घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअद्वय हिरे देणार दादा भुसेंना टक्कर; महिन्याअखेरीस ठाकरे गटात प्रवेश

अद्वय हिरे देणार दादा भुसेंना टक्कर; महिन्याअखेरीस ठाकरे गटात प्रवेश

Subscribe

नाशिक : दादा भुसे यांनी काही महिन्यांपूर्वी शिंदे सेनेचा रस्ता धरल्यानंतर त्यांना मालेगाव बाह्य मतदारसंघातून टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अव्दय हिरे यांची निवड केली आहे. येत्या काही दिवसांतच हिरे यांचा ठाकरे सेनेत प्रवेश होणार आहे. हिरेंच्या प्रवेशाने पुन्हा एकदा भुसे-हिरे अशी कांटे की टक्कर बघायला मिळणार आहे. हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत उद्धव सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने एकप्रकारे भाजपचा वाचक काढण्यात उद्धव सेना यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने अद्वय हिरे यांनी उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली होती. भाजप पदाधिकारी असतानाही हिरे मातोश्री दरबारी दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. विशेष म्हणजे पदवीधरच्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना शिवसेनेने समर्थन द्यावे यासाठी हिरे यांनीच प्रयत्न केले होते. त्यानंतर रविवारी (दि. २) हिरे यांनी वैद्यकीय महाविद्यालयात काही निवडक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या आपण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचा निर्णय जाहीर केला.

- Advertisement -
कोण आहेत्त अद्वय हिरे ?

महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा निर्माण करणारे येथील हिरे घराणे मूळचे काँग्रेसी. अद्वय हिरे हे या घराण्यातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी. त्यांचे वडील माजी मंत्री प्रशांत हिरे यांनी १९९५ मध्ये राज्यात भाजप-सेना युती सत्तेत आल्यावर काँग्रेसचा त्याग करत शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले होते. पुढे शिवसेनेला जय महाराष्ट्र करत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. १९९९ मध्ये तत्कालीन दाभाडी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्यावर आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काही काळ त्यांनी जबाबदारी निभावली होती. त्यानंतर २००४ आणि २००९ अशा सलग दोनदा भुसे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. सलग दोनदा झालेला पराभव जिव्हारी लागला म्हणून की काय, प्रशांत हिरे हे थोरले पूत्र अपूर्वसह नाशिक येथे स्थायिक झाले. अपूर्व यांनी नाशिकमधूनच राजकारण सुरू केले, तर अद्वय यांनी मालेगावात राहून नेटाने किल्ला लढविण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. हे करत असताना हिरे बंधूंनी राष्ट्रवादीशी असलेली नाळ तोडून काँग्रेसला आपलेसे केले. मात्र, या पक्षातही फार काळ काही ते रमले नाहीत. काही काळ जनराज्य या स्वतंत्र पक्षाचा सवतासुभाही हिरे बंधूंनी उभा केला होता. या माध्यमातून अपूर्व हे प्रारंभी नाशिक महापालिकेत नगरसेवक झाले. नंतर नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेचे अपक्ष आमदारही झाले. २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अचानक मोदींच्या कर्तृत्वाचा साक्षात्कार झाला आणि दोन्ही बंधूंनी भाजपचे कमळ हाती घेतले. या निवडणुकीत अद्वय हिरे हे धुळे लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार होते. मात्र, पक्षाने डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी दिल्यावर अद्वय यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत हक्काचा मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ सोडून त्यांनी भुजबळ यांचे पुत्र पंकज यांना नांदगाव मतदारसंघात भाजपतर्फे आव्हान देण्यास पसंती दिली. अर्थात, त्यातही त्यांना यश येऊ शकले नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला दुषणे देत हिरे कुटुंबीयांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला आपलेसे केले. मात्र, आजवर ज्यांच्याशी दोन हात केले, त्या शिवसेनेच्या दादा भुसेंचे काम करण्याची वेळ आघाडी धर्मामुळे हिरेंवर आली. अशा स्थितीत राष्ट्रवादीत थांबणे हा हिरेंच्या दृष्टीने राजकीय आत्मघात ठरू शकतो, हे जाणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु, दादा भुसे हे शिंदे गटात गेल्याने आणि शिंदे गट आणि भाजप यांची राज्यात सत्ता स्थापन झाल्याने अद्वय हिरे यांना ठाकरे सेनेत प्रवेश करण्याशिवाय गत्यंतर नव्हता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -