घरफिचर्ससारांश‘डीपफेक’ विश्वात रियल करियर संधी!

‘डीपफेक’ विश्वात रियल करियर संधी!

Subscribe

बनवेगिरीच्या ‘डीपफेक टेक्नॉलॉजी’ विश्वामध्ये रियल करियरच्या संधींबद्दल विचार करणे फायदेशीर आहे. कारण डीपफेकचा सामना करण्याची व्याप्ती जगभर वाढत आहे. जागतिक संशोधन फर्म एचएसआरसीनुसार २०२२मध्ये डीपफेक शोधण्याची जागतिक बाजारपेठ ३.८६ अब्ज अमेरिकन डॉलर (३२१.११२ अब्ज रुपये) होती. २०२६ पर्यंत ४२ टक्के वार्षिक दराने चक्रवाढ होत ती १४.८० अब्ज अमेरिकन डॉलर (१२३२.१३६ अब्ज रुपये) इतकी विस्तारित होईल.

-प्रा. किरणकुमार जोहरे

आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, कॉम्प्युटर व्हिजन आणि डीप लर्निंगमध्ये कौशल्य असलेल्या व्यक्तींना डीपफेक टेक्नॉलॉजी अथांग क्षितिज व आर्थिक लाभाची गुरुकिल्ली आहे. संशोधक, डेटा सायंटिस्ट, सॉफ्टवेअर इंजिनियर आणि इथिकल एआय वॉरियर्स आदी कितीतरी तज्ज्ञांची इंडस्ट्रीला डिमांड आहे. याशिवाय ‘डीपफेक टेक्नॉलॉजी’चा गैरवापर व हल्ले उघड करीत परतवून लावण्यासाठी येत्या काळात ‘टेक्नॉलॉजी वॉरियर्स’ची लोकल टू ग्लोबल फौज सर्वच राजकीय पक्षांना आणि व्यावसायिक सुरक्षिततेसाठीही आवश्यक असणार आहे हे या क्षेत्रात करियर करणार्‍यांनी लक्षात घेतले पाहिजे.

- Advertisement -

असे ओळखा डीपफेक व्हिडीओ : काळजीपूर्वक लक्ष दिल्यास डीपफेक व्हिडीओ ओळखणे शक्य आहे. चेहर्‍यावरील अनैसर्गिक वैशिष्ठ्ये किंवा हालचाली अथवा स्थिरता पाहून डीपफेक व्हिडीओ समजू शकतो. पापण्यांची हालचाल, आवाज आणि ओठांची अनैसर्गिक हालचाल किंवा स्थिरता यातील तफावतीमुळे निरीक्षण केल्यास डीपफेक व्हिडीओ ओळखणे शक्य आहे. व्हिडीओतील विसंगत प्रकाश, विचित्र प्रतिबिंब किंवा चेहर्‍याभोवती अस्पष्ट कडा आणि व्हिडीओमधील व्यक्ती आणि त्यांच्या सभोवतालच्या व्यक्तींमधील विसंगती शोधण्यासाठी प्रकाश आणि सावल्यांवर लक्ष दिले तर व्हिडीओ खरा आहे की बनावट हे लक्षात येते. बॅकग्राऊंड कलरमधील तफावतदेखील डीपफेक व्हिडीओ लक्षात आणून देतो.

मॉर्फिंग आणि डीपफेकमधील फरक : मॉर्फिंग आणि डीपफेक तंत्रज्ञान या दोन्हीत व्हिज्युअल सामुग्रीमध्ये फेरफार करणे समाविष्ट आहे. असे असले तरी या दोन्हींच्या दृष्टिकोनात म्हणजे अ‍ॅप्रोचमध्ये फरक आहे. मॉर्फिंगचा अर्थ मुख्यत: एका प्रतिमेचे किंवा चित्राचे दुसर्‍यामध्ये सहजतेने रूपांतर किंवा परिवर्तन करणे होय. क्रिएटिव्हिटी किंवा सर्जनशीलता या उद्देशाने मॉर्फिंग वापरले जाते. दुसरीकडे ‘डीपफेक टेक्नॉलॉजी’चा वापर हा निव्वळ अधिक फसव्या हेतूंसाठी, व्हिडीओ किंवा प्रतिमांमध्ये एका व्यक्तीची समानता बदलण्यासाठी डीप लर्निंग अल्गोरिदमचा वापर करीत केला जातो. वापर करण्याच्या नैतिक हेतूवर हा संपूर्णपणे अवलंबून असतो.

- Advertisement -

मॉर्फिंग आणि डीपफेक तंत्रज्ञान या दोन्हींच्या वापरातील समानता म्हणजे व्हिज्युअल सामुग्रीमध्ये बदल करण्यासाठी डिजिटल तंत्राचा वापर केला जातो हा होय, मात्र डीपफेक टेक्नॉलॉजी ही प्रगत ‘एआय’द्वारे कार्य करते. चेहर्‍यावरील हावभाव आणि आवाजाची नक्कल करण्यासह अधिक वास्तववादी आणि अत्याधुनिक परिवर्तन एआय घडवून आणते. मॉर्फिंग हे साधारणपणे साधेसोपे आणि तुलनेत कमी वास्तववादी आहे. असे असले तरी मॉर्फिंग आणि डीपफेक हे दोन्ही तंत्रज्ञान नैतिक चिंता वाढवतात. कारण दोन्हीतून चुकीची माहिती आणि गोपनीयतेचा भंग करीत गैरसमज व अफवा पसरण्याचा धोका संभवतो.

‘डीपफेक अ‍ॅप’ची धूम : भारतात आणि जागतिक पातळीवर पेड आणि मोफत अशा ‘डीपफेक अ‍ॅप’ची धूम आहे. बहुतेक पेड अ‍ॅप हे ४ हजार रुपये ते १५ हजार रुपये इतक्या किमतीचे असून मर्यादित कालावधीसाठी वापरता येते. याशिवाय अनेकदा ‘डेटा क्लाऊड’चे मर्यादित कालावधीसाठी वेगळे चार्जेस मोजावे लागतात. डीपफेसलॅब, फेसस्वॅप, डीपआर्ट, फेकअ‍ॅप, डीपड्रीम, लिरेबर्ड, अवतारीफाय, डीपवेअर स्कॅनर, आयफेक टेक्स्ट, वॉम्बोड्रीम, एक्सेप्शन नेट, झाओ, रियल्यूजनस फेसफिल्टर, फर्स्टऑर्डर मॉडल, मायहेरीटेज डीप, नॉस्टॅल्जिया, डीपआर्ट इफेक्ट्स, डीपआर्ट प्रो, डीपआर्ट स्टुडिओ अशा असंख्य ‘डीपफेक टेक्नॉलॉजी’वर आधारित मोबाईल अ‍ॅपचा समावेश होतो.

नैतिक चिंता, तरी सकारात्मक पैलू :‘डीपफेक टेक्नॉलॉजी’ नैतिक चिंता वाढवत आहे ही गोष्ट खरी असली तरी या तंत्रज्ञानाचे सकारात्मक पैलू आणि करियर संधी आहेत. खोटेपणातील खोटेपणा उघड करण्यासाठी खर्‍याखु़र्‍या करियर संधी असलेल्या ‘डीपफेक टेक्नॉलॉजी’चा वापर मानवी विकासासाठी शक्य आहे. आय ९ प्रोसेसर, पायथॉन ३.७, फर्स्ट ऑर्डर इमेज अ‍ॅनिमेशन मॉडेल, टेन्सरफ्लो किंवा पायटॉर्च, डीपफेसलॅब आदींचा वापर हा प्राथमिक डीपफेक व्हिडीओ बनविणारा कोड शिकण्यासाठी होऊ शकतो.

टेक वॉरियर्स : ‘डीपफेक तंत्रज्ञाना’चा मुकाबला करण्याचे क्षेत्र म्हणजे संधींचा खजाना आहे. याबरोबरच मायक्रोसॉफ्ट व्हिडीओ ऑथेंटिकेटर, सेंटीनेल, वीव्हेरीफायसारखे फॉरेन्सिक सॉफ्टवेअर, एआय ऑर नॉट, हाईव्ह मॉडरेशन, डीपवेअर स्कॅनर आणि डीपवेअर सीआयडीसारखी एआय आधारित शोध साधने, ब्लॉकचेन तंत्रज्ञान, थर्ड पार्टी सर्व्हिसेस, रिसर्च आणि डीपवेअरसारखी मुक्त स्रोत साधने यांचा समावेश ‘डीपफेक टेक्नॉलॉजी’ विरुद्ध करण्यासाठी ते हाताळणारे टेक वॉरियर्स यांना करियर संधींची मर्यादाच नाही.

मनोरंजन उद्योग : ‘डीपफेक तंत्रज्ञाना’चा वापर मनोरंजन उद्योगात वास्तववादी दृश्ये किंवा पात्रे तयार करण्यासाठी करता येतो. चित्रपटांमधील स्पेशल इफेक्ट्स प्रक्रिया सुव्यवस्थित करीत अधिक रंजक दृश्ये बनवत आर्थिक किफायतशीर व वास्तववादी चित्रपट निर्मिती शक्य आहे.

डिजिटल मार्केटिंग आणि जाहिरात : डीपफेक तंत्रज्ञान अधिक आकर्षक आणि कस्टमाईज सामुग्री बनविणे शक्य आहे. यातून डिजिटल मार्केटिंग आणि जाहिरात वाढ सहज शक्य आहे. ब्रँड निर्मिती करण्यासाठी व ग्राहकांमध्ये विश्वसनीय प्रतिमा निर्माण करण्यासाठी डीपफेक टेक्नॉलॉजी अभिनव पद्धतीने वापरणे शक्य आहे. यासाठी आभासी एंकर पात्रे बनवित वैशिष्ठ्यपूर्ण सेगमेंट टार्गेट ओरीयेंटेड अनुरूप जाहिराती तयार करण्यासाठी मीडिया सेक्टरमध्ये संधी आहेत.

शिक्षण आणि प्रशिक्षण : रिसर्च, औषध, लष्कर, विमानचालन, औद्योगिक, आरोग्यसेवा, आपत्कालीन व्यवस्थापन यांसारख्या विविध क्षेत्रांत वास्तववादी प्रशिक्षण, सिम्युलेशन तयार करण्यासाठी डीपफेकचा वापर हे एक प्रभावी टुल आहे. व्यावसायिकांना नियंत्रित आणि वास्तववादी वातावरणात सराव करण्यास एज्युकेशन अ‍ॅण्ड ट्रेनिंगकरिता डीपफेक टेक्नॉलॉजी उपयुक्त ठरते.

गेमिंग, कॉम्प्युटर ग्राफिक्स आणि अ‍ॅनिमेशन : डीपफेक टेक्नॉलॉजी ही गेमिंग, कॉम्प्युटर ग्राफिक्स आणि अ‍ॅनिमेशनमध्ये उपयोगात आणता येते. आभासी तरीही वास्तववादी वाटणार्‍या दृश्यांची कार्यक्षम निर्मिती यात अमाप संधींचे भांडार दडलेले आहे.

सायबर सुरक्षा, गोपनीयता आणि संरक्षण : मापदंड ठरवत अधिक सुरक्षित यंत्रणा तयार करण्यासाठी, सिम्युलेशन आणि ट्रेनिंगसाठी पोलीस दल, डिफेन्समध्ये तसेच सायबर सिक्युरिटीकरिता डीपफेक टेक्नॉलॉजी सक्षमतेने वापरणे शक्य आहे. ‘डीपफेक टेक्नॉलॉजी’चा वापर एखाद्या व्यक्तीच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी मीडिया क्षेत्रात करता येतो. लोकांच्या आवाजाची आणि चेहर्‍याची ओळख लपवण्यासाठी ते आवश्यक ठरते. इंटरनेटवर स्व-अभिव्यक्तीसाठी अवतार अनुभव तयार करण्यासाठीदेखील व्यक्ती ‘डीपफेक टेक्नॉलॉजी’ वापरू शकते. थोडक्यात बनवेगिरीच्या ‘डीपफेक’ विश्वात ‘रियल करियर’ संधींचा खजाना दडलेला आहे हे फेक नव्हे तर वास्तव आणि सत्य आहे.

-(समाप्त)

-(लेखक विज्ञान व तंत्रज्ञानाचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -