घरफिचर्सबिन्या आणि सोन्या !

बिन्या आणि सोन्या !

Subscribe

बिन्या आणि सोन्या हे दोघेजण मला मुंबईच्या लोकलमध्ये प्रवास करताना भेटले. त्यांच्याकडे पाहिल्यावर ते मुंबईत नवीन आले आहेत हे मला कळले. पुढे त्यांची ओळख झाली. बिन्या विदर्भातला आणि सोन्या कोल्हापूरचा होता. अगदी वयात आलेली ही दोन तरुण पोरे करियर घडवण्याच्या इच्छेने मुंबईत आली होती. त्यांचे मुंबईत कुणीही नव्हते. खूप कष्ट घेत होती. तुम्ही मुंबईत कसे राहता, काय खाता, असे प्रश्न विचारले की, ते त्याकडे दुर्लक्ष करत असत.

महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वच राज्यांमधील लोकांना मुंबईचे आकर्षण असते. आपले गाव आणि घरदार मागे सोडून अनेक लोक मुंबईची वाट धरतात. मुंबईला गेल्यानंतर आपल्याला कामधंदा मिळेल. नशीब काढता येईल, अशी आशा त्यांना वाटत असते. अनेक नवतरुण आपले गाव सोडून नोकरी करून शिकण्यासाठी आणि आयुष्यात काही तरी भव्यदिव्य करण्याच्या आशेने मुंबईत येतात. मुंबईच्या गर्दीत स्वत:ला झोकून देतात. त्या गर्दीत मिसळून आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपडत राहतात. या अशा धडपडणार्‍या लोकांमुळेच मुंबईची धडधड सुरू आहे, हे मान्य करावेच लागेल. मुंबई हा खरे तर छोटा भारत आहे. या शहरात भारतातील सगळ्या राज्यांमधील लोक येत असतात. आपल्याला शक्य असेल त्याप्रमाणे राहण्याची जागा मिळवून आपली जगण्याची लढाई लढत असतात. मुंबईमधील लोकलगाड्यांना लाईफलाईन म्हटले जाते. मुंबईतील लोकांचे लाईफ म्हणजेच जीवन त्यांच्यामुळे चाललेले आहे. मुंबईतील लोकल विस्कळीत होणे म्हणजे मुंबईकरांचे जीवन विस्कळीत होण्यासारखे आहे. भारतीयांमध्ये एकात्मता साधली जावी म्हणून शासकीय पातळीवरून प्रबोधन केले जाते, पण खर्‍या अर्थाने जर ही एकात्मता कुठे साधली जात असेल तर ती मुंबईतील लोकल रेल्वेगाड्यांमध्येच. या लोकलगाड्यांमध्ये इतकी गर्दी असते की, लोकांना एकमेकांची गळाभेट घ्यावीच लागते. त्यांची अंगे एकमेकांना चांगलीच घासून निघतात. प्रसंगी धक्काबुक्की होते. लोकलमध्ये चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी रेटारेटी होते. या रेटीरेटीत आपला एकमेकांशी परिचयही होतो.

मुंबईकर असल्यामुळे मीही लोकलमधील गर्दीचा आणि रेटारेटीचा भाग आहे. या रेटारेटीतच माझी बिन्या आणि सोन्याची भेट झाली. ही दोन बावीस तेवीशीतली नवखी पोरं. त्यांची आणि माझी ओळख झाली तीच मुळी लोकलमधील रेटारेटीमुळे. त्या दोघांकडे पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आले की, हे दोघे मुंबईत नवीनच आलेले आहेत. सुरुवातीला त्यांची तोंडओळख झाली. मी आणि ते तिघे चर्चगेटला एकाच वेळी उतरत असू. गाडीची वेळ एकच असल्यामुळे बिन्या आणि सोन्या मला नेहमी भेटायचे. चर्चगेटला उतरल्यावर पुढे काही अंतर एकत्र चालताना त्यांच्या आणि माझ्या गप्पा व्हायच्या. मी एका कंपनीत काम करत होतो. त्यांना मी त्यांच्याविषयी माहिती विचारल्यावर कळले की, ते विरारला राहतात. ते दोघेही मुंबईत येऊन सहा महिने झाले होते. त्यांच्यापैकी एक बिन्या हा विदर्भातील एका दूरवरच्या गावातून आला होता. तर दुसरा सोन्या हा कोल्हापुरातील एका गावातून आला होता. काही वेळा ते मला गावच्या गोष्टी सांगत. बिन्या म्हणाला, भाऊ, सायकलवरून जाताना मला कुत्र्यांनी चौदा वेळा चावले आहे. इंजेक्शन घेतले. शेताची राखण करताना आठ वेळा माकडाने बोचकारले आहे.  सोन्या म्हणाला, वडिलांनी जबरदस्तीने कोल्हापुरात मला एका कंपनीत नोकरी करायला लावलं. पण मला काही तरी वेगळं करायचं होतं. म्हणून आलो निघून मुंबईला. बिन्या आणि सोन्या हे अगदी तरुण वयात आपली गावे आणि कुटुंबीयांना सोडून मुंबईत आले होते. त्यांना नोकरी करून शिकायचे होते. दोघे पदवीधर झालेले होते. त्यांना पुढील शिक्षण घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी कॉलेजमध्ये अ‍ॅडमीशनही घेतले होते. दोघेही नोकरीच्या शोधात होते. कारण शिक्षणाचा आणि राहण्या-खाण्याचा खर्च निघणे आवश्यक होते.

- Advertisement -

नोकरीचा शोध घेता घेता त्यांना एका हॉटेलवाल्याने नोकरी द्यायचे मान्य केले. हॉटेलवाल्याला दोन मुलांची गरज होती. बिन्या तिथे काही दिवस अगोदर नोकरीला लागला होता. काही दिवसानंतर सोन्याही तिथेच आला. तिथेच दोघांची ओळख झाली. दोघांनाही कळले की, आपण दोघेही एकाच बोटीतील प्रवासी आहोत. दोघेही आपली गावे सोडून करियर घडविण्याच्या महत्त्वाकांक्षेने मुंबईत आलेले होते. त्यानंतर दोघांची दोस्ती वाढत गेली. दोघांनीही मग रहायला विरारला भाड्याने छोटीशी खोली पाहिली. त्या खोलीत अगोदरपासून दोन मुले राहत होती. एका खोलीत मग चारजण राहू लागले. बिन्या आणि सोन्या हे पदवीधर होते. त्या दोघांनाही पत्रकारितेत करियर करायचे होते. त्यामुुळे सुरुवातीची गरज म्हणून आपण हॉटेलमध्ये नोकरी करत असलो तरी हे आपले ध्येय नाही, हे त्यांना कळत होते. शेवटी त्या दोघांनीही एक दिवस हिंमत करून वर्तमानपत्राचे एक कार्यालय गाठले. तेथील संपादकांना भेटले. आम्ही पदवीधर आहोत. नोकरी करून आम्ही शिक्षण घेतो. दूरच्या गावातून आलो आहोत. आम्हाला पत्रकारितेत पुढे करियर करायचे आहे. तुम्ही आम्हाला जे काम द्याल ते करायला तयार आहोत, असे सांगितले. संपादकही त्यांची मानसिक तयारी आणि तत्परता पाहून भारावून गेले. त्यांनी त्यांना नोकरी देण्याचे मान्य केले. त्यांना संधी मिळताच त्यांनी एकापेक्षा एक खळबळजनक बातम्या काढण्याचा धडाका लावला. ते पाहून त्यांच्याबरोबर काम करणारे सिनियर पत्रकारही थक्क होऊ लागले. मुंंबईत आलेल्या या नवख्या पोरांच्या धडाडीचे सगळ्यांना कुतूहल वाटू लागले.

ऑफिसमध्ये त्यांचे कसे कौतुक केले जात असे त्याविषयी मला सांगत असत. मी त्यांना कुतूहलाने विचारत असे की, अरे तुम्ही तर मुंबईत नवखे आहात. इतके कसे काय जमते तुम्हाला ? तेव्हा ते मला म्हणत, भाऊ, तुम्ही लय इचार करता. इतका इचार करायचा नाय. आम्ही असा इचार करत बसलो असतो, तर आम्ही आमचं गाव सोडून इथे मुंबईत आलेच नसतो. आमच्यामध्ये जी क्षमता आहे तिला वावच मिळाला नसता. करत र्‍हायल की, व्होत र्‍हातय बघा, असे ते मला बिनधास्तपणे सांगत. तुम्ही राहता कसे, खाता काय, घरच्यांची आठवण येते का, असे अनेक प्रश्न मी त्यांना विचारत असे. त्याची उत्तरे देण्यात त्यांना फारशी रुची नसे. ते जाऊद्यात की वो, असे म्हणून ते उडवून लावत. आम्हाला आयुष्यात मोठी उंची गाठायची आहे, असे ते म्हणत. त्यांचा तो आत्मविश्वास आणि उत्साह पाहिल्यावर वाटायचे की, आज कितीही कष्टमय जीवन हे दोघे जगत असले तरी त्यांना हवी असलेली उंची ते गाठतील. कारण मुंबईची खरी ऊर्जा आणि तिची प्रगती ही अशा जिगरबाज तरुणांच्या महत्त्वाकांक्षेत सामावलेली आहे.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -