घरफिचर्ससारांशयांची हाक ऐकणार कोण?

यांची हाक ऐकणार कोण?

Subscribe

कोरोनामुळे जिथे सामान्य माणसाच्या पोटाचा प्रश्न उभा राहिलाय, जिथे मूलभूत गरजांची पूर्तता होत नाहीये, तिथे मनोरंजनाकडे आणि ते करणार्‍यांकडे कोण लक्ष देणार ? म्हणूनच की काय संस्कृतीचा गौरव सांगणारे, प्रबोधन करणारे, अस्मिता जपणारे आज स्वतःच अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करताय. फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर वासुदेव, शाहीर, भारुडी, कीर्तनकार, गोंधळी, तमाशा, लावणी कलावंत, सोंगाडे, वाघ्या मुरळी, वाजंत्री, ऑर्केस्ट्रावाले आणि यांच्या सारखेच किती तरी कलावंत आहे ज्यांना गेल्या वर्षभरापासून कुठलंही काम मिळालं नाहीये, कला सादर करून रोजच्या भाकरीची सोय करणार्‍या कलाकारांना प्रेक्षक आणि सादरीकरणाची परवानगी नसल्याने त्रास सहन करावा लागतो आहे.

लोकशाहीत सर्वांनाच सर्वकाही सहजासहजी मिळत नाही, लोकांसाठी असलेल्या राज्यात हक्कांसाठीची लढाई कायमच लढावी लागली आहे, ज्याची सवयसुद्धा भारतीय नागरिकांना झालीये. सरकारपर्यंत आपल्या मागण्या पोहचविण्यासाठी आणि आपला आवाज मंत्रालयात पोहचविण्यासाठी मोठे कष्ट करावे लागतात. कोरोनाकाळात अनेकांवर उपासमारीची वेळ आलीये, त्यांना मदत म्हणून सरकारने देखील विविध पॅकेजस जाहीर केले. पण ही मदत मिळाली कुणाला ? शेतकरी, व्यापारी,कामगार,मजूर समाजातील प्रत्येक घटक या महामारीने त्रस्त झालाय. यातच असंघटित असणार्‍या कलावंतांना काही मदत मिळेल असं वाटत नाही, कोरोना आधीच्या काळापासूनच लोककलावंतांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं. मनोरंजनाची बदललेली साधनं, मोबाईल , इंटरनेट आणि वाढतं शहरीकरण यांच्यामुळे त्यांचा प्रेक्षकवर्ग आधीच कमी झाला होता, पण कोरोनामुळे तर आता हाताला कामच उरलं नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलीये. केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशभरातील वेगवेगळ्या भागात राहणार्‍या असंख्य कलाकारांना कोरोनामुळे उपाशी राहावं लागतंय, अनेकदा त्यांच्याच समस्या शासनापर्यंत पोहचतात ज्यांना संघटनेचा आवाज आहे किंवा ज्यांना नेतृत्व लाभलं आहे.

असंघटित असणार्‍या मजूर आणि कलावंतांचा आवाज म्हणून ऐकला जात नाही. एकीकडे संस्कृती परंपरा यांचा उल्लेख मोठ्या अभिमानाने करणार्‍या आपल्या सर्वानाच परंपरा चालविणार्‍या लोक कलावंताचा विसर पडावा हे दुर्दैव आहे. प्रेक्षक किंवा रसिक म्हणून आपण चुकतोय असं मी म्हणत नाही, कारण एरव्ही ही स्वतःचे पोट भरल्याशिवाय इतरांची भूक आपल्याला दिसत नाही हा मनुष्याचा स्वभाव आहे. जिथे सामान्य माणसाच्या पोटाचा प्रश्न उभा राहिलाय, जिथे मूलभूत गरजांची पूर्तता होत नाहीये, तिथे मनोरंजनाकडे आणि ते करणार्‍यांकडे कोण लक्ष देणार ? म्हणूनच की काय संस्कृतीचा गौरव सांगणारे, प्रबोधन करणारे, अस्मिता जपणारे आज स्वतःच अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करताय. फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर वासुदेव, शाहीर, भारुडी, कीर्तनकार, गोंधळी, तमाशा, लावणी कलावंत, सोंगाडे, वाघ्या मुरळी, वाजंत्री, ऑर्केस्ट्रावाले आणि यांच्या सारखेच किती तरी कलावंत आहे ज्यांना गेल्या वर्षभरापासून कुठलंही काम मिळालं नाहीये, कला सादर करून रोजच्या भाकरीची सोय करणार्‍या कलाकारांना प्रेक्षक आणि सादरीकरणाची परवानगी नसल्याने त्रास सहन करावा लागतो आहे.

- Advertisement -

कोरोनाचे नियम पाळणे आणि प्रशासनाला सहकार्य करणे प्रत्येक नागरिकाचे काम आहे. लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय सध्या उपलब्ध नसल्याने सरकारने हे निर्बंध घातले आहेत, ज्याचा त्रास प्रत्येकाला होतोय, या चक्रातून कोणीही सुटले नाही. पण याचा सर्वाधिक फटका बसला तो रोजंदारीवर काम करणार्‍या नागरिकांना, ज्यांमध्ये लोक कलावंताचा समावेश होतो. रोज कार्यक्रम करून म्हणा किंवा कला सादर करून म्हणा यांची उपजीविका चालायची, घरोघरी जाऊन वासुदेव आला म्हणत दान स्वरूपात मिळणार्‍या धान्यातून त्या वासुदेवासोबतच त्याच्यावर अवलंबून असलेल्या सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. हीच अवस्था इतर सर्वांची होती, गावात शुभप्रसंगी जागरण गोंधळ घालून त्यात आपल्या कला दाखवून गोंधळयांच पोट भरायच, भारूडी, शाहीर यांचीही हीच अवस्था…पण सध्या सगळं बंद झालंय, कलेतून मिळालेल्या कमाईतून लॉक डाऊनच्या सुरुवातीचे महिने कसे तरी निघाले,पण सध्या त्यांची अवस्था हालाखीची झालिये. असं म्हणतात ज्यांच्या अंगी कला असते त्याला कधी उपाशी मरण्याची वेळ येत नाही, पण ती कला पाहणारा प्रेक्षकच नसेल तर तो कलाकार काय करेल ? कलेने भूक भागत नाही अशी अवस्था आज झालिये.

वर्षानुवर्षे ज्या कलेने पोट भरलं , त्या कलेशिवाय कलाकारांकडे पोट भरण्यासाठी दुसरं काहीच साधन नाहीये, ना त्यांच्याकडे दुसरं एखादं कौशल्य आहे जेणेकरून ते आपलं पोट भरू शकतील. ज्यांच्या कलेवर टाळ्यांचा कडकडाट व्हायचा अशाच कलाकारांवर सध्या कुणाच्या तरी घरात जाऊन भांडी घासण्याची, रिक्षा चालविण्याची, भाजी विकण्याची, बांधकाम मजूर म्हणून काम करण्याची वेळ आलीय.. या सगळ्यातून मिळणारं उत्पादन देखील तोडकं असल्यानं दोन वेळेच्या पोटभर जेवणाची भ्रांत आहे. पुण्यातला गोंधळी बलराज काटे असो किंवा वाघ्या मुरळी संघटनेच्या सत्यभामा आवळे असोत, धुळ्याचे शाहीर असो किंवा विदर्भातला वासुदेव ,चेहरे वेगवेगळे असले तरी समस्या मात्र सारख्या आहेत. लोक कलावंतांच्या या समस्यांच कोड कधी सुटेल ? याचीही शाश्वती नाही. शुभप्रसंगाला वाजंत्री वाजविणारे, लग्नात सनई वाजविणारे, संबळ वादक, बँडबाजावाले देखील यातून सुटलेले नाहीत, त्यांच्या समस्यां आणि त्यांचे प्रश्नही तितकेच ज्वलंत आहेत, काम नाही आणि काम मिळालं तरी मोबदला नाही, अशी त्यांची अवस्था आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच एका मराठी वृत्तवाहिनीने तमाशा कलावंत रघुवीर खेडकर आणि मंगलाताई बनसोडे यांची एक मुलाखत प्रसारित केली होती. ती मुलाखत पाहिल्यांनंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली, त्या मुलाखतीत त्यांनी ज्या समस्यां मांडल्या त्या खरंच विचार करायला लावणार्‍या होत्या. लावणी आणि तमाशा ज्या मराठीची ओळख आहेत, मराठी सिनेमा असो किंवा हिंदी सिनेमा, महाराष्ट्राची ओळख म्हणून ज्या लोक कलांकडे पाहिलं जातं. ज्या तमाशाच्या फडात जागा मावणार नाही इतकी प्रेक्षक एकेकाळी यायची, जे तमाशा कलावंत एकेकाळी समृद्धीची प्रतिकं होती, त्या कलाकारांवर आणि कलेवर ही वेळ कशी आली ? आपल्याकडे आधीपासूनच तमाशाला प्रेम मिळालं असलं तरी त्यात काम करणार्‍या कलाकारांना सन्मान मिळालेला नाही. पिंजरा असो किंवा इतर मराठी सिनेमे यातूनही अनेकवेळा तमाशाला नाव ठेवण्याचं आणि त्यात काम करणार्‍या बाईला खलनायक ठरविण्याचे काम झाले आहे. त्यामुळे या कलांप्रती प्रेम असलं तरी सामान्य नागरिकांमध्ये या कलेविषयी तितकासा आदर पाहायला मिळत नव्हता, तरीही या कलेचे प्रेक्षक मात्र कमी झाले नव्हते, पण सध्या परिस्थिती वेगळी आहे. मोबाईल आणि इंटरनेट नंतर लोककलांकडे आणि कलावंतांकडे सरकारचं आणि आपलं दुर्लक्ष झालं आहे, हे सगळ्यांनाच मान्य करावं लागेल.

काळानुसार मनोरंजनाची माध्यमं देखील बदलू लागलीयेत, पूर्वी तमाशासाठी गावात 50 रुपयाचं तिकीट काढणारा प्रेक्षक आता 200 रुपयांचं तिकीट काढून मल्टिप्लेक्समध्ये यायला लागलाय. आधीच्या काळात सर्व सामान्य माणसाला मनोरंजनाची किंवा इतिहास, देव, भक्ती, सामाजिक विषय जाणून घेण्याची तितकीशी साधनं उपलब्ध नव्हती, म्हणून त्या काळात लोककलावंत आणि लोककला यांना मोठा प्रेक्षकवर्ग मिळाला. पण सद्यस्थितीत इंटरनेट आणि हातात आलेल्या मोबाईलचा सर्वच क्षेत्रांना फटका बसलाय, हातातील मोबाईलवरच इतकं मनोरंजन उपलब्ध आहे की दुसर्‍या साधनांची गरजच पडत नाही. पूर्वी विरंगुळा म्हणून मनोरंजन होतं, आता बहुतेक जणांच्या हातात असणार्‍या मोबाईलमुळे 24 तास मनोरंजन सुरु आहे, इतिहासातील कथा आणि सामाजिक विषय जेव्हा लोककलावंत मांडायचे तेव्हा त्यांच्या बोलण्यात एक एथॉरिटी वाटायची आणि लोकही ते नीट ऐकून घ्यायचे. आता गुगलमुळे माहितीचा असा विस्फोट झालाय कि प्रत्येक जण इतिहास संशोधक बनलाय, म्हणून एथॉरिटी उरली नाही.

कोरोनाचे हे संकट कायमस्वरूपी राहणार नाही, आज ना उद्या आपण यावर मात मिळवू , पण लोककला आणि लोक कलावंतांच काय? शासनाकडून लोक कलावंतांना मिळणारी मासिक अनुदान स्वरूपातील मदत वर्ष भरापासून बंद पडली आहे, इतर कलांसाठी मिळणार अनुदान सुद्धा वर्षांपासून बंद झालंय. प्रेक्षक नाही म्हणून उत्पन्न नाही, त्यातच कोरोनाचे संकट म्हणून सध्याची अवस्था इकडे आड तर तिकडे विहीर अशी बनली आहे. शासनाकडून लोककलांना आणि कलावंतांना मिळणारे अनुदान किंवा आर्थिक मदत हे या समस्येवरील दीर्घकालीन उपाय नाहीत. ही केवळ जखमेवरील मलमपट्टी आहे, जी सद्यस्थितीला गरजेची आहे. पण या सोबतच काही महत्त्वाचे उपाय करणं गरजेचं वाटतं, त्यातला पहिला म्हणजे काळानुरूप बदललं पाहिजे, इथे कलेत बदल अपेक्षित नाही तर ती कला सादरीकरणात बदल करणे अपेक्षित आहे. म्हणजे आजही सुरेखा पुणेकर यांच्या लावणीचा कार्यक्रम 200 ते 500 रुपयाचं तिकीट घेऊन, शहरातील प्रेक्षक नाटयगृहात जाऊन बघतो. कारण काय ? त्या काळानुरूप बदलल्या , जिथे संधी मिळेल तिथे त्या पुढे आल्या.

कलावंताचा चेहरा हेच त्याचे भांडवल असते, जोपर्यंत तुम्ही चर्चेत राहाल, तो पर्यंत तुम्हाला प्रेक्षक मिळत राहतील. ज्या दिवशी तुम्ही चर्चेतून बाहेर निघाल, त्यावेळी तुमची जागा दुसर्‍याने घेतलेली असेल. लोककला सादर करणार्‍या व्यक्तींनी देखील या बाबीचा विचार केला पाहिजे, हा उपदेश नाही तर एक रसिक म्हणून सुचविलेला उपाय आहे. विठ्ठल उमप टीव्हीवर आले तर आता नंदेश उमप देखील इंडस्ट्रीत आहेतच ना ? कला महत्वाची आहेच पण सध्याच्या स्थितीत तीच योग्य ठिकाणी योग्य प्रकारे होणारं सादरीकरण गरजेचं आहे. कपिल शर्मा शोचे नुकतेच संपलेले सिझन पाहिले तर त्यात येणार्‍या पाहुण्यांची नावं पुन्हा वाचा, पारंपारिक पंजाबी गाणी गाणारी बहुतांश मंडळी तिथे आली. त्यात असेही अनेक लोक होते, ज्यांची नावं सुद्धा आपल्याला माहिती नव्हती, पण ते त्या शोमध्ये आले कारण काय ? तर तिथून त्यांची ओळख सामान्य लोकांना झाली, तिकडे आले की शो मिळतात.

असा विचार आपल्याकडे होणे ही गरजेचे आहे, शासन दरबारी देखील काही उपाय आपण नक्की करू शकतो. जसं की लोक कलेचे शोज आयोजित करणे, त्यांना अनुदान देणे,त्यांची योग्य ती प्रसिद्धी करणे. राज्याच्या सांस्कृतिक विभागाने लोक कलावंतांना एकत्र घेऊन एक शिष्य मंडळ बनवलं पाहिजे, त्या मंडळाने सर्व आघाडीच्या मराठी चॅनल्स ला भेटी देऊन, लोककलेचे शोज सुरू करण्याची मागणी केली पाहिजे. ढीगभर असणार्‍या रियालिटी शोच्या गर्दीत लोककलांसाठी एखादा शो सुरू केला तर अधिक उत्तम, प्रत्येक राजकीय पक्षाची चित्रपट आघाडी आहे. सेना आहे त्यांच्या माध्यमातून असा काही दबाव टाकला किंवा बोलणी केली तर हे नक्कीच होऊ शकते. जी माध्यमं प्रेक्षकांच्या हातात आहे, त्या माध्यमांद्वारे आपली कला लोकांपर्यंत सहज पोहचविता येऊ शकते. लोक कला टिकविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, महाराष्ट्र दिनाला शाहिरी, लावणी यांचं गुणगान गात, कलावंतांना उपाशी मारणं हे काही योग्य नाही. म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले तर लोककलांचा होणारा हा तमाशा नक्कीच थांबेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -