…त्यांची रेसकोर्स संदर्भातील प्रतिक्रिया म्हणजे वरातीमागून घोडे, शेलारांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि युवासेनेने रेसकोर्स संदर्भात जी प्रतिक्रिया दिली आहे. त्या प्रतिक्रियांचे वर्णन करायचे म्हटले तर वरातीमागून घोडे आणि घोडेबाजार असं आहे, असं प्रत्युत्तर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दिलं आहे.

आशिष शेलार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, २०१३ मध्ये लीज संपली. तेव्हा आदित्य ठाकरे तुम्ही सत्तेत होतात. २०१९ ते २०२२ पर्यंत राज्य सरकारची जमीन असेल तर सरकारमध्ये तुम्हीच होतात. मग महापालिकेत गेली २५ वर्षात तुम्हाला पार्क तयार करता आलं नाही. सत्तेच अडीच वर्ष असताना देखील मुहूर्तमेढ करता आली नाही. त्यामुळे घोडे रेसच्या बाबतीत शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची याबाबतीत प्रतिक्रिया आहे.

महालक्ष्मीच्या रेसकोर्सवर मुंबईकरांचा अधिकार आहे. याबाबतीत भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. त्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि आदित्य ठाकरेंच्या पेंग्विन सेनेचा नाहीये. फक्त मुंबईकरांचा त्यावर अधिकार आहे. त्या ठिकाणी कार्बन न्यूट्रल आंतरराष्ट्रीय स्वरुपाला शोभेल असं अस्थेटीक आणि सजावट असलेलं एक गार्डन तिकडे झालं पाहीजे. त्याबाबत राज्य सरकार भूमिका घेईल, असं आशिष शेलार म्हणाले.

रेसकोर्स कुठल्या जागी शिफ्ट करण्यात यावा, याबाबतीत महापालिकेने प्रस्ताव मांडावा. परंतु हा प्रस्ताव एखाद्या खासगी जागेवर पालिकेने मांडल्यास त्याला आमचा विरोध असेल, असंही आशिष शेलार म्हणाले.

राज्य सरकारने रेसकोर्सच्या नूतनीकरणाचे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे रेसकोर्सच्या भूखंडाचे महानगरपालिकेला नूतनीकरण करता येणार नाही. त्यामुळे कराराचे नूतनीकरण किंवा त्यात बदल करण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी घ्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

खोके सरकारला आता रेसकोर्स विकायचाय! समजलेल्या माहितीप्रमाणे वरळी डेअरी बिल्डर्सच्या घश्यात घालण्यासोबतच रेसकोर्सची जागाही व्यावसायिक हितसंबंधांसाठी देण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं ट्वीट करत आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता.


हेही वाचा : हनुमान चालिसा प्रकरण : दोषमुक्तीसाठी राणा दाम्पत्याकडून विशेष न्यायालयात अर्ज