घरफिचर्ससारांशकोरोनाची तिसरी लाट...सावध ऐका पुढल्या हाका!

कोरोनाची तिसरी लाट…सावध ऐका पुढल्या हाका!

Subscribe

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय असा समज झाला असताना जागतिक आरोग्य संघटना (WHO) चे मुख्य टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी डेल्टाच्या प्रकरणांमध्ये होणारी वाढ पाहता जग आता तिसर्‍या लाटेच्या सुरूवातीच्या टप्प्यात येऊन पोहचले असल्याचा इशारा दिला आहे. नीती आयोगानेही देशात कोरोनाची तिसरी लाट मोठी असेल असा इशारा दिला आहे. परंतु काही तज्ज्ञांनी, जरी ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट आली तरी काही मर्यादित भागापर्यंत ती राहू शकते आणि दुसर्‍या लाटेप्रमाणे विनाशकारी, त्रासदायक आणि प्राणघातक असणार नाही, असे म्हटले आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेद्वारे कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी राज्य सरकारच्या तयारीबाबत माहिती दिली आहे.

तिसर्‍या लाटेला सामोरे जाण्यासाठी आम्ही पुरेशी तयारी करत आहोत असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. ऐनवेळी सोयीसुविधांची कमतरता भासू नये यासाठी महाराष्ट्र आरोग्य विभाग जवळपास १२०० पेक्षा अधिक डॉक्टरांची भरती तसेच ५५० कोटी रुपयांची औषधे आणि कोरोना साहित्याची खरेदी करणार आहे. एकीकडे ऑक्टोबर महिन्यात तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असताना तिसर्‍या लाटेची शक्यता फारच कमी असल्याचा अंदाज आयसीएमआरच्या (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) सेंटर फॉर ऍडव्हान्स रिसर्च इन व्हायरॉलॉजीचे माजी प्रमुख आणि सुप्रसिद्ध विषाणूतज्ञ डॉ. टी. जेकब जॉन यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या काही आठवड्यांमध्ये कोरोना रूग्णसंख्या आणि मृत्यूचा आकडा जरी कमी झालेला दिसत होता, तरी ऑगस्ट महिन्याच्या मध्यानंतर ठराविक काही भागांमध्ये नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मते कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाहीये, पण तिचा प्रभाव कमी झालेला आहे, असे स्पष्ट करण्यात आलेले आहे.

- Advertisement -

जुलैमध्ये प्रसिद्ध झालेल्या आयसीएमआरद्वारे चौथे सेरो-सर्वेक्षण असे सूचित करते की सुमारे 68 टक्के भारतीयांची कोविडविरूद्ध अँटीबॉडीज विकसित झाली आहेत. सर्वेक्षणात मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार आणि झारखंडमध्ये अधिक सेरोपोसिटिव्हिटी आढळली, तर केरळ, हरियाणा, महाराष्ट्र, आसाम आणि ईशान्येकडील बहुतेक राज्यांमध्ये कमी दर होते. अधिक सेरोपोसिटिव्हिटी दर्शवते की लोकसंख्येच्या मोठ्या भागामध्ये कोविड विरूद्ध अँटीबॉडीज आहेत. केरळमध्ये ओणमनंतर वाढलेला पॉसिटीव्हिटी रेट आणि केरळचा सेरोपोसिटिव्हिटी दर इतर राज्यांच्या तुलनेने सर्वात कमी असल्या कारणाने (44 टक्के) सध्या केरळमध्ये सर्वाधिक ऍक्टिव्ह केसेस आहेत (दररोजच्या राष्ट्रीय ऍक्टिव्ह केसेसपैकी सुमारे ५० टक्के पेक्षा जास्त). मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश ही ईशान्येकडील इतर राज्ये अशी आहेत जिथे ऍक्टिव्ह केसेस अधिक आहेत.

यामुळे तिसरी लाट अशा भागात धडकू शकते जिथे डेल्टा स्ट्रेन पसरलेला नाही. नुकत्याच नवीन कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये जी सध्या वाढ दिसत आहे ती त्या राज्यांव्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये झाली आहे जिथे मार्च ते मे महिन्यात दुसर्‍या लाटेच्या शिखरावर अचानक वाढ झाली होती. तिसरी लाट आली आहे की नाही हे अजूनतरी अस्पष्ट आहे, परंतु तज्ज्ञांचे म्हणणे आहे की व्हायरसच्या डेल्टा स्ट्रेनच्या कमी संपर्कात असलेल्या राज्यांमधून ही संख्या येण्याची शक्यता आहे. त्या कारणाने, डेल्टा स्ट्रेन, जो आतापर्यंत सर्वाधिक वेगाने प्रसार करणारा स्ट्रेन समजला गेला आहे, त्या स्ट्रेनमुळे तिसरी लाट येणार ही शक्यता कमीच आहे. कारण डेल्टा स्ट्रेनचा प्रभाव भारतापुरता तरी बराच कमी झाला आहे.

- Advertisement -

राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या डेल्टा पल्स विषाणूचा प्रादूर्भाव झाल्याचे आढळले आहे. यात सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आढळलेत. राज्यात डेल्टा प्लसचे 27 नवीन रुग्ण आढळलेत. त्यामुळे राज्यातील डेल्टा प्लस रुग्णांची संख्या 103 इतकी झाली आहे. डेल्टा प्लसच्या प्रसाराचा वेग हा डेल्टाच्या तुलनेत कमी आहे. मात्र तरीही यावर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. प्रामुख्याने, डेल्टा प्लस व्हेरिएंट डेल्टा प्रकारासारखाच आहे. प्लस व्हेरिएंटमध्ये K417N नावाचे अतिरिक्त उत्परिवर्तन (mutation) आहे.

डेल्टा व्हेरिएंटमुळे भारताला दुसर्‍या लाटेचा सामना करावा लागला आणि बहुसंख्य लोकांना त्याचा संसर्ग झाला. त्यांनी त्याविरुद्ध प्रतिकारशक्ती विकसित केली असावी आणि ही रूपे एकसारखी असल्याने ते डेल्टा प्लस व्हेरिएंटपासून संरक्षित असण्याची शक्यता आहे. त्यामुळे डेल्टा प्लसमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता सध्या तरी कमीच आहे. परंतु, तिसरी लाट काही इतर कारणांमुळे होऊ शकते, जसे की काही कालावधीत प्रतिकारशक्ती कमी होणे. तसेच, जगाच्या कोणत्याही भागात दुसरा नवीन व्हेरिएंट अतिरिक्त उत्परिवर्तन (mutation) मुळे तयार होईल की नाही आणि त्यामुळे तिसरी लाट येऊ शकते हे आपण आता तरी सांगू शकत नाही.

कोरोनाची तिसर्‍या लाटेत लहान मुलांवर सर्वाधिक प्रभावी होण्याची चर्चा आपण ऐकत आहोत. त्यामुळे अंदाजानुसार तिसर्‍या लाटेत ५ लाख बालके संक्रमित होण्याची शक्यता आहे. परंतु इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने असे प्रकाशित केले आहे की असा कोणताही पुरावा नाही की डेल्टा किंवा नवीन डेल्टा प्लस व्हेरिएंटस प्रौढांपेक्षा मुलांना जास्त प्रमाणात प्रभावित करतील. पण आरोग्य तज्ज्ञांच्या मते काळजी करण्याचे कारण आहे, कारण १ ते 18 वर्षांखालील मुलांचं भारतात लसीकरण झालेलं नाही. या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी आपल्याकडच्या लहान मुलांचे लसीकरण कसे करता येईल या विषयी धोरण आखायला सुरवात केली आहे. भारत सरकारनेदेखील १२ ते १८ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणाच्या वेगवेगळ्या बाजू लक्षात घेऊन विचार सुरु केला आहे. आपल्या देशात बनलेल्या Covaxin ने ह्यावर संशोधन करून क्लिनिकल ट्रायल्स पण सुरु केल्या आहेत.

राष्ट्रीय दृष्टिकोनातून, आर- व्हॅल्यू (पुनरुत्पादक- reproductive) नंबर हा कोरोना व्हायरस किंवा कोणत्याही रोगाची पसरण्याची क्षमता ठरवण्याचा एक मार्ग आहे. 4 ऑगस्ट रोजीच्या केंद्रीय आकडेवारीमध्ये 7 मेनंतर पहिल्यांदा भारताची आर संख्या 1 वर दर्शविली गेली, जेव्हा दुसरी लाट शिगेला पोहोचली होती. 1 वरील आर-व्हॅल्यू म्हणजे प्रत्येक संक्रमित व्यक्ती एकापेक्षा जास्त व्यक्तींना संक्रमित करत आहे. उदाहरणार्थ, 100 संक्रमित लोक शंभरहून अधिक लोकांना संक्रमित करू शकतात. त्याकारणाने व्हायरस पसरत नाही हे दर्शवण्यासाठी आर-व्हॅल्यू ही 1 च्या खाली असणे आवश्यक आहे.

आतापर्यंतच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की सर्व प्रकारच्या उपलब्ध लस काही ना काही प्रमाणात अल्फा, बीटा, गॅमा आणि डेल्टा व्हेरिएंटविरुद्ध काम करतात. फरक इतकाच आहे की नवीन व्हेरिएंटला nutralize करण्यासाठी आवश्यक असणार्‍या अँटीबॉडीजची संख्या तुलनेने कमी असू शकते. पण, Covishield आणि Covaxin सध्या प्रचलित असलेल्या व्हेरिएंटविरुद्ध काम करतील, हे भारतीय संशोधकांनी सिद्ध करून दाखवलंय. Covishield वर नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका पेपरमध्ये, अतिरिक्त बूस्टर शॉट्सने ठराविक कालावधीत जास्त प्रमाणात अँटीबॉडीज टिकाऊ असल्याचे दर्शविले आहे. अलीकडेच, अभ्यासकांनी असेही दर्शविले आहे की लसींचे प्राथमिक डोस मध्यम ते गंभीर संसर्गापासून 70 टक्के संरक्षण प्रदान करतात. कोरोनाविरुद्ध संपूर्ण जगात लसीकरणाने वेग घेतला आहे.

कोविड -१९ च्या अनेक प्रकारच्या लसी आहेत. उदाहरणार्थ व्हर्चुअल वेक्टर- आधारित- Covishield, Sputnik-V; एम-आरएनए आधारित- Moderna, Pfizer तसेच भारतीय बनावटीची निष्क्रिय व्हायरस आधारित- Covaxin. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटविरुद्ध लढण्यासाठी आणि मुबलक प्रमाणात लसींचा पुरवठा होण्यासाठी लसींचे मिश्रण करण्याबाबतची नवी चर्चा तसेच विविध मिक्स-अँड-मॅच क्लिनिकल ट्रायल्स सुरू आहेत. सध्या तरी कोरोनामुळे होऊ शकणारे गंभीर परिणाम आणि हॉस्पिटलायझेशन कमी करणे हाच लसींचा उद्देश आहे. गंभीर आजार टाळण्यासाठी लसीकरण हाच एक उपाय आहे आणि प्राथमिक डोसदेखील खूप फायदेशीर ठरेल.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या तिसर्‍या लाटेच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे पण तितकंच खरं आहे, परंतु ही शक्यता विचारात घेऊन ज्या भागात नव्याने रुग्णसंख्या वाढतेय तेथील काही ठराविक लोकांचे (उदाहरणार्थ, ज्यांचा व्हायरल लोड इतरांपेक्षा खूपच कमी आहे) घशाचे नमुने घेऊन ताबडतोब genome sequencing करता पाठवले पाहिजे. त्याकरता भारताने गव्हर्नमेंट आणि प्राव्हेट अशा दोन्ही लॅबस, जिथे genome sequencing ची सुविधा उपलब्ध असेल, तिथून sequencing करून घेऊन नवीन व्हेरिएंट तर नाही ना ह्याची खात्री करून घेतली पाहिजे. एप्रिलमध्ये दिलेल्या नमुन्यांचे genome sequencing चे रिपोर्टस जुलैच्या शेवटी देऊन चालणार नाहीत तर जेव्हढ्या लवकर रिपोर्टस आपण देऊ तेव्हड्या लवकर नवीन व्हेरिएंटवर आपण कंट्रोल करू शकू, हा विचार पण आरोग्य मंत्रालयाने केला पाहिजे.

तसेच देशातील साथरोग आणि विषाणू तज्ज्ञांच्या मते देशातील ८० ते ८५ टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्या तर हर्ड इम्युनिटी किंवा सामूहिक प्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी पुरेसे वातावरण तयार होईल. परंतु तज्ज्ञांनी असेही म्हटले आहे की भारतात कोविड -19 केसेसचे चढउतार हे प्रत्येक राज्यात वेगवेगळे असल्याने, हर्ड इम्युनिटी एकसमान राहणार नाही. हाय पॉसिटीव्हिटी केसेसमुळे जेव्हढा वायरस पसरणार तेव्हढे उत्परिवर्तन (mutation) चे धोके वाढू शकतात. त्यामुळे आपण कोविड नियमावलीचे पालन केले पाहिजे. फेस मास्कचा वापर, सामाजिक अंतर आणि वारंवार साबणाने हात धून स्वच्छता राखणे अत्यंत महत्वाचे आहे. आपण सध्यासाठी सामाजिक मेळावे, विवाह आणि इतर कार्ये टाळली पाहिजेत. तसेच, जास्तीत जास्त लोकांचं लवकरात लवकर लसीकरण करणे आवश्यक आहे, तरच आपण ह्या कोरोनासारख्या महामारीला हरवू शकतो.

–डॉ. राहुल गोसावी 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -