घरफिचर्समायमहानगर ब्लॉगकट्टर हिंदुत्ववाद्यांचा घोर गैरसमज!

कट्टर हिंदुत्ववाद्यांचा घोर गैरसमज!

Subscribe

भारतात हिंदुत्ववादी विचारसरणीचे सरकार केंद्रात दुसर्‍यांदा सत्तारूढ झाल्यानंतर हिंदूंच्या कट्टरतेला धार चढू लागली आहे. त्यातून पुन्हा या सरकारच्या कार्यकालात अयोध्येतील राम जन्मभूमीचा निकाल हिंदूंच्या बाजूने लागून तिथे राम मंदिर उभारणीचे काम सुरू झाले आहे. यामुुळे हिंदूंचा आत्मविश्वास अधिक वाढू लागला आहे. आता ज्ञानवापी मशिदीचे जुने प्रकरण नव्याने पुढे आले आहे, पण या देशातील मुस्लिमांचा निकाल लावून येथील सगळे हिंदू गुण्यागोविंदाने नांदतील असे वाटत असेल, तर तो घोर गैरसमज आहे हे एकेकाळी हिंदुत्ववादी म्हणून गळ्यात गळे घातलेल्या शिवसेना आणि भाजप यांची जी सध्या एकमेकांची गळेकापू स्पर्धा सुरू आहे त्यातून स्पष्ट झाले आहे.

भारतात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार दुसर्‍यांदा केंद्रात बहुमताने सत्तेत आल्यानंतर देशातील कट्टर हिंदुत्ववाद्यांना नवा जोश आलेला आहे. विशेषत: कट्टर हिंदुत्ववादी नेते आणि संघटना अधिक जोरकसपणे आपली मते मांडताना दिसत आहेत. काही महंत अधिक आक्रमक झालेले दिसत आहेत. या सगळ्यांचे प्रामुख्याने लक्ष्य आहेत ते म्हणजे मुस्लीम नेते. त्यांच्या संघटना आणि त्यांची धार्मिक स्थळे. उत्तर प्रदेशातसुद्धा योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार दोन वेळा सत्तेवर आले. त्यामुळे तिथेही कट्टर हिंदुत्ववादी अधिक जोरदारपणे आपल्या भूमिका घेऊन पुढे येत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये ज्ञानवापी मशिदीचा विषय देशभर सगळीकडे गाजत आहे. सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे ते झालेले आहे. त्याचा अहवाल न्यायालयाकडे देण्यात आलेला आहे. हे सर्वेक्षण सुरू असताना झालेल्या व्हिडीओ शूटिंगचा एक व्हिडीओ बाहेर आला. त्यात त्या मशिदीच्या वजूखान्यात असलेल्या कुंडात शिवलिंगाच्या आकाराचे दगडी शिल्प आहे.

हिंदू पक्षकारांचे म्हणणे आहे की ते शिवलिंग आहे, तर मुस्लीम पक्षकार म्हणत आहेत, ते कारंजे आहे. याविषयीचा अहवाल सध्या न्यायालयाकडे आहे. पुढे तो कशाप्रकारे उघड केला जाणार आणि त्याचे पडसाद कसे उमटणार हे येणारा काळच सांगेल. बरेचदा असे होेते की एखाद्या गोष्टीमुळे सामाजिक शांतता बिघडणार असेल तर ती युक्तीबाजपणे थंड बस्त्यात ठेवली जाते. हळूहळू लोकांना त्याचा विसर पडत जातो, पण अलीकडच्या काळात हिंदुत्ववाद्यांच्या दाव्यांना प्रतिसाद देणारी सरकारे आल्यामुळे काही जुने मुद्दे पुन्हा मांडून त्याचा निर्णय लागण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ज्ञानवापी मशिदीचा वाद हा काही नवीन नाही. देशभरात धर्मस्थळांवरून काही ठिकाणी असेच वाद वर्षानुवर्षे सुरू आहेत. अलीकडेच ज्याचा निर्णय लागला, असा वर्षानुवर्षे चाललेला वाद म्हणजे अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा. हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीरामाचे प्राचीन मंदिर उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी बाबराने मशीद बांधली. त्यामुळे तिथे पुन्हा श्रीरामाचे मंदिर उभारण्यात यावे, अशी हिंदू संघटनांची मागणी होती. हे प्रकरण अनेक वर्षे न्यायालयात होते. मुस्लीम पक्षकारांचे असे म्हणणे होते की तिथे मंदिर नव्हते. शेवटी न्यायालयाने पुरातत्त्व खात्याच्या सर्वेक्षणाच्या आधारावर निर्णय दिला, तो हिंदूंच्या बाजूने लागला.

- Advertisement -

रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद या प्रकरणात हिंदुत्ववादी पक्षांना यश मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यामुळे आता ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणाची सुनावणी नव्याने सुरू झाली आहे. अयोध्या तो झाकी हैं, काशी, मथुरा बाकी हैं, अशा घोषणाही हिंदुत्ववाद्यांकडून दिल्या जातात. त्यामुळे ही वाटचाल पुढेही चालू राहील असेच दिसते. ज्ञानवापी मशिदीसंबंधी जे सर्वेक्षण सुरू आहे, त्याबाबत अनेक मुस्लीम नेत्यांचे म्हणणे आहे की, आता सरकार हिंदुत्ववादी भाजपचे आहे, सत्ता त्यांची आहे. त्यामुळे ते म्हणतील तो निर्णय असणार आहे. त्यांच्या या वक्तव्यातून बरेच काही स्पष्ट होते. म्हणजे पूर्वी जेव्हा मुस्लिमांची सत्ता होती, त्यावेळी त्यांनी जे निर्णय घेतले ते लोकांना मान्य करावे लागले.

अनेक मुस्लीम आक्रमक भारतात लूट करण्यासाठी आले. काहींनी आपली सत्ता इथे स्थापन केली आणि भारतीयांवर अनेक वर्षे राज्य केले. त्यांनी इथे लोकांच्या गरजेची जशी विकासकामे केली, तशीच त्यांनी इथल्या हिंदू समाजाच्या प्रेरणा अधिक तीव्र होणार नाहीत याचीही काळजी घेतली. त्यासाठी त्यांनी बरेचदा हिंदूंच्या धर्मस्थळांची नासधूस करून त्यावर मशिदी बांधल्या. भारतातील अनेक लोक विविध कारणांमुळे मुस्लीम धर्मात धर्मांतरित झाले. ते मूळचे हिंदू होते. अलीकडेच समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद असे म्हणताना दिसत आहेत की, पाचशे-सहाशे वर्षांपूर्वी आम्हीही हिंदू होतो.

- Advertisement -

हीच स्थिती या देशातील बहुतांश मुस्लिमांची आहे. मुस्लीम आणि ख्रिश्चन लोक हे प्रामुख्याने इथले आहेत, ते धर्मांतरित झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या पूर्वजांचा शोध घेतला तर ते हिंदू असल्याचे दिसतील. मुस्लीम आक्रमकांसोबत जे मुस्लीम आले होते, त्यांची संख्या मर्यादित होती. त्यामुळे जसे ब्रिटिशांनी भारतात आपली राजवट चालवण्यासाठी सैन्य उभारले होते, त्यात त्यांनी स्थानिक भारतीयांची भरती केलेली होती. राजवट ब्रिटिशांची असली तरी त्यांच्या हाताखाली काम करणारे बहुसंख्य सैनिक, सुरक्षा कर्मचारी हे भारतीय असत. तसेच मुस्लीम आक्रमक जेव्हा पुढील काळात भारतात स्थिरावले तेव्हा त्यांच्या सैन्यात इथल्या स्थानिक लोकांची भरती केली असावी. त्यासाठी त्यांना बाटवलेही असेल. पुढे जेव्हा मुस्लीम शासकांची सत्ता व्यवस्थित स्थिरस्थावर झाली तेव्हा त्यांनी त्यांची धर्मिकस्थळे उभारली असावीत. त्यांनी हिंदूंना मानसिकदृष्ट्या खच्ची करण्यासाठी हिंदूंच्या काही धर्मस्थळांवर त्यांची धर्मस्थळे उभारल्याची शक्यता आहे.

विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारच्या कालावधीत राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादात हिंदू पक्षकारांचा विजय झाला आणि अयोध्येत रामजन्मस्थळावर राम मंदिराची उभारणी सुरू झाली. त्यामुळे आता हिंदू धर्मियांच्या प्रभावाचा काळ सुरू झाला आहे, अशी उमेद विशेषत: कट्टर हिंदुत्ववाद्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे देशातील अनेक मशिदींच्या खाली मंदिरे आहेत, या त्यांच्या विश्वासाला अधिक बळ मिळू लागले. काही ठिकाणी तसे पुरावे मिळू लागले, पण मुद्दा असा आहे की असा सपाटा लागला तर असे दिसेल की बहुतांश ठिकाणी मुस्लीम शासकांनी इथली हिंदूंची आणि इतर धर्मियांची धर्मस्थळे उद्ध्वस्त केलेली आहेत. ती सगळी ठिकाणे पुन्हा हिंदूंना द्यावयाची असे ठरल्यास त्याची यादी खूप मोठी होईल.

दिवंगत पत्रकार आणि मुझफ्फर हुसेन असे म्हणत असत की, तुम्ही जगातल्या कुठल्याही भागात उत्खनन केलेत तर तुम्हाला हिंदू संस्कृतीचे अवशेष सापडतील. त्यामुळे हिंदू धर्मियांचा म्हणजे मूर्ती पूजकांचा विस्तार हा जगभर होता असेच दिसून येते. अमेरिकेतील मय संस्कृतीमध्येही काही हिंदू संस्कृतीचे अवशेष आढळतात. मलेशिया, इंडोनेशिया येथील अनेक मशिदींच्या खाली गणपतीच्या मूर्ती सापडतात. जगभरात जर अशी परिस्थिती असेल तर भारत हा तर हिंदूंचाच देश आहे. त्यामुळे येथील अनेक मशिदांच्या खाली मंदिरांचे अवशेष आढळले तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, पण मुद्दा असा आहे की काही महत्वाच्या मंदिरांचे अपवाद सोडले तर अशा प्रकारे मशिदींखाली मंदिरे असण्याचा दावा किती योग्य ठरेल, असा प्रश्न आहे.

कारण या देेशात जे मुस्लीम राहतात, त्यांच्याही धार्मिक आस्था आहेत. मशिदींमध्ये गेली अनेक शतके ते नमाज पढत आले आहेत. त्यातील बहुतांश हे पूर्वीचे येथील हिंदूच आहेत. त्यामुळे त्यांच्या धार्मिक आस्था जोपासण्यासाठी त्यांनाही धर्मस्थळांची गरज आहे हे लक्षात घ्यावे लागेल. आता तेही या देशाचे नागरिक आहेत. भारतीय समाजाचे अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे जसे त्यांचे हक्क आहेत, तशा त्यांच्यावर जबाबदार्‍याही आहेत. जेव्हा राम जन्मभूमी आंदोलन सुरू होते, तेव्हा बाबरी मशीद पाडण्यापूर्वी जवळच भाजप नेत्यांची सभा झाली. त्यावेळी केलेल्या भाषणामध्ये भाजपचे नेते मुरली मनोहर जोशी म्हणाले होते, बाबरी मशिदीची बाजू लावून धरणारे शहाबुद्दीन यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, बाबर हा तुमचा आणि माझा पूर्वज नव्हता. आपल्या दोघांचे पूर्वज वेगळे होेते आणि ते एक होते. हिंदू आणि मुस्लिमांनी खरेतर हे अनेक वर्षांपूर्वीचे एकतेचे सूत्र लक्षात ठेवण्याची गरज आहे. कारण या एकतेच्या सूत्रानेच त्यांना पुढील प्रवास करायचा आहे.

बरेचदा कट्टरवादी हिंदूंना असे वाटत असते की, मुस्लीम लोक हे या देशातील अशांततेचे मूळ आहेत. त्यांचा एकदाचा निकाल लागला की देशात अखंड शांतता नांदेल. त्यांच्या या दाव्यात सर्वसामान्य हिंदूही ओढला जातो, पण या दाव्यामध्ये फारसे काही तथ्य आहे असे वाटत नाही. कारण स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणारे सत्तेसाठी एकमेकांच्या विरोधात जाताना किती टोकाची भूमिका गाठू शकतात हे सध्या महाराष्ट्रात दिसत आहे. शिवसेना आणि भाजप हे दोन हिंदुत्ववादी पक्ष हिंदुत्वाच्या संरक्षणाच्या शपथा घेऊन एकत्र आले होते. आमची युती ही सत्तेच्या स्वार्थासाठी नाही, तर ती हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आहे, असा छातीठोक दावा ही मंडळी करत असत. शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष, पण राज ठाकरे बाहेर पडल्यामुळे त्याची ताकद कमी झाली. सध्या महाराष्ट्रात भाजप, शिवसेना आणि मनसे हे तीन पक्ष आपणच खरे हिंदुत्ववादी असल्याचा दावा करत आहेत.

शिवसेना आणि भाजप यांनी एकेकाळी एकमेकांच्या गळ्यात गळे घातलेले होते, पण आता त्यांच्यामध्ये सत्तेसाठी एकमेकांचे गळे कापण्याची अटीतटी सुरू आहे. ते पाहिल्यावर या देशातील सगळ्या मुस्लिमांचा निकाल लागला, तर मागे उरणारे हिंदुत्ववादी किती गुण्यागोविंदाने नांदतील याचे हे ढळढळीत उदाहरण आहे. त्यात पुन्हा एक लक्षात घ्यायला हवे की, मुस्लीम आक्रमक भारतात येण्यापूर्वी भारतामध्ये शैव आणि वैष्णव या हिंदू म्हणवल्या जाणार्‍या पंथांमध्ये कट्टर विरोध होता. एक शंकराचे भक्त आणि दुसरे विष्णूचे. अगदी दोन धर्मियांइतका भेद होता. जसे मुस्लीम व्यक्ती मृत झाली की ती पैगंबरवासी होते. ख्रिस्ती धर्मीय मृत झाला की तो ख्रिस्तवासी होतो. तसेच शैव मृत झाला की तो कैलासवासी होतो आणि वैष्णव मृत झाला की तो वैकुंठवासी जातो. म्हणजे शैव आणि वैष्णव हिंदू आहेत. तर मग मृत झाल्यावर ते एकाच ठिकाणी जायला हवे होते, पण तसे होत नाही. मुस्लिमांच्या आक्रमणानंतर आपल्या संरक्षणासाठी हे दोन्ही पंथ एकत्र आले. त्यामुळे जे कट्टर हिंदुत्ववादी आहेत, त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -