घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रभाजपा नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल; काय आहे...

भाजपा नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण…

Subscribe

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द येथील खंडणीच्या गुन्ह्यात संशयित असलेल्या अनिरुद्ध शिंदे यांनी जामिनावर सुटल्यानंतर राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती. याबाबत आता भाजपाचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे, भाजपा कामगार आघाडीचे पदाधिकारी विक्रम नागरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे यांच्या पत्नीने घोटी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुकेश शहाणे आणि विक्रम नागरे यांनी अनिरुद्धला खंडणीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवले. तसेच वारंवार त्रास देत असल्याने पतीने जीवन संपवल्याचे शिंदे यांच्या पत्नीने फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मृतांच्या नातेवाइकांनी घोटी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर रात्री उशिरा या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार असलेल्या अनिरुद्ध शिंदेच्या पत्नीच्या फिर्यादीनुसार, मयत अनिरुद्ध हे सातपूर औद्योगिक वसाहत भागात एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. मात्र, इगतपुरी तालुक्यातील मूळ गाव असलेल्या भरवीर खुर्द येथे शेती असल्याने त्यांचे या ठिकाणी नेहमी येणे जाणे असायचे. सासू नंदाबाई धोंडू शिंदे या भरवीर खुर्द गावात राहत होत्या. त्याही मागील एक महिन्यापासून अनिरुद्ध शिंदे यांच्या सातपूर येथील निवासस्थानी राहण्यासाठी आल्या होत्या. काही महिण्यापूर्वी अनिरुद्ध शिंदे यांच्याविरुद्ध विक्रम सुदाम नागरे यांनी सातपूर पोलीस ठाण्यात खंडणीची फिर्याद दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली होती. नुकतीच त्यांची या गुन्ह्यात जामिनावर सुटका झाली होती.

- Advertisement -

दरम्यान, अनिरुद्ध शिंदे यांनी आपल्या पत्नीला भरवीर खुर्द येथून फोन करून विक्रम नागरे आणि मुकेश शहाणे यांनी खोट्या गुन्ह्यात फसवले असून याचा मला खूप त्रास होत आहे. यामुळे मी माझं जीवन संपत असल्याचे सांगितले. तसेच, मुकेश शहाणे आणि विक्रम नागरे सातपूर पोलिसांसोबत मला शोधण्यासाठी येत आहेत म्हणून भरवीरला जात असल्याचेही सांगितले.
दरम्यान मंगळवार (दि.२७) रोजी दुपारी दोनच्या सुमारास वैशाली शिंदे यांच्या भावाने फोनकरून सांगितले की अनिरुद्ध याने भरवीर येथे काहीतरी विषारी औषध सेवन केले आहे. त्यानंतर ही सगळी मंडळी भरवीर येथे पोहचले. याठिकाणी स्थानिक पोलीस देखील दाखल झाले होते.

दरम्यान, फिर्यादी वैशाली शिंदे यांच्या म्हणण्यानुसार अनिरुद्ध शिंदे हे नाशिक महानगरपालिका लढवण्यासाठी इच्छुक असल्याने येथूनच विक्रम नागरे व मुकेश शहाणे हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. त्यावरून शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे सांगून सातपूर पोलिसात खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला. यामुळेच पतीने आत्महत्या केल्याचे वैशाली शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांना घटनास्थळावरून एक चिठ्ठी प्राप्त झाली असून या चिठ्ठीत या दोघांचे नाव नमूद आहे, तर चिठ्ठीबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. मंगळवारी (दि.२७) शहाणे आणि नागरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे भाजपच्या गोटात आणि नाशिकच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -