‘त्या’ हॉटेलमधून राष्ट्रावादीच्या तीन पदाधिकाऱ्यांना अटक, सेना आमदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न?

राष्ट्रवादीच्या या तिन्ही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली असून हे पदाधिकारी बंडखोर आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते, असं म्हटलं जात आहे

शिवसेनेचे बंडखोर आमदार (Shivsena Rebel MLA) गोव्यातील ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमध्ये राष्ट्रवादीच्या तीन पदाधिकाऱ्यांनी बनावट ओळखपत्र दाखवून प्रवेश केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या या तिन्ही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली असून हे पदाधिकारी बंडखोर आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते, असं म्हटलं जात आहे. (Arrest of three NCP office bearers from ‘that’ hotel, attempt to contact shivsena rebel MLAs?)

हेही वाचा – बंडखोर आमदारांना अतिरेक्यांसारखं आणलं, कसाबसाठीही एवढा बंदोबस्त नव्हता; आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

शिंदे गटातील बंडखोर आमदारांना गुवाहाटीतून गोव्यात नेण्यात आलं होतं. तिथे त्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. या हॉटेलची सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. दरम्यान, राष्ट्रवादीचे पदाधिकारी बनावट ओळखपत्र दाखवून त्या हॉटेलमध्ये शिरले. मात्र, हॉटेलमालकाला याची कुणकुण लागल्याने त्यांनी लागलीच पणजी पोलीस ठाण्यात याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. बनावट ओळखपत्र दाखवून हॉटेलमध्ये प्रवेश केल्याचा ठपका या तिघांवरही ठेवण्यात आला आहे. म्हणूनच त्यांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा – …तर, आपण राज्याचे मुख्यमंत्री असता; राऊतांचा फडणवीसांना टोला

कोण होते पदाधिकारी?

बंडखोर आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया दुहान आणि आणखी दोन पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केला होता. सोनिया दुहान यांनी पहाटेच्या शपथविधि वेळीही महत्त्वाची भूमिका बजावली होती. पहाटेच्या शपथविधिवेळी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना गुरुग्राम येथील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांची सुटका करण्यासाठी दुहान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.