नाव आणि चिन्ह हातून गेल्यानंतर ठाकरे गटाची मातोश्रीवर खलबतं, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा?

uddhav thackeray

मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला धक्का देत शिंदे गटाला शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह बहाल केलं आहे. यामुळे उद्धव ठाकरे आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष पसरला आहे. पक्षनाव आणि पक्षचिन्ह दोन्ही हातातून गेल्याने ठाकरे गट हतबल झाला आहे. परंतु, या हतबलतेवरही मात करण्याकरता निवडणूक आयोगाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे. याबाबत ठाकरे गटाची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत नेमकी कशाविषयी चर्चा सुरू आहे हे अद्यापही बाहेर आलेलं नाही. परंतु, उद्या सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन की ऑफलाईन याचिका दाखल करायची आणि पुढची रणनीती काय आखायची यावर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हेही वाचा – ‘आम्हाला माफ करा…’, सुषमा अंधारेंचे शिवरायांना भावनिक पत्र

काँग्रेस फुटीवरील निकालाचा आधार घेत शिवसेनेबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात याआधीही पक्ष फुटीची अनेक प्रकरणं झाली आहे. यावेळी जे निर्णय घेण्यात आले त्या सर्वांचा अभ्यास करून शिवसेनेबाबतचा निकाल घेण्यात आला आहे. पक्ष संघटनेवर नेतृत्त्वाकडून आपल्या मर्जीतील लोकांची वर्णी लावली जाते. अनेकदा संघटनात्मक निवडणुकांचा फार्स केला जातो. पक्षात फूट पडल्यावर निवडणूक आयोगाला केवळ संघटनात्मक पातळीवरील संख्याबळाच्या आधारे निर्णय घेता येत नाही. यासाठी १९९४ मध्ये तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन.शेषन यांनी जॉर्ज फर्नांडिस विरुद्ध एस.आर.बोम्मई प्रकरणात दिलेल्या निकालाचा संदर्भ या निकालासाठी लावण्यात आला आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या या निकालाला ठाकरे गटाने आव्हान देण्याचे ठरवले आहे.

ठाकरे गटाकडून उद्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. तसंच, उद्याच याप्रकरणी सुनावणी घेण्याची मागणीही करण्यात येणार आहे. दरम्यान, याप्रकरणाची सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने एकतर्फी निकाल देऊ नये. दोन्ही गटाची बाजू ऐकून घ्यावी, याकरता शिंदे गटानेही कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे याप्रकरणावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देतंय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

हेही वाचा – ठाकरेंनंतर आता शिंदे गटाचीही सर्वोच्च न्यायालयात धाव, कारण काय?

निवडणूक आयोगाचा निकाल दोषपूर्ण आहे, त्यामुळे या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात येण्याची शक्यता आहे. २०१८ साली पक्षाच्या घटनेत झालेले बदल लोकशाहीविरोधातील नसून घटना बदलाची माहिती निवडणूक आयोगाला दिली होती, असं ठाकरे गटातील काही नेत्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे ज्या मुद्द्यावरून ठाकरे गटाकडून पक्ष आणि चिन्ह काढून घेतलं त्याच मुद्द्याला कायदेशीर आणि पुराव्याचा आधार घेत युक्तिवाद केला जाणार असल्याची शक्यता आहे.

या सर्व विषयावर चर्चा करण्याकरता सध्या मातोश्रीवर बैठक सुरू आहे. ठाकरे गटातील अनेक नेते या बैठकीला हजर राहिले आहेत. त्यांची बैठक संपल्यानंतरच त्यांची भूमिका स्पष्ट होऊ शकेल.

दरम्यान, तसंच, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरही उद्या सकाळी बैठक होणार आहे. शिंदे गटाने व्हीप लागू केला आहे. त्यामुळे हा व्हीप पाळायचा की नाही यावर उद्याच्या बैठकीत ठरवण्यात येणार आहे.

हेही वाचा – चिन्ह आणि पक्षासाठी दोन हजार कोटींचा सौदा, निवडणूक आयोगावर राऊतांचा गंभीर आरोप