घरफिचर्समायमहानगर ब्लॉगयुवा पिढी देशद्रोही कशी?

युवा पिढी देशद्रोही कशी?

Subscribe

गेल्या काही वर्षांत दहशतवाद, दंगल करणे आणि देशाविरोधात कट रचणे या आरोपांखाली अनेक तरुणांना अटक केली आहे. एक योगायोग असा आहे की यापैकी बहुतेक तरुण प्रतिष्ठित विद्यापीठात शिक्षण घेत आहेत किंवा असे तरुण जे स्वतःच्या हिमतीने कुटुंबाची हलाखीची स्थिती असताना देखील अन्यायाविरोधात आवाज उठवत आहेत. काही दलितांच्या हक्कांसाठी आवाज उठवत आहेत, कोणी मजूर-शेतकरी आणि आदिवासींवर संशोधन करत आहेत, काही महिलांच्या हक्कांसाठी संघर्ष करत आहेत किंवा काही भांडवलदारांच्या हिताच्या धोरणांचे आणि कायद्यांचा विरोध करत आहेत.

यादी खूप मोठी आहे आणि अजून मोठी होत जाणार आहे. थांबा, बाजारात खरेदीसाठी किरण्याची जी यादी घेऊन जातो त्याबद्दल बोलत नाही आहे. मी ज्या यादीबद्दल बोलतोय ती यादी आहे देशद्रोही लोकांची. सरकारी यादीमध्ये ज्या प्रकारे ‘देशद्रोह्यांची संख्या’ वाढत आहे, त्यावरून सरकारच्या विरोधात बोलतील त्यांच्यावर देशद्रोही हे लेबल चिकटवला जाईल हे निश्चित! जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिले तर या यादीतील तरुणांची संख्या जास्त आहे. देशद्रोहापासूनच्या सर्व गुन्हेगारी प्रकरणात वेगवेगळ्या भागातील तरुणांना अटक केली जात आहे किंवा अटकेची तलवार त्यांच्यावर लटकली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणाचे रिपोर्टिंग करणार्‍या पत्रकार सिद्दीक कप्पनला अटक असो किंवा तरुण पत्रकार मनदीप पुनियाला अटक असो… किंवा दलित-कामगार कार्यकर्त्या नवदीप कौरला अटक असो किंवा अशी असंख्य प्रकरणे – जे जे सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरतील अशांना धडा शिकविण्याकडे सरकार लक्ष देत आहे. प्रश्न उपस्थित करणारा युवा वर्ग हे आता सरकारचे लक्ष्य आहे. त्यांच्याच मातृभूमीत त्यांना खलनायक ठरवण्याचे षङ्यंत्र वेगाने सुरू आहे. हे लिहिण्यामागचे कारण म्हणजे नुकतीच 22 वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीला झालेली अटक. आता तिला जामीन मिळाला आहे.

ग्रेटा थनबर्गच्या टूलकिट प्रकरणात 22 वर्षीय बेंगळुरूमधील पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीला अटक करणे आणि घाईघाईने तिला पोलीस कोठडीत पाठविणे हे देशातील युवांविरूद्ध युद्ध छेडण्यात आलेले एक जिवंत उदाहरण आहे. अर्थात ही मालिका येथे थांबली नाही, कारण मुंबई येथील वकील निकिता जेकब आणि शंतुनू यांना महाराष्ट्रातून अटक करण्याची तयारी सुरू करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण ज्या पद्धतीने देशाविरूद्ध कट रचणे आणि ते देखील आंतरराष्ट्रीय कट असल्याचे जे काही चित्र निर्माण केले आहे, त्यावरून हे स्पष्ट होतेय की हा फॉर्म्युला सर्व आंदोलन आणि जे कोणी विरोध करत आहेत, त्या विरोधाला गुन्ह्यांमध्ये रूपांतरित करण्यासाठी वापरला जात आहे.

- Advertisement -

26 जानेवारीला दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर अमेरिकन पॉप स्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी ट्विट केले. ग्रेटाने ट्विट करताना टूलकिट देखील शेअर केले. हे टूलकिट तयार करण्यामागे दिशा रवी, निकिता जेकब आणि शंतनू मुळूक यांचा हात असल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी केला. दिल्ली पोलिसांनी दिशा रवीला तिच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर तिला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. टूलकिटबद्दल बोलायचे झाले तर त्या टूलकिटमध्ये सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनाविषयी ट्विट करणे एवढेच आहे. त्यात दिल्ली हिंसाचाराबद्दल काहीच नाही आहे, असे दिशाच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. आपले मत व्यक्त करणे हा काही गुन्हा नाही. टूलकिट आक्षेपार्ह आहे का, हा प्रश्न आहे. कोणत्याही महत्वाच्या मुद्यांवर कोणाशीही बोलणे हा गुन्हा नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार सर्व काही बंगळुरुमध्ये झाले, तर तुम्ही 5 दिवसांच्या पोलीस रिमांडमध्ये एकदाही बंगळूरुमध्ये गेला नाहीत. कुठेही छापेमारी केली नाही. काहीही सापडले नाही, असे दिशा रवीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. जर 5 दिवस पोलिसांच्या रिमांडमध्ये असताना पोलिसांनी दिशाला बंगळुरूमध्ये का नेले नाही? कशाही प्रकारची छापेमरी का करण्यात आली नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्ली पोलीसच देतील. पण एका 22 वर्षाच्या मुलीपासून देशाला कसला धोका आहे? हा प्रश्न अनुत्तरित आहे. जी मुलगी देशाच्या पर्यावरणाचा, देशातील जनतेचा विचार करते. त्या दिशा रवीने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला ही तिची चूक आहे का, याचे उत्तर कोण देईल?

हा प्रश्न यासाठी उपस्थित होतोय. कारण दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे ग्राउंड रिपोर्टिंग करणारा मनदीप पुनिया या पत्रकारालादेखील दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. दिल्ली सीमेवर आंदोलन करत असलेले शेतकरी आणि तिथल्या कथित स्थानिकांमध्ये चकमक झाली. याचे रिपोर्टिंग मनदीप पुनियाने केले. त्यामुळे त्याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. पुनियाविरुध्द चार कलमांत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आता मनदीप पुनिया हा जामिनावर बाहेर आहे. मात्र, शेतकरी आंदोलनाचे कव्हरिंग करणे एकप्रकारे सरकारच्या विरोधात असून तुम्हाला आम्ही ताब्यात घेणार असेच काहीसे पुनियाच्या अटकेवरून स्पष्ट होतेय. कारण याचेच दुसरे उदाहरण म्हणजे नवदीप कौर!

- Advertisement -

नवदीप कौर ही 24 वर्षाची तरुणी पत्रकार आहे, जी मागील काही दिवसांपासून पोलीस कोठडीत आहे. शेतकरी आंदोलन सुरू झाल्यापासून ती तिथे आहे, पण तिची उपस्थिती, तिने विचारलेले प्रश्न, शेतकरी आंदोलकांसोबतच मजुरांना, कामगारांना आंदोलनात सामील व्हायचे तिने आवाहन केले होते, तसे लोक एकत्र यायला सुरू झाले होते. शेतकरी आंदोलनात कंपन्यांमधील मजूर जर सामील झाले असते तर हे आव्हान सरकारला पेलण्याच्या पलीकडे झाले असते. खासगीकरण, कंत्राटी पद्धतीत कामगारांचे शोषण, किमान वेतनाच्या कायद्यापेक्षा कमी दिली जात असलेली मजुरी आणि वाढती आर्थिक दरी यावर तिने आंदोलन छेडले होते. पण समोरचे आव्हान ओळखून तिला तुरुंगात डांबण्यात आले. स्री असूनही शारीरिक लैंगिक त्रास तिला दिला जात असल्याचा दावा तिच्या बहिणीने केला आहे. सरकार विरोधात बोलाल, आवाज उठवाल तर तुरुंगात डांबू हे चित्र गेली काही वर्षे प्रकर्षाने दिसून आले आहे. देशद्रोही, तुकडे-तुकडे गँग, आतंकवादी अशी असंख्य बिरुदे या तरुणांना लावली जात आहेत.

गेल्या काही वर्षांत दहशतवाद, दंगल करणे आणि देशाविरोधात कट रचणे या आरोपांखाली अनेक तरुणांना अटक केली आहे. एक योगायोग असा आहे की यापैकी बहुतेक तरुण प्रतिष्ठित विद्यापीठात शिक्षण घेत आहेत किंवा असे तरुण जे स्वतःच्या हिमतीने कुटुंबाची हलाखीची स्थिती असताना देखील अन्यायाविरोधात आवाज उठवत आहेत. काही दलितांच्या हक्कांसाठी आवाज उठवत आहेत, कोणी मजूर-शेतकरी आणि आदिवासींवर संशोधन करत आहेत, काही महिलांच्या हक्कांसाठी संघर्ष करत आहेत किंवा काही भांडवलदारांच्या हिताच्या धोरणांचे आणि कायद्यांचा विरोध करत आहेत. आणखी एक योगायोग असा आहे की पोलिसांनी पकडलेले बहुतेक तरुण वेळोवेळी सरकारविरूद्ध आवाज उठवणारेच आहेत. त्यामुळे या तरुणांना गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे का?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा एक योगायोग आहे की देशद्रोह किंवा दहशतवादासारखे आरोप ज्या तरुणांवर लावण्यात आले होते, मात्र ते अद्याप सिद्ध झाल्याचे दिसून आले नाही. मग या तरुणांचे भवितव्य का उध्वस्त केले जात आहे? ते केवळ काही शक्तिशाली लोकांसाठी धोकादायक बनू लागले म्हणूनच हे सर्व सुरू आहे काय? आमच्या तरुणांना खलनायकाप्रमाणे वागवले जात आहे, का आणि कशासाठी? भारताच्या युवाशक्तीवर अनेकदा अभिमान बाळगला जातो. आपल्या तरुणांमध्ये राजकीय-सामाजिक चेतना इतकी आहे की त्यांच्यात आवाज उठवण्याची हिंमत आहे, योग्य आणि अयोग्य यांच्यातील फरक समजून घेऊन विरोध करत आहेत. असे असताना सरकारला छोट्या छोट्या गोष्टींवरून देश तुटण्याची भीती का वाटत आहे?

सरकारविरोधात आवाज उठविणार्‍या तरूणांवर ज्या पद्धतीने कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे, त्यावरून देशात जे घडत आहे त्याकडे दुर्लक्ष करा असा संदेश पसरतोय. चुकीला चुकीचे म्हटले जाऊ नये आणि जे योग्य आहे त्याला योग्य म्हणू नये. आपल्या मुलांनी चांगले शिकावे, चांगली पॅकेजची नोकरी मिळावी आणि शांततेने जगावे अशी पालकांची इच्छा असते. त्यामुळे अन्यायाविरोधात आवाज उठविणार्‍यांसोबत जर गंभीर गुन्हे दाखल होत असतील तर कोणतेही पालक आपल्या मुलांना शांत राहण्याचा सल्ला देतील, जेणेकरून त्यांना कोणत्याही गंभीर गुन्ह्यांचा सामना करावा लागू नये. अशाप्रकारे, देशात कोणीही भगतसिंग, चंद्रशेखर आझाद बनणार नाहीत. या तरुणांनी इंग्रजांविरोधात आवाज उठविला होता. त्यामुळे त्यांना इंग्रजांनी फासावर चढवले. स्वतंत्र भारतात हे क्रांतिकारी तरुणांचे आदर्श आहेत. पण आता आम्हाला कदाचित तरुणांचा उत्साह किंवा त्यांचे धैर्य किंवा त्यांचा आवाज नको आहे. जे काही चुकीचे घडत आहे त्यावर बोलणारी युवा पिढी नको आहे. जर कोणी आवाज उठवेल त्याला तुरुंगात डांबले जाईल असा इशाराच दिला जात आहे! अन्यायाविरोधात आवाज उठवणारी युवा पिढी देशद्रोही कशी? याचे उत्तर कोण देणार?

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -