घरफिचर्ससारांशलॉकडाऊनमधला भैरू

लॉकडाऊनमधला भैरू

Subscribe

सकाळ झाली. भैरू उठला. भैरूचा बॉस भैरूला म्हणाला, लॅपटॉप उघड, काल रात्रीच टार्गेट दिलंय, ते आज दुपारी बाराच्या आत कम्प्लिट पायजेल मला.

आधी लॉकडाऊन झालं…आणि मग त्याचा साईड इफेक्ट म्हणून वर्क फ्रॉम होम झाल्यापासून भैरूची प्रत्येक सकाळ अशी उजाडू लागली होती.

- Advertisement -

बॉसची ही अमृतवाणी ऐकल्या ऐकल्या भैरू बिछान्यातून उठला आणि अर्धवट किलकिललेले आपले डोळे चोळण्याचीही तसदी न घेता सोफ्यावर ठेवलेला आपला लॅपटॉप त्याने नाराजीनेच उघडला. कीबोर्डवर टपाटप बोटं आपटत पासवर्ड टाकला आणि आपला इनबॉक्स चेक केला. बॉसचा ठळक काळ्या रंगातला मेल पाहिला तर बॉस काल रात्री साडेतीनला झोपला असल्याचं त्याच्या लक्षात आलं.

त्याने वर मान केली आणि आपल्या घरातल्या घड्याळाशी नजर भिडवली तर घड्याळ साडेनऊ वाजल्याचं खिजवून सांगत होतं.

- Advertisement -

च्यामारी, बॉस साडेतीन वाजता झोपून साडेनऊला उठतो? आणि वर सगळ्यांना उठवतोसुद्धा? भैरू घरातल्यांना ऐकू जाईल इतक्या आवाजात पुटपुटला. पण पुटपुटण्याआधी मोबाइल बंद झाला असल्याची त्याने खात्री करून घेतली. खरंतर बॉसशी बोलल्यानंतर भैरूचा मोबाइल खरोखरच सनदशीरपणे बंद झाला होता. पण तरीही त्याने खात्री करून घेतली. कारण मागच्या वेळी तशी भैरूची फजितीच झाली होती. तेव्हा बॉसने त्याला असंच टार्गेट देऊन झापलं म्हणून नंतर त्याने मोबाइल फणफणत सोफ्यावर फेकला तेव्हा बॉसच्या तिखट कानांनी भैरूने मोबाइल फेकल्याचाही आवाज पलीकडून नीट हेरला आणि उलटटपाली पत्र पाठवतात तसा बॉसने दुसर्‍या सेकंदाला भैरूला उलटटपाली फोन केला.

बॉस म्हणाला, आता तू तुझा मोबाइल फेकलास का?

कधी सर?…भैरूने विचारलं.

आता आपलं बोलणं संपल्यावर?…आय मिन मी आता तुला टार्गेट दिल्यावर?…बॉस म्हणाला.

नाही सर, मोबाइल कशाला फेकेन मी?…भैरूने कशीबशी सारवासारव केली.

ठीक आहे, आता ह्यापुढे मी टार्गेट दिल्यावर मोबाइल जिथे कुठे ठेवतोस तिथे अलगद ठेवत जा, फुटेल तो, दुसरा पटकन मिळणार नाही, कारण एकतर मोबाइलची दुकानं लॉकडाऊनमुळे बंद आहेत आणि हल्ली आपला सगळ्यांचा अर्धा पगार होतोय, नवा घ्यायला परवडणारही नाही…बॉस आपल्या किरकिर्‍या आवाजात म्हणाला.

लॉकडाऊनचा बरावाईट परिणाम म्हणून भैरू घरात होता खरा, पण खिडकीवर बसणारी कबुतरं घरात यायला लागली तरी भैरू लॅपटॉपच्या प्रकाशात न्हाऊन निघालेला असायचा. भैरू आणि लॅपटॉपचं अद्वैत अभंग असायचं. लॉकडाऊनमुळे भैरूच्या डॅड-मॉमनी भैरूसाठी चालवलेली वधूसंशोधन मोहीम थांबवली होती. पण भैरू मात्र टार्गेट पूर्ण झाल्याशिवाय कशालाच तयार नव्हता. त्याच्या लॅपटॉपशी त्याचे छत्तीस गुण कधीच जमले होते. जिवलग मित्रांचे फोन तो कट करत होताच, पण जानेमन मैत्रिणींचे फोनही घेत नव्हता, म्हणजे घेऊ शकत नव्हता. त्यांचे फोनही बंद होईपर्यंत वाजू देत होता. फक्त बॉस आणि टार्गेट ह्यापलीकडे दुसरा परिघ त्याच्यासाठी सध्या उपलब्ध नव्हता.

भैरूला त्याआधी वरवरचं राजकारण जाणून घेण्यात तसा वरवरचा रस असायचा आणि हल्लीचं राजकारण फार नीरस आहे असा खोलातला निष्कर्ष काढून तो मोकळा व्हायचा, पण सध्याच्या लॉकडाऊनमधला राजकीय वारा त्याच्या आसपासही फिरकायचा नाही. संजय राऊतांनी काय धारदार वार केला आणि त्याची प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून देवेंद्र फडणवीसांनी कोणता अतिजलद पलटवार केला ह्याची त्याला काही कल्पना नसायची. मनमोहन सिंगांनी मोदींना काय पत्र लिहिलं आणि ते पत्र वाचल्यानंतर आरोग्यमंत्री हर्षवर्धननी त्यातून काय बोध घेतला ह्याबद्दल त्याच्याकडे काही तपशील नसायचा.

कशाला, भैरू हल्ली आयपीएलचा ट्रॅक रेकॉर्डही ठेवायचा नाही. धोनी त्याचा फेव्हरिट, पण धोनीच्या प्रगतीपुस्तकात हल्ली लाल रेघांचा समुदाय जमू लागला आहे ह्याचीही त्याच्याकडे आता माहिती नसायची. ओटीटीवरच्या कोणत्या मुव्हीवरून कोणती कॉन्ट्राव्हर्सी होऊन गेली हेही त्याला कळायचं नाही.

आता भैरूच्या दिवसाची सुरुवात मागच्या पानावरून पुढच्या पानावर सुरू व्हावी तशी सुरू व्हायची. म्हणजे सकाळ झाली की भैरू उठायचा. भैरूच्या बॉसचा किरकिरा फोन यायचा. फोनवरून त्याला टार्गेट मिळायचं. डोळे चोळण्याआधीच, दात घासण्याआधीच भैरू लॅपटॉप उघडायचा. लॅपटॉप चमकायचा. भैरूचे डोळे चमकायचे. मग दिवसभर भैरू लॅपटॉपसमोर चमकत बसायचा. लॉकडाऊन झालं म्हणून स्थलांतरित मजुरांना स्थलांतर करायची तरी संधी मिळायची, पण स्वत:च्याच घरात स्वत:च्याच लॅपटॉपसमोर ठिय्या मांडून बसलेल्या भैरूला तीही सोय नव्हती.

शेवटी परवा भैरूला शून्यात बघायला वेळ मिळाला तेव्हा त्याला त्याच्या शाळेतला एक तास आठवला. त्या तासाला त्याला शाळेतल्या कोणत्या तरी शिक्षिकेने चूल आणि मूल ह्याबद्दल काही शिकवल्याचं आठवलं.

भैरूची ट्युब लगेच चमकली. भैरू मनातल्या मनात म्हणाला…म्हणजे त्या चूल आणि मूलसारखंच आपलं झालंय – लॉकडाऊन आणि लॅपटॉप.

तो विचार येतो न येतो तोच भैरूच्या बॉसचा फोन आला. झालं, भैरूचं शून्यात बघणं विस्कटलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -