब चॅनलचे उधाण आलेले आहे. सहाजिकच खेडोपाडी उभ्या राहिलेल्या यूट्यूब चॅनलनी वृत्तवाहिन्यांच्या व्यावसायिकते समोर भले मोठे आव्हान उभे केले आहे.

हे एवढे सर्व सविस्तरपणे उहापोह करण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे गेल्या दोन तीन आठवड्यांपासून वृत्तवाहिन्यांवर अखंडपणे सुरू असलेल्या आर्यन खान याचे कार्डेलिया क्रूडवरील पार्टीचे ड्रग्स प्रकरण होय. एखाद्या प्रकरणाचा मीडियाने आणि प्रसार माध्यमांनी किती किस काढावा याला कोणतेही निर्बंध राहिलेले नाहीत. कोण हा आर्यन खान? ही त्याच्यासाठी सर्वसामान्य जनतेने त्याला जो काही थोडाफार मोकळा वेळ मिळतो तोदेखील त्याने आर्यन खानच्या लीला पाहण्यासाठी व्यर्थ खर्च करावा. मीडिया ट्रायलच्या नावाखाली गेली काही वर्षे सतत वेगवेगळ्या घटनांमधून अशाप्रकारे तेच तेच गुर्‍हाळ सुरू ठेवण्याच्या या भंपकपणाला भारतीय प्रेक्षक आता कंटाळला आहे. आणि तो आता मीडियापासून दोन हात दूर होत सोशल मीडियाकडे वळला आहे.

आर्यन खानच्या प्रकरणात राष्ट्रवादीचे मुंबईतील नेते व राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी मात्र रोज पत्रकार परिषदा घेत नार्कोटिक्स ब्युरोचे जे काही पितळ उघडे पाडण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे बॉलिवूडमध्ये तर नवाब मलिक यांच्याविषयी नव्याने सहानुभूती निर्माण झालीच आहे, मात्र त्याचबरोबर मुंबई आणि महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजालाही नवाब मालिकांमुळे बळ प्राप्त झाले आहे. त्यामुळेच एनसीबीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून शाहरुख खानसारख्या सेलिब्रिटीला अडचणीत आणून संपूर्ण बॉलिवूडची बदनामी करण्याचे जे काही षङ्यंत्र रचण्यात आले होते ते ज्याने रचले त्यांच्यावरतीच बूमरँग झाले आहे.

राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर, तेथील प्रमुख अधिकार्‍यांवर, तसेच तपास यंत्रणांच्या माध्यमातून होणार्‍या वसुलीवर हल्ला चढवला आहे. तो जर कागदोपत्री पुराव्यासह भविष्यकाळात सिद्ध झाला तर मात्र केंद्रीय तपास यंत्रणांची होणारी नामुष्की कोणीही थांबवू शकणार नाही. अर्थात यावेळचे चित्र मात्र जे काही दिसत आहे त्यानुसार नवाब मलिक हे मुंबईसह महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजाचे मसीहा बनले आहेत असेच आहे. नवाब मलिक यांचे मुंबईतील नेतृत्व आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सिद्ध होणारच आहे. मात्र एनसीबीने पालिका निवडणुकीपूर्वी नवाब मलिक यांना जे काही मसीहा केले आहे, त्याचा परिणाम केंद्रातील सत्ताधार्‍यांना भोगावा लागला तर मात्र ती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी धोक्याची घंटा ठरू शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -