अपहरण करुन मोरपीस उपटले; मोराचा दुर्दैवी मृत्यू

बनकर-विधाते कुटुंब हादरले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मोेरपीस छाटणार्‍या आरोपीला अटक

पिंपळगाव बसवंत : पावसात थुईथुई नाचणारा, आपल्या आवाजाने आगमनाची चाहूल देत अंगणात मुक्तसंचार करणार्‍या आणि सर्वांचाच लाडका बनलेल्या कृष्णाचा अखेर गुरुवारी (दि.४) उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी एका विकृताने त्याचे पंख छाटून नेले होते. तेव्हापासून असह्य वेदना सहन करणार्‍या या मोरावर उपचार सुरू होते. त्याच्या मृत्यूची बातमी येताच बनकर आणि विधाते कुटुंबिय अक्षरशः हादरले. या मोरावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जोपुळ रोड परिसरातील काशीनाथ विधाते आणि केशव बनकर यांच्या शेतात मुक्तपणे वावरणार्‍या कृष्णा नावाच्या मोराचे चिंचखेड येथील संशयित आरोपी किरण साहेबराव सोनवणे याने मोटारसायकलवरुन (एम एच 12, डी झेड ०८६१) या मोराचे अपहरण करत त्याला स्वतःच्या घरी नेले होते. त्या ठिकाणी सोनवणे याने अत्यंत क्रूरपणे या मोराचे पंख छाटले आणि या मोराला पुन्हा एकदा शेतात सोडून दिले होते. माणसांच्या सानिध्यात धीटपणे वावरणारा हा मोर या घटनेनंतर मात्र भीतीने लपून बसला होता. मोर दिसत नसल्याने अस्वस्थ झालेल्या बनकर-विधाते कुटुंबातील सदस्यांनी शोध घेतला तेव्हा जखमी अवस्थेतील हा मोर झाडांमध्ये लपलेला आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संजय वाघमारे, वनपरीमंडळ अधिकारी देविदास चौधरी, वनरक्षक विजय टेकनार, वनरक्षक वाल्मिक व्हरगळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मोराला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात या घटनेमागे चिंचखेड येथील किरण सोनवणे याचा हात असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर वनविभागाने त्याला ताब्यात घेत कसून चौकशी केली. त्यात सोनवणे याने पंख छाटल्याची कबुली दिली. दरम्यान, प्रयत्नांची शिकस्त लावूनही डॉक्टर या जखमी मोराला वाचवू शकले नाही. त्याच्या मृत्यूनंतर सोनवणे याच्याविरुद्ध वनकायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनमाड येथील सहायक वनअधिकारी डॉ. सुजित नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा तपास सुरू आहे. या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा करावी, जेणेकरुन पुन्हा कुणी असे कृत्य करण्यास धजावणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया बनकर-विधाते कुटुंबियांनी व्यक्त केली.

..अन विधाते-बनकर कुटुंब ढसाढसा रडले

गेल्या 3 वर्षांपासून एक मोर व लांडोर यांची जोडी बनकर-विधाते यांच्या शेतात मुक्तपणे बागडत होती. त्यांना दाणा-पाणी केल्याने या जोडीला माणसांचा लळा लागला होता. या कुटुंबांनी जोडीला राधा-कृष्ण नाव दिले होते. ही जोडी परिसरातील चिंचखेड, उंबरखेड भागातील झाडे-झुडपे आणि नदी परिसरात फिरून पुन्हा विधाते-बनकर यांच्या शेतात येत असे. मात्र, या निस्वार्थी प्रेमाला द़ृष्ट लागली अन् दुर्घटना घडली. या मोराचा मृत्यू झाल्याचे समजताच बनकर-विधाते कुटुंब अक्षरशः हादरून गेले होते. अंत्यविधीप्रसंगी सर्व सदस्य ढसाढसा रडत होते.

..म्हणून दिली जाते मानवंदना

मोर हा राष्ट्रीय पक्षी असल्याने वन्यजीव कायद्यानुसार राष्ट्रीय प्राणी व पक्षांना त्यांच्या मृत्यूनंतर मानवंदना दिली जाते. त्यामुळे पिंपळगाव येथील घटनेतही अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी मानवंदना दिली. शिरवाडे येथील वनविभागाच्या जागेत या मोरावार अंत्यसंस्कार करण्यात आले.