घरफिचर्समायमहानगर ब्लॉगआपली स्पेस आपण शोधावी...!

आपली स्पेस आपण शोधावी…!

Subscribe

डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्येपूर्वी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. ती मुलाखत सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली आहे. त्यात त्या म्हणतात, सर्व सुखे पायाशी लोळण घेत आहेत, पण मला आयुष्याचे उद्दिष्ट purpose सापडत नाही. त्यामुळे माझ्या मनात आत्महत्येचे विचार येतात. ही मुलाखत पाहिल्यावर एक विचार आठवला. एक मुलगा असतो. त्याचे वडील त्याच्यासाठी सर्वकाही करून ठेवतात. त्याच्यापुढे सर्व सुखे हात जोडून उभी असतात. त्या मुलाला आता स्वतःहून काही करण्याची काही गरज नसते. तो मुलगा संवेदनशील असतो. (कारण असंवेदनशील मुले आईबापाची संपत्ती हवी तशी उधळतात). तो मुलगा विचार करत असतो. सर्व काही त्याच्यासमोर तयार असतं. आपण काय करावं हेच त्याला कळत नसतं. कारण स्वतःहून काही करण्यासाठी त्याला space च नसते. आणि इथेच माणसाचा मानसिक कोंडमारा होतो. संवेदनशील माणसं प्राण्यांसारखं केवळ पोट, निद्रा आणि प्रजनन यासाठी जगत नाहीत. आयुष्यात त्यांना काही तरी purpose हेतू, ध्येय हवं असतं. ते मिळालं नाही की ते प्रचंड अस्वस्थ होतात. ती अस्वस्थता वाढत गेली की, जगणं नकोस वाटू लागतं. जगणं शुल्लक वाटू लागतं. मनुष्य जन्म पुन्हा नाही, हे जरी माहीत असलं तरी, मनाला पटत असलं तरी, purposeless जीवन जगण्यात काही अर्थ नाही, असं वाटू लागतं. त्यामुळे तो माणूस जगणं सोडून देतो. मी सांगत होतो, त्या मुलाचे असेच झाले, विचार करून तो एक दिवस आपल्याला वडिलांना स्फोटक मन:स्थितीत विचारतो, बाबा माझ्यासाठी तुम्ही सर्वकाही करून ठेवलं, आता मला करण्यासारखं काही शिल्लक राहिलेलं नाही, त्यामुळे मी मरायला मोकळा झालो. हे ऐकून त्याच्या वडिलांना प्रचंड धक्का बसतो.

अशावेळी मला एक वेगळ्या बापाची गोष्ट आठवते. अलेक्झांडरचा बाप राजा फिलिप हा ग्रीसमधली सगळी राज्ये एकामागून एक जिंकून घेत होता. ते पाहिल्यावर लहानपणापासून विचारशील आणि महत्वाकांशी असलेला अलेक्झांडर आपल्या वडिलांना विचारतो, बाबा ग्रीसमधली सगळी राज्ये तुम्ही जिंकून घेतलीत तर मी मोठा झाल्यावर काय करणार? मला पराक्रम दाखवायला तुम्ही जागा आणि संधीच ठेवलेली नाही. हे ऐकून राजा फिलिप त्याला उत्तर देतो, “मी ग्रीसमधली राज्ये जिंकून घेतली असली तरी, तुला पराक्रम दाखवण्यासाठी अख्खं जग बाकी ठेवलं आहे. अजिबात चिंता करु नकोस.” त्याचवेळी अलेक्झांडर जग जिंकण्याचा निर्धार करतो आणि पुढे तो त्या मोहिमेवर निघतो.

- Advertisement -

खरं तर हेही लक्षात घ्यायला हवं की, शीतल यांचे आजोबा बाबा आमटे यांनी वकिलीचे शिक्षण घेतले होते. ते कायद्याचे पदवीधर होते. त्या काळात वकिलीचा धंदा जोरात चालायचा. भरपूर पैसा कमवून त्यांना चांगलं आरामात जीवन जगता आलं असतं. पण त्या पैशात त्यांचं मन रमत नव्हतं. काही तरी वेगळं करण्याची त्यांना इच्छा होती. त्यांनी त्यांच्यासाठी आवश्यक space शोधून काढली. समाजाने दूर लोटलेल्या कुष्ठरुग्णांसाठी त्यांनी काम करायचं ठरवलं.‌ त्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. मानसिक कोंडी होतेय, मनासारखं होत नाहीये, म्हणून त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला नाही. समाजात अनेक लोक आहेत, ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे. त्यांना मदत करून आपल्याला आपली space शोधता येते. आजोबांच्या संस्कारात वाढलेल्या नातीच्या हे का लक्षात आलं नसेल? हा प्रश्न कायम अनुत्तरित राहणार आहे.

जर‌ आणि तर यांच्या चर्चेला तसा अर्थ नसतो. कारण व्यक्ती आपल्यातून निघून गेलेली असते.

- Advertisement -

वि. स. खांडेकर “ययाती” या त्यांच्या कादंबरीत एका ठिकाणी म्हणतात, जर आणि तर ही शब्दांची सुंदर प्रेते आहेत…!

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -