विधानपरिषद निवडणूक : दहाव्या जागेसाठी भाई जगताप – प्रसाद लाड यांच्यात ‘बिग फाईट’

विधान परिषद निवडणुकीत पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी  उमेदवाराला २७ मतांची गरज आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडीचे १५२ भाजपचे १०६, अपक्ष तेरा आणि छोट्या पक्षाचे १६ असे २८७ आमदार विधानसभेत आहेत.

विधानपरिषद निवडणुकीत (maharashtra legislative council election) १० जागांसाठी १३ उमेदवारांचे अर्ज (Candidature application) दाखल झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीत गुप्त मतदान पध्दती आहे. भाजपने पाचवा उमेदवार दिला आहे. संख्याबळानुसार भाजपाचे (bjp) ४ उमेदवार निवडून येतील. तर शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे २ आणि काँग्रेसचा १ उमेदवार निवडून येईल. भाजपला आपला पाचवा उमेदवार आणि काँग्रेसला आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे १० व्या जागेसाठी काँग्रेसचे भाई जगताप (bhai jagtap) आणि भाजपचे प्रसाद लाड (prasad lad) यांच्यात ‘बिग फाईट’ होणार आहे.

भाजपाकडून बुधवारी पाच उमेदवारांचे अर्ज भरण्यात आले. तर गुरूवारी अखेरच्या दिवशी सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्याने भाजप उमेदवारांची संख्या सहा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दोनऐवजी तीन उमेदवारी अर्ज भरले असले तरी शिवाजी गर्जे यांचा अर्ज अतिरीक्त असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मात्र भाजप कोणाचा अर्ज मागे घेणार याबाबत उत्सुकता आहे. सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे घेण्याची शक्यता अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

विजयासाठी २७ मते आवश्यक

विधान परिषद निवडणुकीत पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी  उमेदवाराला २७ मतांची गरज आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडीचे १५२ भाजपचे १०६, अपक्ष तेरा आणि छोट्या पक्षाचे १६ असे २८७ आमदार विधानसभेत आहेत. तर मंत्री नबाव मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना मतदानाचा हक्क न्यायालायने नाकारला आहे. त्यामुळे २७ मतांचा कोटा थोडा कमी होण्याची शक्यता आहे.

पक्षनिहाय उमेदवार

शिवसेना :  सचिन अहिर, आमशा पाडवी

राष्ट्रवादी काँग्रेस : रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे, शिवाजी गर्जे

काँग्रेस : भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे

भाजप  :  प्रवीण दरेकर, राम शिंदे,  श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत