Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फिचर्स सारांश एकदा तरी वारी अनुभवावी

एकदा तरी वारी अनुभवावी

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांच्या विचारातूनच वारकरी संप्रदाय अस्तित्वात आला. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय आणि शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला संप्रदाय आहे. वारकरी म्हणजे नित्यनियमाने वारी करणारा भक्त. ‘वारी’ वरुनच ‘वारकरी’ या शब्दाचा उदय झालेला आहे. वारी या शब्दाचा अर्थ यात्रा, नियमित फेरी, व्रत, येरझारा या अर्थाने देखील घेतला जातो. वारकऱ्यांना माळकरी म्हणून देखील ओळखले जाते. कारण प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीच्या एकशे आठ मण्यांची माळ घातलेली असते. वारकरी संप्रदायात गळ्यात तुळशीची माळ टाकल्याशिवाय कुणालाही वारकरी होता येत नाही. पंढरपूरच्या विठ्ठलाशी एकरुप झालेला हा वारकरी संप्रदाय अशीच ओळख कायम झाली आहे. इतक या वारकऱ्यांच आणि विठ्ठलाच नात घट्ट झालेल आहे.

वारकरी संप्रदायाने जितके महत्व या विठ्ठलाच्या पंढरपूर वारीला दिलेले आहे तितके महत्व अन्य कोणत्याही संप्रदायाने आपल्या दैवताच्या वारीला दिलेले नाही. वारकरी संप्रदायात वर्षातील दोन वाऱ्यांना अनन्यसाधारण असे महत्व देण्यात आले आहे. एक आषाढ शुद्ध एकादशी आणि दुसरी कार्तिकी शुद्ध एकादशी. या दोन्ही एकादशीला वारकरी आपल्या गावाहून पायी पालखी, दिंडी घेऊन निघतात. एकादशीच्या दिवशी पंढरपुरात दाखल होऊन चंद्रभागेत स्नान करतात आणि पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतात. याचबरोबर शुद्ध माघी एकादशी आणि शुद्ध चैत्री एकादशीला देखील वारकरी पंढरपुरात येऊन पांडुरंगाचे दर्शन घेतात. वारकऱ्याने वर्षातून किमान एकतरी वारी करावी असे संप्रदायात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

वारकरी संप्रदाय कधी अस्तित्वात आला हे अजूनही माहीत नसले तरी, देखील वारीची आणि संप्रदायाची परंपरा ही ज्ञानेश्वरांच्या आधीपासून चालू असल्याचे अनेक दाखल्यांवरुन निष्पन्न झाले आहे. ज्ञानोबारायांचे वडील देखील नियमित वारी करत असल्याचे दाखले मिळालेले आहेत. यामुळे वारकरी संप्रदायाला आणि वारीला आठशे वर्षांपेक्षा जास्त काळाची परंपरा असल्याचे सिद्ध होते. संत बहिणाबाई आपल्या एका अभंगात म्हणतात की,

संतकृपा जाली । इमारत फळा आली ।।
ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया ।।
नामा तयाचा किंकर । तेणे रचिले तें आवार ।।
जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत ।।
तुका जालासे कळस । भजन करा सावकाश ।।

- Advertisement -

या अभंगातून एकाअर्थाने वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसाराची माहिती मिळते. यामुळे वारकरी संप्रदाय जातीपाती प्रांत याच्या पलीकडे जाऊन आपल्या संप्रदायाची पताका डौलाने फडकवू लागला. यामुळेच वारकरी संप्रदायाला अमाप लोकप्रियता मिळाली आहे. अशापद्धतीने वारकरी संप्रदाय रुजत गेला आणि वारीला देखील सातासमुद्रापार ओळख मिळाली.

आषाढी आणि कार्तिकी या दोन मुख्य वाऱ्या असल्या तरी देखील, आषाढी वारीला खूप महत्व आहे. आषाढ महिन्यात शुक्लपक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी किंवा देवषयनी एकादशी म्हटले जाते. आषाढी एकादशीला महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील इतर अनेक राज्यातून भाविक येत असतात. त्याचबरोबर विविध ठिकाणच्या संस्थानांच्या, विविध फडांच्या पालख्या देखील पंढरपुरात दाखल होतात. यातील मुख्य पालख्या शेगाव येथून येणारी पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची, देहूहून संत तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून संत निवृत्तीनाथांची, पैठणहून संत एकनाथांची तर उत्तर भारतातून संत कबिराची पालखी येते. या पालख्यांसोबत लाखो वारकरी पंढरपुरात पायी चालत दाखल होतात. पालखीमध्ये संतांच्या पादुका ठेऊन पालख्या आपापल्या ठिकाणाहून प्रस्थान ठेवतात.

एकादशीच्या साधारण अठरा ते विस दिवस आधी पालख्या आपापल्या मार्गाने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात. शेतकरी आपल्या शेतातील पेरणीची कामे आटोपून वारीत सहभागी होतात. याचबरोबर अनेक जाती धर्माचे लोक देखील या पायी वारीत सहभागी होतात. आता तर अनेक परदेशी नागरिक देखील वारीत सहभागी होऊ लागले आहेत. वारीत सहभागी होणारा प्रत्येक वारकरी मग तो वयाने छोटा असो किंवा मोठा एकमेकाला ‘माऊली’ म्हणूनच संबोधतात. प्रत्येक पालखी सोबत एक पालखी प्रमुख किंवा फडप्रमुख असतात. सोबतीला चोपदार आणि विठ्ठलाच्या नामसंकीर्तनात तल्लीन झालेले वारकरी मोठ्या भक्तिभावाने शेकडो मैल पायी चालतात. पांढरे शुभ्र कपडे, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा, गळ्यात तुळशी माळ, टाळ अन, हातात भागवत धर्माची म्हणजेच वारकरी संप्रदायाची भगवी पताका असते.

प्रत्येक ठिकाणाहून मार्गस्थ होणाऱ्या पालख्यांचे अचूक असे नियोजन केलेले असते. अनेक दानशूर लोकांकडून ठिकठिकाणी चहा, पाणी, नाष्टा, जेवणाची आणि मुक्कामाची देखील व्यवस्था केली जाते. यात सर्वधर्मीय लोक ही सेवा देण्यासाठी पुढे आलेले असतात. पायी चालून चालून पायातली पायतान तुटतात ते शिवून देण्याचे काम चांभार लोक अनेक ठिकाणी मोफत करतात. मुक्कामाच्या ठिकाणी मुस्लिम लोकांसह अनेक लोक तेल आणि मलम लावून वारकऱ्यांच्या पायाची मॉलिश करुन देतात. सेवा देणाऱ्याला प्रत्येक वारकऱ्यामध्ये विठ्ठलाचे दर्शन घडते. आणि वारकऱ्यांना सेवा देणाऱ्यांमध्ये विठ्ठलाचे दर्शन घडत जाते. बदलत्या काळानुसार आता ठिकठिकाणी मोबाईल चार्जिंगची देखील व्यवस्था करुन दिली जाते. मुक्कामाच्या ठिकाणी फडातील किर्तनकारांकडून कीर्तन आणि प्रवचनाची सेवा दिली जाते. पुन्हा सकाळी लवकर उठून सर्व आवरून पालख्या पुढे मार्गस्थ होतात.

संत ज्ञानदेव, संत तुकाराम महाराज या मुख्य पालख्यांचे रथ हे खिल्लारी बैलजोडीने ओढले जातात. इतका लांबचा घाट, दरीचा रस्ता पार करण्यासाठी खिल्लार जातीच्याच बैलांची निवड केली जाते. दिसायला देखणे आणि पांढरेशुभ्र बैल उंच आणि धिप्पाड असतात. म्हणूनच या बैलांची निवड रथ ओढण्यासाठी केली जाते. बैलांची निवड करण्यासाठी एक स्वतंत्र टीम काम करते. याचबरोबर पालखी मार्गात बैलांच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठी डॉक्टरांची टीम देखील असते. बैलांच्या पायाला असलेली नाल (पत्री) खराब झाल्यास वेळोवेळी बदलली जाते. बाकी खाद्य आणि देखरेखीची बडदास्त ठेवली जाते.

ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्याला बैलजोडी देण्याचा मान हा आळंदी गावातील फक्त सहा कुटुंबालाच आहे. आळंदी सोडून बाहेरगावच्या ग्रामस्थांना हा मान आजवर दिला गेलेला नाही. कारण ही प्रथा खूप पूर्वीपासून अशीच चालू आहे. पालखी रथ आळंदी हून पंढरपूरला जाताना अठरा दिवसाचा प्रवास असतो. यामध्ये फक्त दोन खिल्लार बैलांची जोडीच संपूर्ण प्रवास पूर्ण करते. आणि परतीच्या वारीला देखील तीच जोडी पालखी रथ पंढरपूर ते आळंदी घेऊन येते. पण परतीच्या वारीला निम्म्या दिवसात पालखी रथ पंढरपूरहून आळंदी येथे येत असतो.

तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये पुणे जिल्ह्यातील कोणतेही कुटुंब पालखी रथाच्या बैलजोडीचा मानासाठी अर्ज करु शकतात. यामध्ये रीतसर अर्ज भरुन संस्था आणि डॉक्टरांची टीम योग्य अशा खिल्लार बैलांची निवड करतात. दरवर्षी दोन वेगवगेळ्या कुटुंबाला हा मान दिला जातो. दोन कुटुंबाला मान दिल्यामुळे याचा फायदा खिल्लार बैलांना असा होतो कि, पहिल्या दिवशी एका कुटुंबाची बैल पालखी रथ ओढतात आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कुटुंबाची बैल रथ ओढतात, त्यामुळे पहिल्या दिवशीच्या बैलजोडीला एक दिवसाचा आराम मिळतो. अशा प्रकारे खिल्लार बैलांच्या साहाय्याने हा पालखी सोहळा सुंदररीत्या पार पाडतो. जेव्हा तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहू ते पंढरपूरला जात असतो तेव्हा अठरा ते एकोनाविस दिवसात जातो. आणि परतीच्या प्रवास निम्म्या दिवसात करतो.

वारीदरम्यान मुक्कामाच्या विविध ठिकाणी गोल आणि उभे रिंगण पार पडतात. मध्यभागी प्रमुख पालखीचा तंबू आणि आजूबाजूला इतर पालख्यांचे तंबू विसावतात. हा रिंगण सोहळा म्हणजे वारीतील एक प्रेक्षणीय धार्मिक सोहळाच असतो. रिंगण जेथे होतात ती ठिकाण कायमची ठरलेली आहेत. अशा ठिकाणी पालखी आल्यावर सर्व वारकरी एकमेकांच्या हातात हात घेऊन एक मोठ रिंगण करतात. त्या रिंगणाच्या आतल्या बाजूने अश्व धावण्यासाठी मार्ग केलेला असतो आणि पलीकडून पुन्हा वारकरी उभे असतात. स्वाराचा अश्व आणि मागून माऊलींचा अश्व या रिंगणातून जोरात धावत जातो. दोन तीन फेऱ्या झाल्यावर दोन्ही अश्व एकमेकाला भेटतात आणि वारकऱ्यांच्या एकच जयघोष होतो. अश्वांच्या टाचांखालची माती कपाळाला लावण्यासाठी वारकऱ्यांची एकच झुंबड उडते. रिंगण झाल्यावर मग वारकरी हुतुतू, फुगडी खेळतात. यानंतर एका लाईनीत उभं राहून एकाच ताला सुरात विठ्ठलाचे नामस्मरण करत उड्या मारतात. सोबतीला टाळ आणि मृदुंगाचा गजर आसमंत दणाणून सोडतो.

भान हरपून खेळ खेळतो,
दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा…
भक्तिने भारलेला रिंगण सोहळा,
पाहावा याचि देही याचि डोळा…

ज्ञानेश्वरमाउलींच्या पालखी सोहळ्यात तरडगावजवळील चांदोबाचा लिंब, वाखरीजवळील बाजीरावाची विहीर आणि वाखरी अशा तीन तर, माळशिरस, खुडुस फाटा, ठाकूरबुवा समाधी, भंडीशेगावच्या पुढे अशा चार ठिकाणी गोल रिंगण होते. तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात बेलवंडी, इंदापूर, अकलूज, माळीनगर, बाजीरावाची विहीर आणि वाखरी या ठिकाणी गोल आणि उभ्या रिंगणाची परंपरा आहे. वारीची ही दृष्य टिपण्यासाठी अवकाशातून हेलिकॉप्टर ने किंवा ड्रोनचा वापर अनेक जणांकडून केला जातो. तर पालख्यांवर अवकाशातून पुष्पवृष्टी देखील केली जाते. पंढरपूर पासून थोड्याच अंतरावर असलेल्या वेळापूर येथील टेकडीवरून तुकाराम महाराजांना विठ्ठलाच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन झाले म्हणून तेथून तुकाराम महाराज पंढरपूर पर्यंत धावत गेले. म्हणूनच वेळापूर पासून पंढरपूर पर्यंत वारकरी धावत जातात याला ‘धावा’ असे म्हटले जाते. मजल दरमजल करत पालख्या चंद्रभागेच्या तीरावर विसावतात. सर्व वारकरी चंद्रभागेत स्नान करुन विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी दर्शन रांगेत उभे राहतात. पांडुरंगाच्या गाभाऱ्यासमोर येताच माथा टेकवत साक्षात पांडुरंगच उभा आहे असा भास प्रत्येक वारकऱ्याला होतो. मंदिराचा गाभारा हा विविधरंगी फुलांनी सजवण्यात आलेला असतो. दर्शन झाल्यावर पुन्हा चंद्रभागेत स्नान करुन वारकरी आपल्या गावाकडे निघतात. एकादशीच्या दिवशी वैष्णवांचा मिळावाच पंढरपुरात भरलेला असतो.

शासनातर्फे पालखी मार्गावर स्वच्छता ठेवली जाते त्याचसोबत वैद्यकीय सुविधा आणि पिण्याचे पाणी पुरवले जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या पूजेला शासकीय महापूजेचे स्थान देण्यात आलेले आहे. त्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सपत्नीक विठ्ठलाची पहाटे पूजा करतात. यावेळी पांडुरंगाला महाराष्ट्राच्या हितासाठी साकड घातल जात. सोबत वारकऱ्यांमधील एका दाम्पत्याला देखील मुख्यमंत्र्यासोबत पूजेचा मान मिळतो. ज्यांना हा मान मिळतो त्यांना आदराचे स्थान प्राप्त होते.

आता अनेक गावांत, शाळेत आषाढी एकादशीच्या दिवशी पालखी निघते. सोबतच विद्यार्थी विद्यार्थिनी विठ्ठल – रखुमाई बनून येतात आणि वारी साजरी करतात. याचबरोबर आता नाशिक वरुन सायकल वारी देखील सुरु झाली आहे. नाशिक सायकलिस्ट असोसिएशन आपल्या पेहरावात सायकल वरुन प्रवास करत या वारीत सहभागी होत असतात.

असा हा वारीचा नयनरम्य सोहळा डोळ्यात साठवून ठेवावा असाच असतो. म्हणून जीवनात प्रत्येकाने एकदा तरी वारी अनुभवावी असे सांगितले जाते. म्हणूनच महाराष्ट्रातील पंढरपूरची वारी आता अनेकांच्या संशोधनाचा, शिस्तीचा आणि पीएचडीचा विषय बनली आहे. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. म्हणूनच वारीला महाराष्ट्रातील एक प्रमुख सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्व प्राप्त झाले आहे. यामुळे महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा स्पष्टपणे अधोरेखित होते.

‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’…

- Advertisement -