घरफिचर्समायमहानगर ब्लॉगसरकारची अडीच वर्षे आणि सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्रिपदाचा नवस!

सरकारची अडीच वर्षे आणि सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्रिपदाचा नवस!

Subscribe

राज्यात तीन पक्षांचे सरकार असल्याने कुरबुरी या सुरूच असतात, मात्र अशा स्थितीत सरकारची अडीच वर्षे संपल्यानंतर त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होण्याचा नवस बोलल्यामुळे विरोधकांना आयतं कोलीत मिळालं आहे. तसेच ठाकरे सरकारमध्ये सारं काही आलबेल नाही याचीच पुष्टी सुळे यांच्या विधानाने झाली आहे. आता पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा तर नाही ना. राज्याला पहिल्या महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळेंच्या रूपाने मिळणार का, अशा चर्चा दोन दिवसांपासून सुरू झाल्या. त्यामुळे साहजिकच शिवसेनेची अस्वस्थता वाढू लागली आहे. कारण सुप्रिया सुळेंच्या तोंडून शरद पवार बोलत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यात ठाकरे सरकार अर्थात महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे रविवारी २९ मे रोजी पूर्ण झाली आहेत. समान किमान कार्यक्रमाच्या आधारे महाविकास आघाडी सरकार नोव्हेंबर २०१९ रोजी स्थापन झाले आणि उद्धव ठाकरेंनी शिवाजीपार्कवर २९ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यापासून उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. शिवसेनेने भाजपसोबत विधानसभा निवडणुकीपूर्वी युती करत दोन्ही पक्षाचे मिळून १६१ आमदार निवडून आले त्यात भाजपचे १०५ तर शिवसेनेचे ५६ आमदार होते. त्यामुळे साहजिकच मुख्यमंत्री भाजपचा होणार हे नक्की होते, मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर झालेल्या चर्चेत अडीच वर्षे मुख्यमंत्री भाजपचा आणि अडीच वर्षे शिवसेनेचा असे आश्वासन दिल्याने शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरील दावा कायम ठेवला.

भाजपकडून अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देऊ असे कोणतेही आश्वासन अमित शहा यांनी दिले नसल्याचा राग भाजपच्या सर्वच मोठ्या नेत्यांकडून आळवण्यात आला. काळजीवाहू मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले. त्यामुळे १६१ आमदार असूनही भाजप आणि शिवसेना सत्तेत येऊ शकले नाहीत. त्यामुळेच भिन्न विचारसरणी असलेले तीन पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र आले. त्यातूनच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांची मिळून महाविकास आघाडी बनली. महाविकास आघाडी सरकार राज्यात मागील अडीच वर्षांपासून सत्तेत असून मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे तर उपमुख्यमंत्रिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार विराजमान झाले आहेत.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या पहिल्या दिवसापासून सरकार कोसळणार, गडगडणार याच्या अफवा, वावड्या पद्धतशीरपणे भाजपच्या गोटातून बाहेर येत होत्या. त्यानंतर तर भाजपच्या अनेक वाचाळवीर नेत्यांनी सरकार पडण्याच्या तारखा, मुहूर्त सांगायला सुरुवात केली, पण सरकार काही केल्या पडेना. मुख्यमंत्रिपदाची खुर्ची कोरोनाकाळातही अजून मजबूत झाली. विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून शिवसेनेचा कोरोना काळातील भ्रष्टाचार, मंत्री असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांची अमाप संपत्तीची प्रकरणे बाहरे काढणे, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निकटवर्तीयांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशीचा ससेमिरा सुरू ठेवणे आणि लोकायुक्त, न्यायालयात, राज्यपाल दरबारी तक्रारी अर्ज करत राहणे हा एककलमी कार्यक्रम भाजपने मागील अडीच वर्षात राबवला, पण महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात शाबूत आहे आणि मुख्यमंत्रिपदी अजूनही उद्धव ठाकरेच बसलेले आहेत.

दररोज आरोप प्रत्यारोप, पत्रकार परिषदा, सोशल मीडियावर सरकारविरोधात राळ उठवूनही महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे याच गदारोळात २९ मे २०२२ रोजी पूर्ण केली. तीन पक्षांचे सरकार असल्याने तिन्ही पक्षांच्या कुरबुरी या सुरूच असतात, मात्र टोकाचा विरोध असतानाही सरकारची अडीच वर्षे संपल्यानंतर त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा विरोधकांना आयतं कोलीत मिळाले आहे. तसेच ठाकरे सरकारमध्ये सारं काही आलबेल नाही याचीच पुष्टी सुळे यांच्या विधानाने झाल्याने आता पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा तर नाही ना. राज्याला पहिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळेंच्या रूपाने मिळणार का, अशा चर्चा दोन दिवसांपासून सुरू झाल्या. त्यामुळे साहजिकच शिवसेनेकडून त्यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

सुप्रिया सुळे रविवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौर्‍यावर होत्या. यावेळी त्यांनी अनेक धार्मिक स्थळांना भेटी देत येथील नागरिकांसोबत चर्चाही केली. सुप्रिया सुळेंनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यावर,‘पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा झाला तर सगळा राष्ट्रवादी पक्ष घेऊन नवस फेलायला येईन,’ असे साकडे घातले. महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार या पत्रकारांच्या प्रश्नावर, मी याबद्दल सांगू शकत नाही. मी काही ज्योतिष सांगणारी नाही. मुख्यमंत्री व्हावं की नाही याबाबत मी कधी विचार केलेला नाही. हे सगळं महाराष्ट्रातील लोक ठरवतील. मी कसं ठरवणार, असे सावधपणे सुप्रिया सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या असलेल्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत. तसेच त्या असेच काहीतरी प्रसार माध्यमांशी बोलणार नाहीत.

कधी आणि कुठे काय बोलावे याचे त्यांना भान निश्चितच आहे. त्यामुळे आपल्या विधानावर काय प्रतिक्रिया येणार याची त्यांना पुरेपूर कल्पना असणार आणि अपेक्षेप्रमाणे शिवसेनेकडून संजय राऊत यांची त्यावर ‘मन की बात’ आलीच. उद्धव ठाकरे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून तेच २५ वर्ष मुख्यमंत्री राहतील. महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोक निर्माण करत असतात. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे सर्वजण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर आनंदी आहेत. त्याच्यामुळे कोणी प्रश्न निर्माण केला असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असे राऊत यांना वाटते, पण प्रश्न हा आहे की महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पूर्ण होण्याच्या दिवशीच सुप्रिया सुळेंचे हे विधान येणे याला योगायोग नक्कीच म्हणता येणार नाही.

मध्यंतरीच्या काळात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मानेवरील शस्त्रक्रियेनंतर काही महिने मुख्यमंत्री प्रत्यक्ष बैठका, कुणाच्याही भेटीगाठी घेत नव्हते. एव्हढंच काय तर साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठकीलाही दूरदृश्य प्रणालीने मुख्यमंत्र्यांची उपस्थिती असायची. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीबाबत अनेक वावड्या उठल्या होत्या, मात्र त्यानंतर त्या आपोआपच शमल्या होत्या. त्याच दरम्यानच्या काळात अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, अशा चर्चा राष्ट्रवादीच्या गोटातून, भाजपच्या ऑफ दी रेकॉर्ड ब्रिफिंगमधून वारंवार कानावर येत होत्या. त्यावेळीही शिवसेनेकडून संजय राऊत हे एकट्याने किल्ला लढवत शिवसेनेचा मुख्यमंत्री पाच वर्ष असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढील २५ वर्ष मुख्यमंत्रीपदी असतील. भाजपने पुन्हा सत्तेत यायचे दिवस विसरून जावे. स्वप्नच बघत बसा, असा टोला राऊत अधूनमधून लगावत असायचे, पण रविवारच्या सुळे यांच्या विधानाने पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्या पुढे काही दिवस सुरू राहण्याची शक्यता जास्त आहे.

सध्या महाविकास आघाडीकडे संख्याबळ बघितले तर शिवसेनेकडे ५५, राष्ट्रवादीकडे ५३ तर काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये केवळ दोन आमदारांचा फरक आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीकडून पुढील मुख्यमंत्री आमचाच असेल असा दावा, नवस करण्यात येत आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाला सर्वाधिक विरोध हा शिवसेनेपेक्षा काँग्रेसचा असेल. कारण सत्तेत असूनही काँग्रेसच्या मंत्री आणि आमदारांची नाराजी शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीवर आहे. शिवसेना कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार होणार नाही. भाजपसोबतची त्यांची चर्चा अडीच वर्षांची होती, मात्र महाविकास आघाडी सरकारच्या बाबतीत शिवसेनेचाच मुख्यमंत्री पाच वर्ष राहील, अशी शाश्वती असल्यानेच उद्धव ठाकरे शांतपणे राज्याचा गाडा हाकत आहेत. विरोधी पक्षाचा योग्य वेळी समाचार घेताना मित्रपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी दुखावणार नाहीत, याची जातीने स्वत: विशेष काळजी घेत आहेत.

सुप्रिया सुळे राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील का, असा प्रश्न सतत चर्चेत असतो. यापूर्वीही अजित पवार यांनी सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्यास आवडेल, असे मत व्यक्त केले होते. यापूर्वीही अनेकदा सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, पक्षाने मला नेहमीच लोकसभेचे तिकीट दिले आहे आणि मी खासदार म्हणूनच काम करेन. मुख्यमंत्रिपद किंवा कोणत्याही पदासाठी स्त्री किंवा पुरुष असे मापदंड लावता येत नाहीत. त्यासाठी केवळ कर्तृत्व आणि संवेदनशीलता हे मापदंड असतात. मी मुख्यमंत्री होण्याची इच्छा अजितदादांनी व्यक्त करणे यातून त्यांचं प्रेम व्यक्त होतं. निवडणुकीच्या वेळी प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा ताबा आता अजित पवार घेत आहेत, असा थेट आरोपही जाहीर सभेत केला होता. त्यामुळेच घराणेशाहीचा आरोप वारंवार पवार कुटुंबीयांवर केला जातो.

शरद पवार यांनी अनेकांना ज्यांची कुवत नसतानाही मंत्रिपदे दिली, पण मुलगी असलेल्या सुप्रिया सुळे यांना मात्र खासदारकी सोडून काहीही देता आले नाही याची सल वडील असलेल्या पवार यांना निश्चितच असणार. पवार यांनी महिलांची सामाजिक स्थिती आणि प्रतिष्ठा सुधारण्यासाठी १९९१ साली संरक्षणमंत्री असताना तिन्ही संरक्षण दलात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय, राज्यात १९९३ साली राज्य महिला आयोगाची स्थापना, त्याच वर्षी मुख्यमंत्री असताना स्वतंत्रणे महिला आणि बालविकास असे स्वतंत्र खाते निर्माण केले आणि त्यांनतर महिलांना राजकारणात आरक्षण मिळावे म्हणून ३३ टक्के आरक्षण मिळावे म्हणून तरतूद केली. आता सध्या महिलांचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण ५० टक्क्यांवर गेले आहे. त्यामुळे शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री होणे हे पवार यांच्या डोक्यात नक्कीच असणार.

तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे आपल्या हयातीतच वारसदार नेमावा. त्यामुळे साहेबांनी सुप्रियाताईंना मुख्यमंत्रिपदी बसवावे, अशी दबक्या आवाजात राष्ट्रवादीच्या कोअर टीमकडून आणि पवारांच्या अनेक शिष्यांकडून अधूनमधून मागणी ऐकायला येत असते. आपल्या मुलीला राजकारणातील सर्वोच्चपदी बसवण्यासाठी महाविकास आघाडीसारखी सुवर्णसंधी पुन्हा येण्याची शक्यता कमी दिसते. राजकारणात जसे दिसते तसे नसते आणि जे डोळ्यांना दिसत नाही तेच घडते, अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री बनण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्या तोंडातून शरद पवार तर बोलत नसतील ना. कारण यापूर्वी पी. ए. संगमा, डी. पी. त्रिपाठी, प्रफुल्ल पटेल, आर. आर. पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिक्रियांमधून शरद पवार यांच्या मनात काय चालले आहे, याचा अंदाज बांधला जात होता.

आता पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनीच रविवारी पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होऊ दे, अख्खा पक्ष घेऊन येईन, असा नवस तुळजाभवानी चरणी केला. महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन आता अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. कॉमन मिनिमम प्रोग्रॅमच्या आधारे महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले, मात्र अडीच वर्षांनंतरही तिन्ही पक्षांमध्ये कायमच धुसफूस पहायला मिळतेे. आपल्या कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीचे आरोप एकमेकांवर तिन्ही पक्ष करत असतात. तरीही तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते सरकार मजबुतीने काम करत असल्याचे कायम दावे करतात. मुख्यमंत्रिपदाबद्दल संभ्रम दूर करायचा असेल तर खुद्द शरद पवार यांनी किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच यावर बोलणे उचित होईल.

कारण येत्या १० जूनला राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत असून भाजपने तीन उमेदवार दिल्याने निवडणूक अटळ झाली आहे. छोटे पक्ष आणि अपक्षांच्या जोरावर जर भाजपचे तिन्ही उमेदवार घोडाबाजार करून निवडून आले, तर मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खुर्ची डळमळीत होऊ शकते. कारण शिवसेनेने दुसरा उमेदवार दिल्याने त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ही केवळ शिवसेनेची नसून महाविकास आघाडीची आहे. त्यामुळे अडीच वर्षांनंतरही मुख्यमंत्रिपद पुढील अडीच वर्षे टिकवायचे असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अलर्ट राहावेच लागेल. नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्यास शिवसेनेलाच रेड कार्पेट घालावे लागेल.

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -