घरफिचर्समायमहानगर ब्लॉगआयपीओ गुंतवणूकीतील जोखीम!

आयपीओ गुंतवणूकीतील जोखीम!

Subscribe

जशी शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते, तशी आयपीओतील गुंतवणूकीतही जोखीम आहे. शेअर बाजारात ‘लिस्ट’ झालेल्या कंपनीबाबत जितकी माहिती उपलब्ध असते तितकी माहिती ‘आयपीओ’ विक्रीस काढलेल्या कंपनीबाबत नसते, हा एक गुंतवणूकदारांच्या दृष्टीने मायनस पॉईंट ठरू शकतो. आयपीओत गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीचे प्रवर्तक, कंपनीचे स्थान याची माहिती गुंतवणूकदाराने करून घ्यावयास हवी.

नजीकच्या भविष्यात गुंतवणूकदारांना ‘इनिशियल पब्लिक ऑफरिंग्ज’(आयपीओ) च्या संधी फार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत. बर्‍याच कंपन्या आपले आयपीओ नजीकच्या भविष्यात ‘लाँच’ करणार आहेत. गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल का ? आपण इतिहासाकडे बघितलं तर 1992 साली फार मोठ्या प्रमाणावर ‘आयपीओ’ लाँच झाले होते. दिवसाला सरासरी पाच ते सहा कंपन्यांचे ‘आयपीओ’ भांडवली बाजारपेठेत प्रवेश करीत होते. त्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेवर ‘आयपीओ’ चे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यानंतर हर्षद मेहता शेअर घोटाळा उघडकीस आला व ‘आयपीओ’ बाजारपेठ पूर्णतः उद्ध्वस्त झाली. बर्‍याच लोकांचे बरेच पैसे बुडाले. ‘आयपीओ’ विक्रीस काढलेल्या कित्येक कंपन्या, कित्येक प्रकल्प अस्तित्वातच आले नाहीत. त्या काळात ज्यांनी ‘आयपीओ’ त गुंतवणूक केली त्या कंपन्यांचे शेअर बाजारात ट्रेडिंगच होत नाही.

गुंतवणूकदारांकडे त्यावेळच्या गुंतवणुकीची जर शेअर सर्टिफिकेट असतील तर ती आता फक्त रद्दीतच विकावी लागतील व कित्येकांनी फाडूनही टाकली असतील. हर्षद मेहता शेअर घोटाळ्यानंतर पुढील सुमारे दोन वर्षे आयपीओचे अस्तित्वच नव्हते. आता पुन्हा भांडवली बाजारपेठेत आयपीओे मुसंडी मारत आहे. तेव्हा इतिहासाची पुनरावृत्ती (History Repeats Itself) तर होणार नाही ना? याबाबत गुंतवणूकदार साशंक आहेत. नसारा टेक्नॉलॉजीस या कंपनीचा आयपीओ प्रति शेअर 1101 रुपये या मूल्याने बाजारात विक्रीस आला होता. याचे शेअर बाजारात मूल्य 1680 रुपयांच्या दरम्यान आहे तर कल्याण ज्वेलर्सचा 87 रुपये मूल्याने विक्री झालेला शेअर आज शेअर बाजारात 60 रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहे. ज्यांनी कल्याण ज्वेलर्सच्या आयपीओत गुंतवणूक केली नसेल त्यांना आज तो शेअर कमी मूल्यात मिळू शकतो. जशी शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते, तशी आयपीओतील गुंतवणूकीतही जोखीम आहे. शेअर बाजारात ‘लिस्ट’ झालेल्या कंपनीबाबत जितकी माहिती उपलब्ध असते तितकी माहिती ‘आयपीओ’ विक्रीस काढलेल्या कंपनीबाबत नसते, हा एक गुंतवणूकदारांच्या दृष्टीने मायनस पॉईंट ठरू शकतो. आयपीओत गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीचे प्रवर्तक, कंपनीचे स्थान याची माहिती गुंतवणूकदाराने करून घ्यावयास हवी.

- Advertisement -

साधारणपणे तीन प्रकारच्या कंपन्या आयपीओ लाँच करतात. कंपन्यांना विस्तारासाठी किंवा नवीन उत्पादन निर्मितीसाठी किंवा अस्तित्वात असलेली कर्जे फेडण्यासाठी तसेच कॉर्पोरेट कारणासाठी खेळते भांडवल म्हणून निधीची आवश्यकता भासते. नवी यंत्रणा उभारणे या निधीसाठी बँकांकडे गेल्यास गरजेइतके कर्ज संमत होईलच याची खात्री नसते. थोड्याशा कालावधीनंतर व्याज फेडावे, मूळ रक्कम फेडावी लागते. जर आयपीओतून पैसा जमविला तर त्यात व्याज द्यावे लागत नाही. लाभांश द्यावा लागतो पण लाभांश दिलाच पाहिजे असा कायदा नाही. कंपनी नफ्यात असेल तरच लाभांश द्यावा लागतो. जनतेकडून गोळा केलेला पैसा कंपनीला परत करावा लागत नाही. शेअर लिस्ट झाल्यानंतर तो विकून गुंतवणूकदार नफा कमवू शकतो किंवा तोटा सोसू शकतो. त्यामुळे कंपन्या आयपीओ लाँच करायला प्राधान्य देतात.

आयपीओतून जमा होणारा पैसा कशासाठी वापरला जाणार आहे यालाही महत्व द्यायला हवे. कंपनी जर आयपीओतून जमा करणारा निधी विस्तारासाठी वापरणार असेल तर चांगले पण कंपनीचे अनलिस्टेड शेअर सध्या कोणाच्या तरी ताब्यात आहेत, त्यांना ते आयपीओमार्गे विकावयाचे असतील तर अशा आयपीओत गुंतवणूक करणे जोखमीचे ठरू शकते. जर मोठ्या वित्तीय कंपन्या एखाद्या आयपीओत गुंतवणूक करीत असतील तर अशा आयपीओत गुंतवणूक करावी. कारण यांनी कंपनीच्या आर्थिक स्थितीचा, भविष्याचा फार सूक्ष्मपणे अभ्यास केलेला असतो, एवढा डीप अभ्यास करण्याची क्षमता, यंत्रणा आपल्याकडे नसते त्यामुळे अशा कंपन्या जर एखादा आयपीओ पसंत करीत असतील तर आपल्यासाठी अशात गुतवणूक करणे कमी जोखमीचे ठरू शकते. आयपीओ लिस्ट झाल्यानंतर तात्काळ विकू नका. जर तुम्ही हे शेअर होल्ड केले तर कदाचित भविष्यात जास्त परतावाही मिळू शकतो.

- Advertisement -

शेअर बाजारात किंवा आयपीओत गुंतवणूक करताना ती दीर्घ मुदतीसाठीच करावी तरच त्यातून चांगला फायदा होऊ शकतो. शेअर बाजारात तेजीत असणार्‍या काही कंपन्या, या कंपन्याचे आयपीओ गेल्या तीन ते चार वर्षांत लाँच झाले होते व आजचे या कंपन्याच्या शेअरचे बाजारी मूल्य प्रचंड वाढलेले आहे, या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केलेले आहे. असा प्रचंड परतावा फक्त शेअर बाजारातील व्यवहारांतच मिळू शकतो. दरम्यान, येत्या वर्षभरात गुंतवणूकदारांना भांडवली गुंतवणुकीची मोठी संधी उपलब्ध होेणार आहे. म्हणून अधिक एमएसएमई उद्योग येत्या वर्षभरात आयपीओ लाँच करणार आहेत. गेल्या आर्थिक वर्षी 16 एमएसई कंपन्यांनी मुंबई शेअर बाजारात आयपीओ लाँच केले होते. यातून या कंपन्यांनी भांडवल उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर आयपीओ विक्रीस काढावेत व या उद्योगांनी भांडवल बाजारात सक्रिय व्हावे. यासाठी छोेट्या उद्योगांना प्रोत्साहन मुंबई शेअर बाजारातर्फे दिले जात आहे.

हर्षद मेहताच्या काळात गुंतवणूकदार जसे भरडले गेले तेवढे आता जाऊ शकत नाहीत. कारण हर्षद मेहता प्रकरणातून धडा घेऊन सेबी या भांडवली बाजाराच्या नियंत्रक यंत्रणेने बरेच निर्णय घेतले. त्यामुळे गुंतवणूकदार आता पूर्वी इतके भरडले जाऊ शकत नाहीत. आयपीओ विक्रीस काढण्यापासून त्याचे लिस्टिंग करण्याचा कालावधी बराच कमी केला. तसेच अगोदर शेअरसाठी अर्ज करताना भरलेली रक्कम कंपनीकडे जात असे व शेअर वाटप झाले नाही तर ते पैसे परत मिळविणे ही गुंतवणूकदारांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आता सेबीने एएसबीए (अस्वा) नियम केला आहे. या नियमाने गुंतवणूकदाराने अर्जासोबत भरलेली रक्कम बँकेकडेच राहते. जर शेअर वाटप झाले असेल तितकी रक्कम बँक आयपीओ विक्रीस काढलेल्या कंपनीस देते ज्याची ‘अस्वा’ मध्ये आहे त्याला त्या रकमेवर बँकेतर्फे व्याजही मिळते. एखाद्याला आयपीओ काढायचा असेल तर त्यासाठी सेबीची परवानगी लागते व सेबी योग्य छाननी करूनच परवानगी देते. त्यामुळे आयपीओतून पैसे गोळा करून पळणार्‍या कंपन्यांना चांगलाच चाप बसला आहे. तरुणांनी त्यांच्या वयाचा विचार करता शेअर बाजारातील गुंतवणुकीची जोखीम घ्यावी. ज्येष्ठ नागरिकांनी मात्र डोळस वृत्तीने गुंतवणूक करावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -