घरमहाराष्ट्रनागपूरAjit Pawar : कांदा, दूध अन् इथेनॉल बंदीच्या प्रश्नावर विरोधकांचे टीकास्त्र; अजित...

Ajit Pawar : कांदा, दूध अन् इथेनॉल बंदीच्या प्रश्नावर विरोधकांचे टीकास्त्र; अजित पवार म्हणतात केंद्राशी चर्चा करू

Subscribe

नागपूर : राज्यात कांदा निर्यात आणि दुधाचा प्रश्न तापला असताना आता सरकारने इथेनॉल बंदीही लागू केल्यामुळे आज (8 डिसेंबर) हिवाळी अधिवेशनात (Winter Session) विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला धारेवर धरत प्रश्नांचा भडिमार केला. विरोधकांच्या सर्व महत्त्वाच्या मुद्यांवर सभागृहात चर्चा करुन त्यातून सर्वसहमतीने मार्ग काढण्याची सरकारची तयारी आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज विधानसभेत दिले. त्यांनी असेही सांगितले की, कांदा निर्यात आणि इथेनॉल निर्मिती प्रश्नांवर गरज पडल्यास केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) आणि पीयूष गोयल (Piyush Goyal) यांची भेट घेऊन मार्ग काढू आणि दुधउत्पादकप्रश्नी शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येईल. (Criticism of the opposition on the issue of ban on onion milk and ethanol Ajit Pawar says we will discuss with the Centre)

राज्यात कांदा निर्यात आणि दुधाचे दर कमी झाल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. यानंतर आता केंद्र सरकारने साखरेचे उत्पादन वाढवण्यासाठी उसापासून बनणाऱ्या इथेनॉलवर बंदी घातली आहे. याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत इथेनाॅल बंदी आणि कांदा निर्यात बंदीच्या मुद्यावर प्रश्न उपस्थित करत सरकारकडे भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. यानंतर काँग्रेसकडून नाना पटोले (Nana Patole) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही जयंत पाटील यांची मागणी लावून धरली. विधानसभेत विरोधी पक्षांकडून मांडलेला स्थगन प्रस्ताव फेटाळल्यानंतर सदस्यांना आश्वासित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिले की, सर्व महत्त्वाच्या मुद्यांवर सभागृहात चर्चा करुन त्यातून सर्वसहमतीने मार्ग काढण्याची सरकारची तयारी आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Winter Session : परीक्षा शुल्क अदा करण्याची दानवेंची मागणी; महाजन म्हणाले- ‘बॅंक खाते द्या’

अजित पवार म्हणाले की, मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा असून त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. अवकाळी पाऊस, दुधउत्पादक, संत्राउत्पादक, कापूसउत्पादक, ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकारमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा निर्णय घेण्यात येईल. ऊसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदीमुळे ऊसउत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांसमोरच्या अडचणी वाढणार आहेत. याबाबत केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह, केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा झाली आहे.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही याप्रश्नी लक्ष घालून यातून मार्ग काढण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे येत्या शनिवारी किंवा रविवारी नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढण्यात येईल. जर मार्ग निघाला नाही तर पुढील आठवड्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह दिल्लीला जावून केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पियुष गोयल यांची भेट घेऊन यातून निश्चितपणे मार्ग काढला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिली.

हेही वाचा – Nawab Malik : देवेंद्र फडणवीसांच्या पत्राचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही – प्रफुल्ल पटेल

दूधउत्पादक शेतकऱ्यांसाठी आर्थिक तरतुदीची गरज

अजित पवार म्हणाले की, दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक तरतुदीची गरज लागणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल. परंतु यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना वेळेअभावी बैठक घेणे शक्य नसले तर मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने आपण स्वत: दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह येत्या मंगळवारी बैठक घेऊन दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढू, असेही अजित पवार यांनी सभागृहाला सांगितले.

विरोधकांचे सरकारवर टीकास्त्र

आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सराकारवर टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, अवकाळी पावसाबद्दल चर्चा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, मात्र सरकार पळ काढत आहे. केंद्र सरकारच्या हो ला हो म्हणणारं सरकार आहे. आज आमची संख्या कमी आहे म्हणून आवाज दाबला जात आहे. मात्र, आमचे मुद्दे अत्यंत रास्त आहेत, असे जयंत पाटील म्हणाले तर दुसरीकडे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात सरकारवर आरोप करताना म्हणाले की, सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे उभा राहत नाही. दुधाचे दर खाली आले असताना महाराष्ट्राच्या दुधात भेसळ आहे, असे सांगून मंत्री महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. दुधाला 35 रूपये दर मिळाले पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -